Saturday, November 14, 2020

ऊपास

 ऊपास 


      " मॕडम , त्या अमुक पेशंटच्या मिसेस आल्या आहेत. तुम्हाला भेटायचय. त्या खूप बडबड करताहेत. पण त्या काय बोलताहेत  मला काहीच कळत नाहीये. त्या तुमच्याशी भांडायला आल्या आहेत असही म्हणताहेत .मी पाठवतीय बरं का त्यांना आत. " 

    माझी रीसेप्शनीस्ट फोनवरून सांगायच्या ऐवजी आत येऊन सांगून गेली . 

   मला ते अमूक पेशंट चांगलेच परीचयाचे होते. गेली सातआठ महीन्यांपासून नियमित येत होते . त्यांच्या मिसेसने भांडायला यावं असं काही आठवेना. बरं आणि या सातआठ महीन्यात यांची मिसेस एकदाही सोबत आलेली नव्हती क्लिनिकला. मी जरा बुचकळ्यातच पडले . तेवढ्यात अमूक पेशंटच्या मिसेस आणि त्यांचा तरूण मुलगा दोघे आत आले. मुलाच्या चेहर्यावर हास्य होते. दोघे बसत नाही तोच मिसेस थोड्या ऊच्च स्वरात बोलायला लागल्या , " तुम्हीच सांगितलं न यांना ऊपाशी राहायला ?  अहो यांना काही त्रास झाला तर मी काय करायचं . यांना फोन करून सांगून टाका की असलं काही करायचं नाही. " 

  एकदम धाडकन विषयाला असा हात घातल्याने मला पटकन संदर्भच कळेना या काय बोलताहेत. माझ्या चेहर्यावर प्रश्न चिन्हच होतं . आणि नीटसं न कळल्याने " काय नक्की काय झालंय  ? " असं एकीकडे मेंदूला ताण देत विचारलं . 

त्यावर त्यांनी पुन्हा सगळं तश्याच पद्धतीनं सांगितलं . तो पर्यंत माझा मेंदू काय घडलं हे आठवू लागला नी अरेच्या देवा असं आहे होय. असे मनातच म्हटलं. 

        हे  अमूक पेशंट यांना माधवबागेच्या ट्रीटमेंट नी चांगला फरक पडला होता. फक्त पुढे भविष्यात त्रास होऊ नये म्हणून मी यांना वजन कमी करायला सांगितलं . ( त्यावेळेस माधवबागेचा सुप्रसिद्ध डाएट बॉक्स याचा शोध लागायचा होता अजून ज्याने यांचे वजन लगेच कमी झाले असते ) पण आहार नियोजन करूनही वजन कमी होत नव्हते. या अमूक पेशंटची कफप्रकृति असल्याने वजन कमी होणे हे आव्हानच होते. म्हणून मी त्यांना पूर्ण दिवस नाही तर फक्त आठ तासाचे लंघन आठवड्यातून एक वेळा करायला सांगितले होते. 

        बाप रे या कारणासाठी माझ्याशी कुणी अगदी भांडायलाच येईल अशी मी कधी कल्पनाही केली नव्हती. 

      मी त्यांच्या मिसेसना लंघन कशाप्रकारे काम करते वगैरे शास्त्रीय माहीती द्यायचा प्रयत्न केला. हो प्रयत्नच... कारण त्या घरूनच त्यांचं माझ्याकडे येण्याचं टार्गेट ठरवून आल्या होत्या. त्यामुळे मी काहीही सांगितलेलं त्यांच्या आतपर्यंत जातच नव्हतं नी ते मला त्यांच्या चेहर्यावरूनच कळत होतं की माझे शब्द वाया जाताहेत. मात्र शेजारी बसलेल्या तरूण मुलाला सगळं समजलं. त्यानेही आईला समजून सांगायचा प्रयत्न केला पण व्यर्थ.  त्यांचा हेका एकच ते असे आठ तास ऊपाशी राहीले तर त्यांना त्रास होईल चक्कर येईल वगैरे वगैरे बरच काही. त्या तासाभरात ऊच्चरवाने त्या पुन्हापुन्हा जेंव्हा तेचतेच सांगत राहील्या तेंव्हा त्यांच्या मनातला ताण कमी होण्यासाठी मला माघार घ्यावी लागली. फक्त लगेच फोन करून सांगा हा हट्ट मात्र मी पुरवला नाही. 

