Sunday, October 25, 2020

भावनिक कल्पकता

 

मुलगा डिझाईनची एंट्रन्स देऊन घरी आला. 

मी टिपीकल पालक प्रश्न विचारला " कशी गेली रे  परीक्षा ?"   

त्याने टिपीकल टीनेज पाल्य एकाक्षरी ऊत्तर दिले " हां........

मी त्याने अधिक शब्द तोंडातून काढावे म्हणून विचारले "तरी !  काय काय आलं होतं ?"  

थोडं वैतागत ऊत्तरला "अग तुला नाही समजणार . प्रश्न कॉँप्लिकेटेड असतात. " 

तरीही मी पालकांच्या ठिकाणी असलेल्या अंगभूत  चिवटपणे विचारलं " एखादा प्रश्न सांग तर. समजेल मला."  

आई ऐकतच नाही म्हटल्यावर न चिडता म्हणाला , "  अग एक कार्टूनचं चित्र होतं आणि ते चित्र पलीकडून बघीतलं तर कसं दिसेल ?  ते काढायचं होतं ."  

मी चकीतच झाले. किती कल्पना करायची होती. आता अशी कल्पना करायला spatial intelligence असायला हवा. काही जणांमधे तो नैसर्गिकच असतो पण तरी त्याला प्रॕक्टीस मार्गदर्शन असेल तर हा प्रश्न लवकर सोडवता येईल. मला तर मुलांनी काय काय चित्र काढली असतील असा विचार करूनच मजा वाटली. 

मग वाटलं आपल्या मनातल्या विचारांचं , भावनांचं , प्रतिक्रियांचं  पण असच आहे नाही का ? एखादा प्रसंग आहे त्यात मला पलीकडून बघण्याची क्षमता आहे का ?  म्हणजे मी आणि माझ्यासमोर जी व्यक्ती ऊभी आहे त्या व्यक्तीच्या नजरेतून होत असलेला संवाद समजून घेता येतोय का ?   म्हणजे बघा आपण टीनेज वयात काहीतरी बेफिकीर वागत असताना आईवडील जेंव्हा काळजी करतात तेंव्हा आपली चिडचिड होते किंवा हसू येतं . पण आई वडिलांना काय वाटतय ही भावना आपल्याला आईवडील झाल्यावर आणि आपली मुले टीनेज झाल्यावरच लक्षात येते. म्हणजे पलीकडे प्रत्यक्ष पोहोचल्यावरच कल्पना येते. पण अलीकडे असतानाच समजलं  तर ??? (त्या परीक्षेतल्या ऊत्तराप्रमाणे) हे ज्यांना जमतं  त्यांचं मुलांशी मित्रत्वाचे नाते तयार होते. ही पलीकडून पाहाण्याची भावनिक बुद्धी , स्थल , काल , प्रसंग , नाते अशा अनेक प्रतलांमधून आजमावी लागते. काही जणांमधे अशी निसर्गदत्त क्षमताच असते. अशा व्यक्तींना समाजात कुटूंबात तणावाच्या प्रसंगांमधे , वादविवादांमधे , तर कधी out of court settlement करण्यासाठी मध्यस्थ म्हणून नेहमीच बोलावले जाते. पण प्रयत्नाने ती क्षमता आपल्याला वाढवता येऊ शकते. परीक्षा द्यायचीय म्हटल्यावर मुलांना क्लास लाऊन रात्रंदिवस अभ्यास करायला लावतो , मग भावनिक सामाजिक कौटुंबिक आयुष्य जगायला पण अशी तयारी करायला काय हरकत आहे ?  असे झाले तर बरेचसे वादाचे प्रसंग आपण टाळू शकतो.  पेशंट्सना समजून घेणारा  डॉक्टर , स्टाफला समजून घेणारा एखादा आवडता  बॉस , एकत्र कुटूंबाला बांधून ठेवणारी एखादी आजी किंवा काकू , शाळेतल्या अ ते  फ तुकडीला आवडणारा शिक्षक , अशी भावनिक कल्पक लोकांची  ऊदाहरणे आजूबाजूला नजर टाका दिसतील. याला तुम्ही वळण म्हणा,  संस्कार म्हणा कल्पकता म्हणा , किंवा प्रशिक्षण म्हणा किंवा माईंड ट्रेनिंग म्हणा. गेल्या बारा वर्षांमधे जीवनशैलीच्या रोगाचेच रूग्ण पाहाताना लक्षात येतं की बरे होण्यात कौटुंबिक वातावरणाचा खूप मोठा हातभार असतो. ज्या कुटूंबात भावनिक कल्पक माणसे असताता तिथे रोग लवकर पळून जातो. जिथे कल्पकता कमी तिथे वाद जास्त तिथे हे आजार रेंगाळत राहातात. 

