Sunday, March 21, 2021

ऑडीओ व्हीज्युअल ईफेक्ट


 शोले या सिनेमाबद्दल सगळ्यांना सगळं माहीत आहे. हा सिनेमा कधी पाहीला याच्या प्रत्येकाच्या विशेष आठवणी असतील. 

       मी मात्र हा सिनेमा पाहाण्याआधी ऐकला. म्हणजे त्याचं असं होतं की माझं लहानपण एका तालुक्याच्या गावात गेलं जिथे एक छोटं मातीचं सिनेमागृह ( बोली भाषेत थेटर )होतं. तिथे नवीन सिनेमे जुने झाल्यावरच बघायला मिळायचे. मग शोले तर 70 mm चा तो लागणं शक्यच नव्हतं. कालांतराने साधारण 82/83 साली ( मला नक्की आठवत नाही )च्या सुमारास एक नवीन मोठं कुशनच्या शीटा असलेलं सिनेमाघर गावात झाले. जे त्याकाळी आम्हाला 'आई शप्पथ काय भारी !' असे वाटलेले. तीथे बहुतेक  8 वी 9 व्वीत असताना मी शोले पहील्यांदा पाहीला. 

        पण हा शोले पाहाण्याआधी मला (किंवा आमच्या वाड्यात राहाणार्या प्रत्येकाला) तो ऐकून ऐकून पाठ झालेला होता. आमचे शेजारी एक सधन आणि रसिक असे किराणा मालाचे दुकानदार राहात होते.  त्यांच्याकडचा कॕसेट प्लेयर दिवसभर वाडाभर वाजायचा. सगळ्या प्रकारची गाणी कथाकथन आणि बरच काही. त्या काळी या आख्ख्या शोलेच्या कॕसेट निघाल्या होत्या. त्या खूप वेळा त्यांच्याकडे लावलेल्या असायच्या. हा शोलेच्या कॕसेट लावायचा कार्यक्रम बरेच महीने चालला होता. त्यामुळे शोलेचे संवाद म्युझिक पीसेससकट जवळजवळ पाठच झालेला. 

    आता यात मजा अशी की आपण जे ऐकतो ते आपल्या अनुभवानुसार आणि कल्पना शक्तीनुसार दृश्य स्वरूपात आणत असतो. माझा त्या वयात सिनेमा पाहाण्याचा अनुभव हा तसा सीमीत होता. पुणे जिल्ह्यात राहात असल्याने (पुणे प्रक्षेपण केंद्रामुळे )निदान ईडीयट बॉक्स लवकर आयुष्यात आलेला. तीही शेजार्यांचीच कृपा. त्यामुळे दर आठवड्यात एक मराठी एक हिंदी असे जुने सिनेमे मात्र पदरी पडत असत. शिवाय सगळ्या प्रकाराचं वाचन दांडगं असल्याने कल्पनाशक्ती भरपूर होती. मग तो शोले ऐकून ऐकून माझ्या मेंदूत तयार झालेला होता. बरेचसे प्रसंग व्यवस्थित समजले होते. पण बर्याच गाळलेल्या जागाही राहील्या होत्या. 

   सिनेमा पाहाताना माझी कल्पना शक्ती आणि समोरचं दृष्य असे ताडून पाहाणे चालू झालेले.  पहीलं मालगाडीतलं दृष्य बरचसं तसच पाहीलेलं. कारण रेल्वेजंक्शनचं ठिकाण असल्याने आम्हा दौंडकरांना रेल्वे गाड्या मालगाड्या त्यांचे आवाज त्याचा प्रवास हे कल्पनेत आणायला काहीच अवघड नव्हतं. त्यात डाकू असलेले प्रसंग आधीच्या सिनेमात होतेच. पण अर्थातच कल्पनेपेक्षा समोरचे दृश्य जास्त भन्नाटच होते. जिथे आवाज संगीत आणि संवाद अशी मिसळ होती तिथे कल्पना ही दृष्याच्या जवळ जात होती. वीरू टाकीवर चढलेला नी जय बशीतून चहा पितोय मौसी त्याला खूप बोलतीय नी मागे माणसांचा कोलाहल ...वा वा ऐकायला जेवढी मजा आलेली त्याहून जास्त पाहायला. पण बरेचसे मूक प्रसंग हे कॕसेट ऐकताना अजिबात कळलेले नव्हते. त्यातला राधा ( जया बच्चन ) कंदील विझवत असताना आणि जय बाजा वाजवत असतानाचा प्रसंग. अहमदचे मृत शरीर गावात आल्यानंतर आलेला सन्नाटा असे बरेच अंगावर येणारे प्रसंग समजलेच नव्हते.  माझ्यासाठी शोले पहील्यांदा पाहणं हा खूपच मनोरंजक अद्भूत असा प्रकार झालेला. अरेच्या हे असय होय असे मनात म्हणत कल्पनेतल्या दृश्याशी समोरच्या दृष्यासोबत तुलना करत शोलेची मजा घेतली.  या शोलेच्या कॕसेटचं गारूड एवढी वर्षे झाली तरी तसचं आहे. कोणत्याही चॕनलवर शोले लागलेला असेल तर मला तो आधी ऐकलेलाच आठवतो त्याच्या संगीत तुकड्यांसकट.


