Sunday, April 16, 2023

भ्रमण मंडळ - सिंहगड सहलीच्या नोंदी








 भ्रमण मंडळ - गडावरच्या सहलीच्या नोंदी


कॕनडाहून मैत्रीण येणार होती पुण्यात. ग्रूपमधे लगेच प्लानिंग सुरू. होस्टेल वास्तव्याची पाच वर्षे 24 तास एकत्र घालवलेला ग्रूप . या मैत्रिणी ला भेटून 25+ वर्षांचा काळ लोटलेला. ठिकाण तारीख ठरवून गडावर रात्र काढायचे ठरले.

ईतके आधी ठरवूनही संसाराची गद्दे पंचविशी पार केलेल्या काही मैत्रिणींना अगदीच टिपीकल बायकी पारंपारिक अडचणींपासून सुटका नाही हे जाणवले. ( बहुतेक सगळ्या नोकरी करीयर करणाऱ्या  असूनही अडचणी मात्र सांसारीक होत्या )

पण तरीही या सांसारीक अडचणी नसलेल्या किंवा त्या अडचणींवर मात केलेल्या किंवा अडचणींकडे निर्धाराने डोळेझाक केलेल्या  अशा चारच जणी राहीलो. मग गडावर धमाल करण्यासाठी दुसऱ्या  शाळामैत्रीणींच्या ग्रूपमधे आवाहन केले तर चक्क तिघी ऐनवेळी तयार झाल्या .( त्या तिघींना खरोखर सलाम ). अशा सात जणींनी सिंहगडावर प्रस्थान केले. त्या सहलीच्या या नोंदी बरं का .....


 समाजमाध्यमांवर बायकोचे आणि बायकांचे विनोद फिरत असले तरी बायकांच्या ग्रूपमधे नवर्यावर सगळ्यात धमाल विनोद होत असतात. ( आणि ते विनोद बायका ऊगाच बोंबा मारत ईकडे तिकडे व्हायरल करत नाहीत. ) 


वयाची पंचविशी आणि संसाराची पंचविशी अशा दोन गद्धेपंचविशी पार केल्याने एकप्रकारचे निलाजरे विनोदी शहाणपण घेऊन गडभर फिरलो.( मोठमोठ्याने हास्यविनोद करत फिरणार्या सात बायका गडावर पाहिल्या असतील तर त्या आम्हीच )

 

जेवणाच्या चवीपेक्षा आयते गरम समोर वाढले जाण्याचे सुख स्त्रीजन्मास आल्याशिवाय कळणारच नाही.आणि मग चव आणि आयते गरम असे दोनही मिळणे म्हणजे स्वर्गसुखच नाही का ?आणि तेही कसे ?   किर्र रात्री दरीतून खाली हजारो चमचमाणारे दिवे पुण्याचे अस्तित्व दाखवत दूरवर ऊभे वर चांदण्यांचे आभाळ आणि दरीकाठी सहभोजन ...हाच तो स्वर्ग ( जाता जाता....बायकांच्या स्वर्गाच्या कल्पनेत रूंजी घालणार्या अप्सरा नसतात तर स्वच्छता आणि स्वैपाकाच्या कामांना पुरूष असतात. बाकी रिझवण्यासाठी त्या स्वयंभू असतात ).


गडावरच्या निर्जन बंगल्यावर काळजीवाहू अनिता आणि तीचे कुटूंब सदैव तत्पर होते. 

पैसे देऊन मागवलेले अन्न असले तरी ते टाकून वाया जाऊ नये याची सगळ्याच जणी काळजी घेत होत्या. आणि आमचे वाढून झाल्यावर अनिताचे जेवण तीला पडणारे काम या बद्दल सर्वच जणींना सहकंपा होती याचे आश्चर्य वाटले.पण त्यातही दृष्टीकोन होते. दुपारी जेऊन संध्याकाळची आॕर्डर देताना एकीला वाटले बापरे आपण त्यांना किती कामाला लावतोय

तर दुसरी अगं जेवढी जास्त आॕर्डर देऊ तेवढी त्यांची जास्त कमाई होईल...


गडावरचा सूर्योदय बघायला जायचय पण शरीराचा सूर्योदय चहाशिवाय कसा होणार ? 

अनिताला ईतक्या सकाळी ऊठवायला जीवावर येत होतं.अपराधीपणे तीला ऊठवून एक जण म्हणाली आम्ही आमचा चहा करून घेऊ का ? तुम्ही झोपा ...

अशी मागणी तीला क्वचितच अनुभवायला मिळाली असेल.


गडावरचा सूर्यास्त अनुभवून परत येताना काळभैरवाच्या देवळात गेलो. स्वच्छ दगडी देऊळ . आत छोटा गाभारा. कालभैरव आणि जोगेश्वरीच्या दगडी मूर्ती झेंडूच्या माळा ल्यालेल्या . मंद तेलाचा दिवा आणि गाभार्यात पिवळा बल्बचा प्रकाश. सगळ्या मांडी घालून खाली अगदी मूर्तीसमोर बसलो. शांतता अनुभवल्यावर देवांवरून ऊपनिषदांपर्यंत चर्चा गेली.  बाहेर दोन जणं देवाचे दर्शन घ्यायला आलेले लवकर कळलेच नाही. त्यांना पाहून घाईने ऊठू लागलो तर ते म्हणाले असू दे आम्ही तुमची छान चर्चा रंगलेली ऐकत होतो.....


जो सूर्य अस्ताचा पाहीला आणि ऊगवतीचा पण पाहीला.खरं तर अनुभवला. पण पहील्यांदाच अनुभवत असल्याचा नवथर ऊत्साह होता सगळ्यांमधे . त्या सूर्याला साक्षी ठेवून पुनःपुन्हा भेटण्याचे आणि नित्यनवीन जगण्याचे  ठरविले....


आनंदी

16/4/2023

मध्यस्थ

 मध्यस्थ                    फक्त दूरदर्शन होतं त्या जमान्यात एक मध्यस्थ नावाची टेलीफिल्म पाहिली होती. राजन भिसे ,अरूण जोगळेकर आणि लालनसारंग ...