      लंघन ऊपास या बाबत आपल्याकडे खूपच गैरसमज पसरले आहेत. मात्र आपण हल्ली ज्या पद्धतीने  ऊपास करतो त्या अर्थी ऊपास नव्हे हे तुम्हाला लक्षात आलेच असेल. खरं तर भारतीय संस्कृतीमधे तिथीनुसार असंख्य ऊपास सांगितले आहेत. एकभुक्तं ,  नक्तं , फलाहार , फक्त पाणी पिऊन ,  निर्जळी , बिन मिठाचे , फक्त ऊकडलेल्या भाज्या ..... असे बरेच ...त्या सगळ्याला आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. पण हे ऊपास आरोग्याला घातक आहेत असा गैरसमज पसरवण्यात आधुनिक शास्त्राच्या डॉक्टरांचा खूप मोठा हातभार आहे. ऊपासाने बिपी वाढतं पित्त वाढतं चक्कर येते अशा गोष्टी जाणून बुजून नव्हे पण त्यांच्या तोंडून सहजपणे गेल्या अनेक वर्षांपासून बाहेर पडतात कारण ॲलोपथीची पित्तावरची सोडून ईतर औषधे ही ऊपाशीपोटी घेतली तर पित्त वाढतेच. त्यामुळे गोळ्या चालू करताना ऊपास करायचे नाहीत असे पथ्थ ते सांगतात.  ऊपास बंद करा ताबडतोब असे गंभीरपणे सांगणारा सगळ्यात आघाडीवर मधुमेह तज्ञ असतो. कारण नीट समजून घ्या . रक्तातली साखर तीव्रपणे कमी करणार्या गोळ्या जेंव्हा चालू असतात तेंव्हा ऊपाशी राहीलं तर साखर जास्त कमी होऊन धोका ऊत्पन्न होऊ नये म्हणून मधुमेही रुग्णाला ऊपास घातक असे वाक्य वर्षानुवर्षे म्हटले गेल्यावर सगळ्याच आजाराच्या रुग्णांना ऊपास घातक हा गैरसमज कानगोष्टींप्रमाणे समाजात पसरला .  आयुर्वेदामधे तर लंघन ही एक चिकित्सापद्धतीच सांगितलीय. त्यामुळे ऊपास ( लंघन ) हे निरोगी आणि रोगी या दोन्हीही अवस्थेत करता येते. हो अगदी ऊच्चरक्तदाब मधुमेह हृदयरोग असलेल्या रुग्णांनाही करता येते. फक्त ऊपासाबद्दल शास्त्रीय माहीती असलेल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांच्या देखरेखीखाली करावा ही विनंती. 

  जपानी बॉयॉलॉजिस्ट Yoshinori Oshomi यांना 2016 चे नोबेल या ऊपाशी राहाण्याच्या संशोधनावरच मिळालय हे तुम्हाला माहीतच असेल . त्यामुळे आधुनिक शास्त्राचा शिक्काही बसलाय या लंघनावर की हे घातक नाहीये तर ऊलट शरीर दुरुस्त होण्यासाठी आवश्यक आहे.

     आता दिवाळीचे पदार्थ दाबून खाल्ल्यावर एक ऊपास तो बनता है !  बरोबर ना !