         नुसते वाचणे , नुसते ऐकणे ,ऐकत पहाणे  यात दृक श्राव्य माध्यम हे अगदी भावनांना हात घालणारे आहे. किंबहुना बरेचदा आपल्या मनावर दीर्घ काळ परिणाम करणारे आहे. समाजाचे समज बदलवण्याची आणि बिघडवण्याची पण ताकद त्यात आहे. आपण जे अगदी साधे बोलतो ते सुद्धा त्यातला अर्थ जाणवेल असे आवाजातले आरोहअवरोह चेहर्यावरचे हावभाव या सकट. अगदी साधे ऊदाहरण  – “ वा !  छानच !!! “हे ऊद्गार कौतुक या अर्थानेही असू शकतात किंवा वा काय दिवे लावलेत” या अर्थाने पण असू शकतात. म्हणणार्याचा टोन आणि घटना यावर ते अवलंबून आहे. समोरचा मनुष्य कौतुक करत नसून तिरकंस बोलतोय म्हटल्यावर आपल्या भावना पण बदलतात . 

       अजून एक भावनेवर परिणाम करणारे तुलनात्मक ऊदाहरण म्हणजे जुन्या दूरदर्शन वरच्या बातम्या आणि हल्लीच्या न्यूज चॕनलवरच्या बातम्या. 

       “काल शहरात कोविडच्या हजार केसेस सापडल्या व दिवसभरात दहा मृत्यू झाले ही संथपणे दिलेली दूरदर्शनवरची बातमी, ज्याला दृष्याची जोडच नाही ती ऐकून कसे वाटते. आणि आता हे डोळ्यासमोर आणा – वरच्या पट्टीत बोलणारा अॕकर सांगतोय ' आता शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा वाढत चाललाय आणि मृत्यूचे तांडव चालू झाले आहे. काल दिवसभरात तब्बल दहा मृत्यू झाले असून सरकार कोणत्या ऊपाययोजना करतय असा संतप्त सवाल नागरीक विचारत आहे. " या बातमीला जोडून येणारा व्हीडीओ तर बातमीची गंभीरता वाढवतो .मृत्यूचे  तांडव वगैरे शब्द ऐकून तर आपल्या डोळ्यासमोर मृतदेहाचे ढीग नाचायला लागतात. संतप्त सवाल ऐकून आपल्या भावनाही  चांगल्याच तप्त झालेल्या असतात. आपण कामावरून येऊन जेवता जेवता अशा बातम्या पाहात असू तर बघा तुम्हीच काय होत असेल . सतत भावना ऊद्दीपीतच राहील्या तर अनारोग्य निर्माण करणार हे वेगळे सांगायलाच नको. भावनांच्या ऊद्दीपना व्यतिरिक्त अजून एक गोष्ट आहे यात ती म्हणजे अतिचंचलता. हल्लीचे सिनेमे जाहीराती सिरीयल्स किंवा कोणतेही व्हीडीओ पाहाताना एक गोष्ट जाणवते की त्या व्हीडीओतल्या फ्रेम्स खूप वेगाने हलत असतात.विशेषतः हल्लीची गाणी आणि जाहीराती. बर्याचशा या वेगवान जाहीरती साठीपुढच्या लोकांना पटकन समजतही नाहीत. सतत वेगाने हलणारे चित्र पाहून अर्थ समजला नाही तरीही ऊद्दीपन होते. अस्वस्थता येते. मनात चंचलता निर्माण होते.

       भावनिक ऊद्दीपन करणार्या सिरीयल किंवा सिनेमा पाहाताना निदान हे खोटं आहे हे माहीत असल्याने होणारी चलबिचल तात्पुरती तरी असते. पण न्यूज चॕनल पाहाताना जर आपण त्या वरच्या पट्टीत बोलणार्याबरोबर वाहवत गेलो तर मात्र चिडचिड, संताप, उद्रेक , राग ,निराशा, हताशा ऊद्भवते जिचा प्रत्यक्ष दैनंदिन आयुष्याशी काहीही संबंध नसतो. भावनांचा रीमोट टीव्हीच्या , मोबाईलच्या ताब्यात दिल्यावर टीव्हीच्या रीमोटचं बटन आपल्याच हातात आहे हे विसरायला होतं का याचं स्वपरीक्षण करायला हवं.

आनंदी

No comments:

Post a Comment

मध्यस्थ

 मध्यस्थ                    फक्त दूरदर्शन होतं त्या जमान्यात एक मध्यस्थ नावाची टेलीफिल्म पाहिली होती. राजन भिसे ,अरूण जोगळेकर आणि लालनसारंग ...