चला तर मग बघायला शिकू या  नात्याच्या प्रसंगाच्या नी काळाच्या  पलीकडून जग कसं दिसतय ते.

हो !  काळाच्या पलीकडून म्हणजे काळ लोटल्यानंतर आपल्या भावनांमधे मतांमधे विचारांमधे प्रचंड फरक पडत असतो त्याची कधीकधी जाणिवही नसते. नी जाणिव झाल्यावर आपला आपल्यालाच धक्का बसतो. याबद्दल मात्र पुन्हा कधीतरी.....


डॉ. आनंदी साठये

Saturday, October 17, 2020

विचार तैसे वर्तन ...

 विचार तैसे वर्तन ... 

         आमच्याकडे एक लॅब्राडोर कुत्रा होता. तो लहान असताना मी रोज फिरवायला घेऊन जात असे. पण हळूहळू तो मोठा झाला नी ताकदवान झाला. पण हे लॅब्राडोर कुत्रे  दिसायलाच नुसते ताकदवान दिसतात. ॲग्रेसिव नसतात. प्रेमळ असतात तर कधी घाबरटपणाही करतात.  सकाळी लवकर फिरायला जाताना रस्त्यावरची कुत्री मागे लागत असत. आणि ती कुत्री खूप जोरदारपणे भुंकत मागे लागायची , मला जाम भिती वाटायची . नी आमचाही कुत्रा घाबरून पळायला लागायला लागला की तो मलाच पळवत न्यायचा. मग ही सकाळची फेरी माझ्यासाठी नकोसं काम होऊ लागलं, ते मी टाळायचा प्रयत्न करायला लागले. घरातले बाकीचे सदस्य म्हणायचे आम्ही जातो तेंव्हा तो असे नाही करत. तू काहीही सांगतेस.  या दरम्यान टीव्हीवर कोणत्यातरी चॅनलवर मिलान सिझर नावाच्या माणसाचा एक प्रॉब्लेमॅटीक कुत्र्यांना कसं समजून घ्यायचं नी कसा त्यांच्यात बदल घडवून आणायचा असा प्रोग्राम लागत असे. तो आम्ही सगळेच खूप आवडीने पाहायचो. त्यात एका एपिसोडमधे त्याने सांगितलं की कुत्र्याच्या मालकाच्या भावना कुत्र्याला कळतात. तुम्ही घाबरलात तर तोही घाबरतो. म्हणजे एका प्रॉब्लेमॅटीक कुत्र्याचे प्रकरण सोडवताना त्याने असा निष्कर्ष काढला की प्रॉब्लेम कुत्र्यात नसून मालकाच्या वर्तनात आहे. मग त्याचं त्याने प्रात्यक्षिकही करून दाखवलं . त्या मालकाच्या (मालकीण होती खरं तर ती ) वर्तनात हळूहळू बदल घडवून आणल्यावर त्या कुत्र्याच्या वर्तनातही फरक कसा पडला हेही सविस्तर दाखवलं. तो एपिसोड पाहील्यावर मला तर एकदम युरेका !!  असच झालं. लगेच दुसर्या दिवशी मी मनाला समजवलं की रस्त्यावरची कुत्री दुरून भुंकतात नी जवळ येत नाहीत. घाबरायचं नाही. ठामपणे ठरवलं नी काय आश्चर्य माझी जशी भिती गेली तसा माझ्या देहबोलीत फरक पडला असेल. त्या दिवशी आमच्या कुत्र्याने पळापळ केली नाही. पहील्याच दिवशी फरक दिसल्यावर मला आत्मविश्वास आला  आणि पुढेपुढे रस्त्यावरची कुत्री पण भुंकेनाशी झाली. 

