Saturday, April 16, 2022

खरेदीचे सुखं की सुखाची खरेदी....


            

                परवा माझी एक वजनदार मैत्रीण वेट लॉसची ट्रीटमेंट काय आहे अशी चौकशी करायला आली. अलीकडे खूपच जाड झालीये ती. मी मैत्रीण असल्याने खरं तर ती अनेक दिवसांपासून फोनवरून सल्ले घेतच होती. कळतय पण वळत नव्हतं. शेवटी  तीच म्हणाली मी पेशंट म्हणून येते तुझ्याकडे , नी मग  तू ईतर पेशंटकडून घेतेस तेवढेच पैसे घे कोर्सचे. आली खरच परवा. मी कोर्स समजाऊन सांगितला . कोर्सची फी सांगितली. फी ऐकल्यावर भुवया वर गेल्या. ( बाय द वे ही मैत्रीण अतिप्रमाणातल्या खात्या पित्या घरातली आहे ) तेवढ्यात तीला फोन आला. तीने बिनधास्त माझ्या समोरच ऊचलला आणि मोठ्याने बोलायला लागली. त्या बोलण्यावरून मला समजलं की तीने खरेदी केलेला सोफासेट ठेवायला लोकं घरी आलेली आहेत. तीचा फोन झाल्यावर मी विचारले अगं तुझ्या आत्ता घरात असलेल्या सोफ्याला दोनच वर्षं झाली ना घेऊन ? ? तर म्हणाली, " अगं तुला सांगते ,परवा त्या मॉलमधे  ईतक्या भारी डिझाईनचा अप्रतिम सोफा पाहीला मी. अगदी माझ्या मनातला . केंव्हापासून मला असा हवा होता. लग्गेच घेतला बघ. " ....किंमत ऐकल्यावर माझ्या भुवया वर गेल्या. मी तोच मुद्दा धरून म्हटले बघ अगं तुझ्या सोफ्याच्या किमतीच्या मानाने या कोर्सची किंमत काहीच नाही . कधी चालू करतेयस सांग. तर ती झटकन ऊठत म्हणाली नाही ग बाई खूप महाग आहे तुझी ट्रीटमेंट . माझा नवरा तयार नाही होणार. मी त्याला विचारून कळवते तुला. आणि आता तो सोफा पाहाते घरात कसा दिसतोय ते. तू ये ग बघायला. चल बाय भेटू. 

असे म्हणून लाखाच्या घरातला सोफा पाहायला आरोग्याला नाकारून निघून गेली ती. 

     मी ऊगाचच तो अप्रतिम सोफा आणि माझी वेट लॉसची ट्रीटमेंट याची तुलना करत बसले. 

                 नी या खरेदीवरून मला अचानक कालचा प्रसंग आठवला . हा दुसर्या मैत्रिणी चा.ही मैत्रीण तीच्या भावाच्या नी वहीनीच्या घरातला वाद सोडवायला गेलेली.  भाऊ वहीनी दोघेही नोकरी करणारे 40-50 हजार पगार असणारे.  मुलांना ईंटरनॕशनल शाळेत घातलेले. तीचा भाऊ एकदम सज्जन . सुपारीच्या खांडाचं व्यसन नसलेला हे शब्द खरोखर जगणारा दुर्मिळ मानव. हॉटेलींगचीही फार आवड नाही. मात्र भावाची एकच सवय दर सहा महीन्यांनी धाडकन कुणालाही न सांगता एकदम महागडी वस्तू किंवा गॕझेट विकत घ्यायचं. अशा प्रकारे त्या घरात त्याचे अनेक महागडे फोन एकदम हायर एंडची सायकल ( जी अर्थातच चालवली जातच नाही ) हायर एंडचा भला मोठा टीव्ही ( जो मुली पाहातात म्हणून बहुतेक वेळा बंदच असतो ). त्याला साजेसी म्युझिक सिस्टीम आणि स्पीकर्स जे मुलांच्या आभ्यासामुळे क्वचितच लावले जातात .  रीक्लायनर चेअर , सगळ्या रूममधे एसी ( मुले लहान असल्याने सर्दी झाली तर म्हणून बरेचदा बंदच असतो ) हायर एंडचा ग्राफीकवाला लॕपटॉप जो आॉफीसमधे कुणीच नेत नाही. घरात बाहेर सीसी टीव्ही अशा एक ना दोन असंख्य वस्तू जमा झाल्या आहेत म्हणून कायम नवरा बायकोत वाद. कधी वैतागाने तीची वहीनी म्हणते एकवेळ दारू प्यायलेली परवडली असती या माणसाने. गरजेच्या वस्तू माझ्या पैशातून . याचा पैसा सर्व अशा वस्तूंसाठी...