डॉ.आनंदी साठये

Sunday, November 8, 2020

हुशारी

 

हुशारी

    माझी अजून एक माझ्यापेक्षा लहान मैत्रीण.तीचा एक छोटा अनुभव खूप काही सांगतो. ही मैत्रीण शालेय जीवनापासूनच हुशारच.पुढे पदवी, सुवर्ण पदक अशी सगळीच शैक्षणिक कारकीर्द सामान्यपणे आपण ज्याला हुशार म्हणतो त्याच गटातली. तसाच तीचा नवराही.कॉलेजमध्ये एकमेकांच्या प्रेमात पडले.शिक्षण पूर्ण झाल्यावर (आंतरजातीय)लग्न केले.लग्नानंतरही करीयरसाठी वर्षभर दोघे वेगवेगळ्या गावी राहीले. वर्षानंतर राजाराणीचा एकत्र संसार सुरू झाला.स्वतंत्र विचारसरणीच्या हुशार व्यक्ती एकत्र राहील्यानंतर बारीकसारीक वाद, कुरबुरी होतातच तशा ईथेही सुरू झाल्या. मैत्रीणीची आई आठवड्यातून दोनदा तरी मैत्रिणीला फोन करत असे . (आंतरजातीय विवाह असल्याने आईला काळजी वाटत असणार )

    तर बोलताना साहजिक या कुरबुरी " हा असेच वागतो!हा असेच म्हणाला " अशा स्वरूपात आईपर्यंत जायला लागल्या. त्यावर मग तू असे कर- तू असे सांग वगैरे सल्लेही आईकडून यायला लागले. पुढे पुढे झालं असं की काही वाद झाल्यावर आणि त्या संबंधी आईला सांगितल्यानंतर पुढे दोनएक दिवसात या नवरा बायकोंमधला वाद मिटून जात असे, नी पान पलटले जात असे. पण आईच्या डोक्यात मागचे वादाचे पानच चालू असायचे.मग आई फोनवर बोलताना जावयाच्या त्या वागण्याचा संदर्भ देऊन बोलत असे. दोन तीन वेळा असे झाल्यावर माझ्या मैत्रीणिला जाणिव झाली की हे काहीतरी चुकतय. आमच्या दोघातले वाद चहाच्या पेल्यापुरतेच होताहेत. पण आईच्या डोक्यात मात्र ते आठवडाभर रेंगाळतात. आणि आईने परत तेच विचारले की मलाही ऊगाचच तो वाद आठवत राहातोय. आईच्या मनात जावयाबद्दल अढी राहातीय हे मैत्रिणीच्या लक्षात आले तसे तीने ठामपणे ठरवले यापुढे आईला या बारीक कुरबुरी सांगायच्या नाहीत. चांगलं घडलेलच सांगायचं. " हे ठरवल्यापासून वाद कमी होत गेले नि जावयाबद्दलचे आईच्या मनातले प्रेमही तसेच राहिले.

        हे ऐकून मला तीच्या या भावनिक हुशारीचे जामच कौतुक वाटलं. ती फक्त मार्क मिळवण्यातच हुशार नव्हती तर भावनांचे नियोजनही तीने हुशारीने केले.

       हुशारी, बघा ना हुशारी कशाकशाची असते.वरचे उदाहरण भावनिक हुशारी म्हणता येईल.पण आपण  मात्र साचेबद्ध पद्धतीने भरपूर मार्क मिळवणारा तो हुशार असे शैक्षणिक वयात लावलेले लेबल पुढे आयुष्यभर वागवत राहतो. गणित सोडवणारा हुशार की हुशारीने गणिते सोडवणाऱ्या माणसाला कामाला ठेवून व्यवसाय करणारा हुशार ? संशोधन करणारा हुशार कि संशोधनाचा उपयोग सामान्य माणसापर्यंत पोहोचवणारा हुशार ? 