          हेच खरंतर माणसांनाही लागू पडतं नाही का ?. आपण कुटूंबात कामाच्या ठिकाणी वावरत असताना आपल्या चेहर्यावरच्या भावावरून , देहबोलीवरून समोरचा माणूस नकळतपणे निष्कर्ष काढत असतो . याचे भान जर आपल्याला असले तर त्याचा ऊपयोग करून घेता येतो.( याचा ऊपयोग चोरही करतात बरं का !   हे साखळीचोर पर्सचोर बायकांची देहबोली बघूनच ठरवतात कुणाची साखळी ओढली किंवा पर्स ओढली तर आपल्याला कमीत कमी प्रतिकार होईल. )  एखादी गोष्ट दुसर्याला पटवून देताना ती स्वताला पटलेली असेल तरच तसे भाव आपल्या चेहर्यावर येतात आणि समोरच्याला नकळतपणे पटते . बोले तैसा चाले या धर्तीवर विचार तसे वर्तन..  तुम्ही जो विचार करता तो तुमच्या चेहेर्यावरून आणि देहबोलीतून रीफ्लेक्ट होत असतो. अर्थात यात काही वाकबगार असे अभिनेते असतात की जे पटलेले नसताना दुसर्‍याला पटवून देतात. पण तसे फार थोडे. विचार वर्तनातून दिसतात.  वर्तन बदलले तर विचार भावना बदलतात किंवा या उलटही .. विवेकनिष्ठ विचारसरणी आपल्याला हेच शिकवते. मग विचार तपासा , वर्तन , भावना तपासा. काय बदलण्याची गरज आहे ते बघा नी सुरूवात करा. अपेक्षित परीणाम दिसणारच......

Friday, October 9, 2020

गती – शरीराची .. मनाची...

 गती – शरीराची .. मनाची...




                 एक 55/58 च्या आसपासचे गृहस्थ कंसल्टींगमधे आले. गोष्ट जुनी आहे, तेंव्हा रीसेप्शनिस्ट नव्हती. गर्दी पण नव्हती. डॉक्टर एकट्याच आहेत पाहून आत येऊन बसले. म्हाणाले , “खरं तर बायकोचे फक्त रिपोर्ट्स दाखवायला आलो होतो. पण गर्दी नाहीये तर तीला फोन करून बोलवलय. जवळच राहातो आम्ही. ती येईपर्यंत हे रिपोर्ट्स पाहा.” 

 मी रीपोर्ट चाळत विचारले "  त्रास काय होतोय ? " 

 " काही नाही दम लागतो. पण रीपोर्ट्स नॉर्मल आहेत." 

 पाहीलं तर खरच टू डी ईको ,स्ट्रेस टेस्ट ,एक्स रे ,ब्लड टेस्ट सगळं काही नॉर्मल होतं . 

             मी रीपोर्ट्स बारकाईने बघत असताना ते अस्वस्थ होऊन दाराकडे बघत असलेले मला जाणवत होते. काही वेळाने त्यांनी माझ्यासमोरच फोन लावला नी वैतागत पण हळू आवाजात विचारले "  अग पोचली कशी नाहीस अजून ? लवकर ये . 

           मी मग त्यांच्या बायकोची सर्व मेडीकल हीस्टरी घेतली. मग बोलायला काही ऊरले नाही. पुनः अस्वस्थ होत म्हणाले "  मी बाहेर ऊभा राहातो. ती आली की घेऊन येतो " 

"  हो चालेल " मला चालणारच होतं.

         पाचेक मिनीटांनी ते पुढे नी त्यांच्या मागे त्यांच्यापेक्षा किंचित स्थूल अशा बाई धापा टाकत आत आल्या. दोघेही बसले.

“ बोला. कधी पासून दम लागतोय. नी चालल्यावर लागतोय कि बसल्या बसल्या ? " 

        त्या  काही बोलायच्या आत ते गृहस्थ " अग बघ डॉक्टर पण म्हणाले रीपोर्ट नॉर्मल आहेत. पण डॉ तरी हीची तक्रार आहेच , सारखी दमते . ऊरक म्हणून तो नाही . आताही बघा किती वेळ लावला यायला. नी बघा किती दमलीय. “

       मी काहीच न बोलता फक्त त्यांच्या मिसेसकडे या अपेक्षेने पाहीले की तुमचं काय म्हणणं आहे ? 

        मग त्या म्हणाल्या , "  अहो डॉक्टर मला घाई झाली की दम लागतो. आता मला या दहा मिनटात तीन वेळा फोन केले यांनी . आता फोन आल्यावर साडी बदलणे , घराला कुलूप घालणे , चालत येणे याला काही वेळ लागतो की नाही ? पण यांना ते पटतच नाही. हल्लीच नाही तर नेहेमीचच आहे हे यांचं . तरुण वयात धावले यांच्या म्हणण्याप्रामाणे पण आता दम लागतो मला घाई केली की. माझी मी असले कि मला नाही लागत दम.

बाईंच्या  दम लागण्यामागचे कारण सापडले..

