पुलं ...
तमाम मराठी वाचकांच्या पसंतीचं पहीलं नाव. . माझा सहा वर्षांनी मोठा भाऊ बारावीत गेल्यावर त्याचं मराठी विषयाचं पुस्तक वाचलं . ( मी सगळ्यात लहान असल्याने माझी पुढच्या अनेक यत्तांची मराठीची पुस्तके वाचून झालेली असायची ) त्यात विठ्ठल तो आला आला नावाची पुलंची भन्नाट एकांकिका होती. तेंव्हा पुलंचा बहुतेक पहीला परीचय झाला.
नंतर पुलं हे पुस्तकातून नाही तर कॕसेट रूपाने भेटले. आमच्या वाड्यात शेजारी अखंडपणे मोठमोठ्याने रेडीओ टेप असे कायकाय लावलेले असायचे. ( पुलंनी म्हटल्याप्रमाणेच शेजार्याचा रेडीओ आपल्यासाठीच लावलाय या धर्तीवर ऐकायला आम्ही शिकलो होतो ) तर आठवत नाही वय पण सातवीत वगैरे कधीतरी असामी आसामी कानावर पडलं नी कान देऊन ऐकू लागले. हे काहीतरी भन्नाट आहे कळलं. नी असंख्य वेळा ऐकून ते त्या काळी जवळजवळ तोंडपाठ झालेलं. मग काय वाचनाची फारच आवड असल्याने वाचनालयातून पुस्तक आणताना आवर्जून पुलं शोधलं जायला लागलं.आणि जादूची पेटी ऊघडावी तशी त्यांच्या पुस्तकांचा प्रचंड खजिना हाती लागत गेला. पुढे घरात टेप आल्यावर त्यांच्या कथाकथनाची पारायणं होऊ लागली. रोजच्या जीवनातल्या प्रसंगात त्यांचं एकतरी वाक्य आठवायचं नी त्या प्रसंगी म्हटलं जायचं. समोरचा पुलं प्रेमी असला तर मग दुधात साखर.
पुढे मुलं मोठी झाल्यावर त्यांना येवढी वाचनाची आवड नव्हती याचे थोडे वाईट वाटत राहायचे. घरात भरपूर पुलंची पुस्तके संग्रही आहेतच . पण ती मुलांनी पुष्कळ नंतर वाचली. हल्लीच्या तरुण पिढीचा कनेक्ट कदाचित वेगळा असेल असे वाटले.
पुलं हा दोन माणसातला भावबंध कसा असतो याचा अनुभव देणारे हे दोन प्रसंग . सहा सात वर्षांपूर्वी मुलीच्या कॉलेजच्या ॲडमिशननिमित्त तीच्या ऐवजी मी गेले होते. आणि एका वर्गात मला बसावे लागलेले. आजूबाजूला सगळी अठरा वीस वयोगट. मी एकटीच मोठी. मी नुकताच नवा मोबाईल घेतलेला आणि खूप कष्ट करून प्रयोग करून पुलंच्या कथाकथनाच्या आधी जो हार्मोनियमचा तुकडा वाजतो तो रींगटोन म्हणून बसवलेला. आणि मी फोन सायलेंट नव्हता केलेला कारण तीथे बरीच गडबड होती. माझा फोन वाजल्यावर शेजारची माझ्या मुलीच्या वयाची मुलगी मला म्हणाली काकू पुलं. ही रींगटोन कुठे मिळाली. मी कित्ती शोधत होते मला देता का ? मला हर्षवायूच व्हायचा राहीला. माझ्या मुलांना नाही तरी या पिढीतल्या कुणालातरी माझ्यासारखं वेड आहे बघून समाधान वाटलं.
दुसरी आठवण याच रींगटोनची. ही बरीच वर्षे माझ्या मोबाईलला होती मोबाईल बदलला तरी. एक अतिशय दुर्गम भागात राहाणारा पण सुशिक्षित नोकरी करणारा पेशंट चेकींगला आलेला. माझा फोन वाजला तर म्हणाला पुलंचे हार्मोनियम ना ? बापरे . मला धक्काच बसला. मग त्या खेड्यातल्या खेडवळ भासणार्या पण पुलप्रेमी पेशंटशी छान गप्पा मारता आल्या.
असे हे पुलंचं साहीत्य सर्व आयुष्याला व्यापणारं .एकमेकांना जोडणारं . रोजच्या आयुष्यातल्या प्रसंगात एखादं त्यांचं वाक्यआठवून स्मित पसरतं आपोआप. मग पुलं ईथेच तुमच्या आमच्यात कायम आहेत असे वाटत राहाते.......
आनंदी
12 जून