      संस्कृतमध्ये एक श्लोक आहे ...त्याचा शेवटचा भाग असा आहे कि योजकस्तत्र दुर्लभः ,म्हणजे  गुणवान हुशार माणसांच्या  हुशारीचा समाजाला उपयोग करून घेणारा योजक असतो तो दुर्लभ आहे . हा योजक मनुष्य तुमच्या मार्कांच्या परीक्षेत अव्वल असेलच असे मात्र नाही. बघा प्रत्येकाच्या वर्गात  अशा काही व्यक्ती असतातच,ज्या जेमतेम काठावर पास झालेल्या असतात नि पुढे आपल्याला यशस्वी व्यावसायिक वा राजकारणी किंवा कंपनी मालक वा उद्योजक,संचालक,संस्थांचे अध्यक्ष ,प्रसिद्ध समाजसेवक वगैरे कोणत्याही स्वरुपात आपल्या समोर अचानक येतात. त्या अशा एकदम यशस्वी व्यक्ती म्हणून पुढे येतात तेंव्हा तुम्ही चकित होता का ? अरे हा किंवा ही तर धड पासही होत नव्हती आणि पहा किती पुढे गेली / गेला ? तुम्ही चकित झालात याचा अर्थ तुम्ही पण पारंपारिक मार्कांच्या हुशारीवरच विश्वास ठेवणारे आहात असा होतो. प्रत्येक जण हा कशात न कशात हुशार असतोच. फक्त या हुशारीची जाणीव त्या व्यक्तीला स्वताला व्हायला लागते किंवा दुसर्या कोणीतरी करून द्यायला लागते इतकेच. 

    या सगळ्यात भावनिक हुशारी म्हणजे भावनांचे नियोजन करणारी हुशारी आपल्या शारीरिक,मानसिक,कौटुंबिक आणि सामाजिक आरोग्यासाठी गरजेची आहे, हो न ?

 

डॉ. आनंदी साठये

Sunday, November 1, 2020

जाणिवपूर्वक स्वीकार

 

जाणिवपूर्वक स्वीकार

    माझी एक मैत्रीण माझ्यापेक्षा वयाने बरीच लहान . तीला मी गेली दहा वर्ष खूप जवळून ओळखते . तीची माझी मैत्री झाली तेंव्हा तीच्या लग्नाला दोनेक वर्षे झाली असतील नी एक मुलगीही झालेली होती. हीचे लग्न ठरवून एकाच जातीत दोघांच्या पसंतीने  आनंदाने झालेले. एकच जात पोटजात चालीरीती असल्या तरी प्रत्येक घराची वेगळी जीवनशैली असते. ती नेमकी हीच्या बाबतीत सासर माहेरची एकदम विरुद्ध. माहेरी माणसांचा गोतावळा, आला गेला सतत पै पाहूणा,  खाणे पिणे, गप्पा ,मजा मस्ती ,सण वार ,फोन वरून पण अघळ पघळ बोलणे असं आनंदी पण आरोग्याच्या दृष्टीने थोंडं मसालेदार वातावरण.

    तर सासरी राबता थोडा कमी चौकोनी आपल्याच चौकटीत राहाणारं कुटूंब . लवकर ऊठून लवकर झोपणे.  ठराविक जीवनक्रम जेवणाचीही चौकट ठरलेली. चौकटीबाहेर अबरचबर खाण्याचं वेड नाही की अघळपघळ गप्पा नाही . स्वयंपाकाची पद्धतही थोडी वेगळी कमी तेलाची साधी . तीच्या बोलण्यात नेहेमी ‘आमच्याकडे’ नी ‘यांच्याकडे’ असे शब्द यायचे. ‘आमच्याकडे’ म्हणजे माहेरी नी ‘यांच्याकडे’ म्हणजे सासरी. म्हणजे तीने अजून सासर आमचे असा स्वीकार केलेला नव्हता मनातून. तशी ती आनंदातच होती. पण प्रत्येकच संसारी बाईला आपला संसार आहे मनोहर तरी गमते ऊदास असाच वाटतो तसा तीलाही वाटत होता. पण हे मनोहारीपण शब्दातून काही व्यक्त व्हायचे नाही. एकाच गावात सासर माहेर असून माहेरी सारखे जायची परवानगी पण नव्हती. त्यामुळे माहेरचं अप्रूप होतचं. हळूहळू वर्षे ऊलटली .नी हीच्या सांगण्यातली बोलण्यातली भाषा बदलायला लागली. माहेरी खूप दिवस राहायची वेळ आली तर कुरकुर करायला लागली. नी सासरकडचे नकळतपणे ‘आमचे’ झाले. माहेरी राहीलं की रूटीन बिघडून जातं, सारखे दिवसभर खातच असतात मग वजन वाढते. जागरणं झालं की डोकं दुखतं असं काही बाही सांगू लागली . स्वताच्या घरी म्हणजे सासरी गेल्यावर हुश्श वाटायला लागलं.