         आयुर्वेदात सांगितलेल्या तीन प्रकृती नुसार आपल्या प्रकृतीनुरूप शरीराची आणि मनाची एक गती बाय डिफॉल्ट आपल्याला मिळालेली असते  . म्हणजे वात आणि पित्तप्रकृतीची माणसे गतीमान असतात तर कफप्रकृतीची मंदगती असतात. याचा अर्थ काय तर बघा... बोलण्याची गती ,चालण्याची गती ,लिहीण्याची गती ,खाण्याची गती ...तुम्ही निरीक्षण कराल तर ती प्रत्येकाची अगदी एकाच कुटूंबातल्या प्रत्येकाचीही  गती वेगवेगळी असते. खालची वाक्ये बघा हं ....

" माझा नवरा फार चेंगट आहे तासभर जेवत बसतो. मागचं आवरायला किती ताटकळायला लागतं " 

“आमच्या नव्या सूनबाई , ऊरकच नाही कामाचा !  चहा करायलाच ईतका वेळ लावते की कसा माझ्या मुलाला वेळेत डबा मिळणारे कोण जाणे ? " 

असे असंख्य प्रसंग नी त्या व्यक्तीसाठी लावलेली असंख्य लेबले – चेंगट , हळूबाई , मंद ,किंवा झपाटा ,वात ,सुपरफास्ट  अशी आपल्याला आठवतील. 

             पण गती ही बाय बर्थ मिळणारं हार्डवेअर आहे हे लक्षात ठेवले पाहिजे . तुम्ही कितीही बदलायचा प्रयत्न केला,  टोमणे मारले तरी अहं.... ऊलट काम बिघडण्याचीच शक्यता जास्त .आपल्या घरातील किंवा आपल्या आॉफीसमधील लोकांची स्वभावत: कामाची गती समजून घेतली तर काम सोपं होईल आणि कामाचं वातावरण पण खेळीमेळीचं राहील.

           दुसरं असं की कधी कधी आपणच आपली गती समजून घेत नाही आणि अवास्तव अपेक्षा ठेवतो. बाहेरून कोणीच कामाचा दबाव टाकत नाही पण तो आपला आपणच घेतलेला असतो  . विशेषतः चाळीशी पन्नाशीनंतर हे जाणवतं. ठराविक वेळेत ठराविक पद्धतीने कामे झालीच पाहीजेत अशा स्वभावाच्या माणसांना वय वाढल्यानंतर शरीराची गती वयोमानानुसार थोडी  कमी झालीय , (आणि त्या गतीला शरीर साथ द्यायला   कोणताही नियमित व्यायामही केलेला नसतो ) याचा स्वीकार  नसेल तर मन पूर्वी प्रमाणेच पटापट कामाचा धडाका ऊरकायला बघतं नी शरीर मात्र साथ देत नाही मग अस्वास्थ्य येत.“पूर्वीप्रमाणे उरकत नाही आता ....अशी भावना अस्वस्थता आणते. कधी कधी निराशा आणते असा अनुभव आहे. अशा वेळेस थोडं थांबावं .... मनात आणि शरीरात डोकवावं . शरीरात आजार नाही ना खात्री झाल्यावर मनाची गती थोडी निवांत करावी. शारीरिक व्यायाम करावा. रोजची कामे टार्गेटेड न करता आनंद घेत गाणी ऐकत करावी. शरीर आणि मनाची कामे करताना शर्यत न लावता एकमेकांना समजून घेत कामे करावीत. 

         शेवट ठरलेला आहे आपल्याला फक्त प्रवास करायचाय पण तो आनंदाने  खिडकीतल्या दृष्यांची   प्रत्येक थांब्याचीही मजा घेत नवनवीन सहप्रवाशांशी गप्पा मारत करायचाय . आज मानसिक स्वास्थ्य दिना निमित्त सर्वांना आयुष्याचा हा प्रवास आनंददायी व्हावा यासाठी शुभेच्छा.......

डॉ. आनंदी साठये

Wednesday, October 7, 2020

वेदना मनाच्या



वेदना मनाच्या 


“ या आजोबांना फक्त चौकशी करायचीय “ क्लिनिकची वेळ संपत आलेली असताना रिसेप्शानिस्ट फोनवर म्हणाली. 

“ हो पाठव “ मी.

“ डॉक्टर तुमच्याकडे झोपेवर काही आहे का खात्रीशीर ? “ एक वृद्ध किडकिडीत गृहस्थ दारातूनच विचारते झाले.

“ कुणाला , तुम्हाला प्रॉब्लेम आहे का झोपेचा ? 

“ हो , खूपच जुना . “ ते दारातूनच बोलत होते .

“ तुम्ही आत या. बसा. आता सांगा नक्की काय प्रॉब्लेम आहे . वयानुसार झोप होतच असते कमी  .” मी 

“ नाही हो , माझा झोपेचा प्रॉब्लेम कोणताही डॉक्टर सोडवू शकलेला नाहीये. गोळी घेऊन पण टक्क रात्रभर जागाच असतो. तुमच्याकडे आहे का काही ठोस औषध ?