            काय असंतं हे वस्तू विकत घेण्यापाठीमागचं वेड ? ?  याला हेडॉनिक शॉपिंग म्हणतात. वस्तू विकत घेतल्यावर अतिशय आनंद ,  सुख , समाधान मिळतं. त्यासाठी ही सर्व धडपड. बघा ना ,  बायकांना भांडी विकत घेताना पाहा .त्यांच्या चेहर्यावर केवढा आनंद असतो. छोट्या दुकानाऐवजी खूप मोठ्या एसी मॉलमधून वस्तू विकत घेतल्यावर तर खूपच भारी वाटतं ..हो ना ?  . सगळ्यांनाच वाटतं बहुतेक. मग आपणजगतो कशासाठी तर सुखं समाधान आनंद यासाठीच की. मग काय हरकत आहे ? पण मग गडबड कुठे होते ? पैसे कुठे खर्च करावे याची प्राॉयॉरीटी ठरवताना . मुलाच्या शाळेची लाखभर फी पेंडींग असताना लाखभराचे फर्निचर बदलावे का ?  हां दोन्ही करण्याची तुमची आर्थिक क्षमता असेल तर गो अहेड. सुख समाधान विकत घ्या. पण हेच हॉस्पिटलमध्ये बिल भरताना समाधान मिळतं का की आरोग्य मिळालं म्हणून ?

 एखादी ट्रीटमेंट महागडी आहे म्हणून तावातावाने बोलणारे आपण खूपदा लग्नात फक्त मेकपसाठी धाडकन 40/50 हजाराचे पॕकेज घेतो छान दिसण्यासाठी. 


शॉपिंगचे दोन प्रकार असतात. हेडॉनिक आणि युटीलीटरीयन.म्हणजे आनंदासाठी खरेदी आणि गरजेसाठी खरेदी. काही वस्तू अशा असतात की ज्या गरज आणि आनंद दोन्ही भागवतात. मात्र काही गरज नसतानाही आनंद देतात. आजचे सर्व मॉल हे तुमच्यातल्या या  भावनांना आवाहन करणारे असतात. 

           पूर्वीची पिढी आजच्या पिढीला नावे ठेवत असते. पण बघा आधीच्या पिढीपुढे आयुष्याच्या सर्व स्तरांवर निवडायला एकदोनच पर्याय असत. अगदी वस्तू विकत घ्यायच्या असो , लग्न करायचं असो की शिक्षण ,  नोकरी असो. हे किंवा ते किंवा फारतर फार हे . पण आताच्या पिढीपुढे पर्याय काय आहे हे बघण्यातच वेळ जावा ईतके पर्याय आहेत . मग निवडण्याची प्रक्रीया त्यानंतर. तुमच्या बुद्धी चा आणि भावनांचा जास्त कस लागतो जगायला. जाणिवपूर्वक निवड नाही केली तर भावनांमधे वाहवत जाणे येवढेच हातात ऊरते.

चूक बरोबर कमी जास्त असे काही नसते . गरज आणि  आनंद , समाधान याचा ताळमेळ ज्याला घालता आला तो जिंकला. 


आनंदी

2 comments:

  1. आनंदी ..‌‌तुझालेख आवडला.. मार्मिक भाष्य आणि मुद्देसूद .. थेट पोहोचणारा आणि विचार करायला लावणारा

    ReplyDelete

मध्यस्थ

 मध्यस्थ                    फक्त दूरदर्शन होतं त्या जमान्यात एक मध्यस्थ नावाची टेलीफिल्म पाहिली होती. राजन भिसे ,अरूण जोगळेकर आणि लालनसारंग ...