   आमच्या डोळ्यादेखत पण अतिशय सावकाश हा बदल घडला .नी हा आपोआप घडत गेला. प्रत्येक लग्न झालेल्या स्त्री बाबत घडतच असतो. पण हा जीवनशैली बदलातला स्वीकार जर जाणिवपूर्वक केला असता तर ‘यांच्याकडे’ पासून ‘आमच्याकडे’ हा बदल लवकर घडला असता. नी संसार लवकर मनोहारी झाला असता.

     हृदयरोग, बीपी, डायबेटीस ,स्थौल्य या रोगांचा घरात शिरकाव झाल्यावर असच काहीसं घडतं . कुटुंबात एकच व्यक्ती या रोगाने पिडीत असेल तर सगळ्या घराची जीवनशैली बदलणं ईतरांना अन्यायकारक वाटतं. यांना पथ्य आहे आम्ही का आमचं मन मारायचं असा काही वेळेस निरोगी सदस्यांचा प्रश्न असतो.  जिथे या पथ्याचा मनापासून स्विकार असतो तिथे रोग कायमचा आटोक्यात येतो. जिथे मला परत कधी खायला मिळेल या ईराद्याने पथ्य ही तात्पुरती केलेली  ॲडजस्टमेंट असते तीथे परत परत आजार डोके वर काढू शकतो. बरेच जणं या प्रकारचा जीवनशैलीचा आजार झाल्यावर केवळ घरच्यांच्या आग्रहापायी पथ्य पाळतात. तर काही जणं असेही ऊद्गार काढतात “ आधी ऐपत नव्हती सगळी वर्षे काटकसर करण्यात गेली आता आरामाचे खायचे दिवस आले तर हे पथ्यपाणी मागे लागलं.” हे वाक्य तर सगळ्यात जास्त रोगाच्या विरोधात काम करतं. मुळात चांगलं चुंगलं खाणं म्हणजे फक्त तळलेल गोड खाणच नी म्हातारपणी आरामात आयुष्य घालवणं म्हणजे व्यायाम न करणं ऊशीरा ऊठणं असा पक्का समज मनात असतो त्यामुळे हे वाक्य येतं. ऊलट त्या वाक्याचं रुपांतर “ ईतकी वर्षे संसार संभाळण्यासाठी नुसती दगदग धावपळीत गेली स्वताच्या प्रकृतीकडे लक्ष द्यायला वेळच नाही मिळाला आता पैसे नी वेळ हातात आल्यावर सगळं लक्ष प्रकृती नीट करण्यात आणि छंदात घालवणार.” असे केले तर जास्त छान नाही का ?

कोणतीही चांगली सवय लावण्यासाठीची पहीली पायरी म्हणजे माझी आधीची सवय आरोग्यदायी नाहीये हे मान्य करणं आणि मला ती बदलायचीय त्यासाठी मला नावडत्या गोष्टी खायला , करायला लागल्या तरी चालेल हे स्वताशी स्वीकारले तरच बदलाला सुरूवात होते. तुम्हाला बाहेरची व्यक्ती बदलूच शकत नाहीत तुम्हीच फक्त स्वताला बदलू शकता.

त्यामुळे मनापासून स्वीकार हा आनंदाचा राजमार्ग आहे.

       जाता जाता एक पुलंचं वाक्य आठवलं , वैताग घालवायचे माझे एक तंत्र आहे . शेजारचा रेडियो ठणाणा करत असला न की ती गाणी माझ्यासाठीच लावली आहेत , असे म्हणून मी ऐकतो . मग आपोआप राग कमी होतो.

                   डॉ. आनंदी साठये.  


 


 

मध्यस्थ

 मध्यस्थ                    फक्त दूरदर्शन होतं त्या जमान्यात एक मध्यस्थ नावाची टेलीफिल्म पाहिली होती. राजन भिसे ,अरूण जोगळेकर आणि लालनसारंग ...