“ तुम्हाला काही ताण आहे का ? “मी 

“ ताण ? तो तर आयुष्याभाराचाच आहे. “

“ म्हणजे ?” मी चमकून विचारले.

“ तुम्हाला वेळ असेल तर बोलू का ? मोठी स्टोरी आहे. "

खरे तर क्लिनिकची वेळ संपली होती .पण आजोबांना मधेच अडवणे जीवावर आले .

“ हो आहे वेळ बोला ना “ मी.

“ माझा लहानपणी खूप छळ झाला हो ....“ चेहेर्यावरही वेदना होती हे सांगताना .

“ कोणी केला ? “ मी 

“ सावत्र आईने ... असे म्हणून त्यांनी त्यांच्या लहानपणी त्यांना आणि त्यांच्या लहान बहिणीला सावत्र आई हातावर चटके कसे देत होती .आणि किती छळ झाला  अशी खूप मोठी सावकाशपणे  आर्त  करूण कहाणी लहानपणीच्या आयुष्याची मांडली. हे सांगताना ते सगळा त्रास पुन्हा पुन्हा अनुभवत होते.त्यांच्या हातावरचे चटके माझ्यापर्यंत पोहोचत होते “.  काय सांगू तुम्हाला नंतर मी शिकलो घराबाहेर पडलो , नोकरीला लागलो. माझे लग्न झाले. मुले कमावताहेत , सगळे चांगले आहे , पण हे लहानपणीचे चटके काही मनातून जात नाहीत हो. मी बायकोला हे सगळं नेहमी सांगत असतो . या चटक्यांपायी मला बिलकुल झोप येत नाही..

“ वय काय हो तुमचे ?

  ७६ ...


   मी पार निशब्द .....


    लहानपणी ७/८ वर्षाचे असताना चटके मिळाले. त्या नंतर पुढची किमान ५० वर्षे या गृहस्थांनी  चांगली घालवली . आताही आयुष्यात काही प्रॉब्लेम नाहीये. एवढी चांगली घालवलेली  ५० वर्षे मनात न रेंगाळता ती वाईट ५/६ वर्षे मोठी ठरली.   दर वेळेला हि स्टोरी सांगताना त्या यातना ते  चटके तितक्याच तीव्रतेने भोगतही  असतील आणि मग या छळाची तीव्रता अनेक वर्षांमध्ये अनेक पटीने वाढली असणारे. 

    किती हे भयंकर......


      बर्याच जणांना आपल्या वाईट काळाची स्टोरी सांगायला आवडते. वाईट त्रासदायक दुःखी अनुभवातून सांगून मोकळं होणं वेगळं .काही जण ती स्टोरी त्रयस्थपणे सांगतात. हे सांगताना ते यातून बाहेर आलेले आहेत हे जाणवतं. तर काही जण ती स्टोरी सांगताना दर वेळेस त्या वेदना पुन्हा पुन्हा अनुभवतात. आणि या परत अनुभवण्याने मनासोबत हळू हळू शरीरावर परिणाम होत जातो. नि मग आपण त्याला PSYCHOSOMATIC  डिसऑर्डर असे नाव देतो. यामुळे  झोप न येणं , पचनाच्या पोटाच्या तक्रारी सतत जाणवणारी पाठदुखी, मानदुखी ,ईतकचं नाही तर ईतर अपथ्याची जोड याला मिळाली  तर  थायरॉईड, ऊच्चरक्तदाब ,डायबेटीस या आजारातही रुपांतर होऊ शकतं .  

       ते गृहस्थ गेल्यावर मी आपला माझ्या मनाचा धांडोळा घेतला . आपण नाही न कोणते दु:ख कुरवाळत ? दुःखाची स्टोरी सांगताना ते दु:ख पुन्हा अनुभवतोय का हेही आठवून पाहिले. 

      तुम्हीही घ्या  तुमच्या मनाचा आढावा.असे काही दु;ख , यातना  रेंगाळत असेल तर मनाच्या बंदिस्त कवाडातून त्याची सुटका करून टाका आणि मुक्त व्हा आनंदी व्हा ,निरोगी राहा .......


डॉ. आनंदी साठये

मध्यस्थ

 मध्यस्थ                    फक्त दूरदर्शन होतं त्या जमान्यात एक मध्यस्थ नावाची टेलीफिल्म पाहिली होती. राजन भिसे ,अरूण जोगळेकर आणि लालनसारंग ...