Tuesday, October 22, 2024

मध्यस्थ






 मध्यस्थ 

                  फक्त दूरदर्शन होतं त्या जमान्यात एक मध्यस्थ नावाची टेलीफिल्म पाहिली होती. राजन भिसे ,अरूण जोगळेकर आणि लालनसारंग . कलाकारही लक्षात आहेत. पूर्ण कथा आठवत नाही पण तरूण मुलगा आणि विक्षिप्त वडील यांच्या मधे आईची होणारी कुचंबणा दाखवलेली हे आठवतय . अशी नाईलाजाने मध्यस्थ होणारी आई अनेक वर्षे लक्षात राहीली नी पुढे आई म्हणून मध्यस्थ व्हावं लागल्यावर वारंवार या फिल्मची आठवण येत असे.पण मला स्वतःला मध्यस्थ व्हायला बिलकुल आवडत नाही. 

" त्याला सांग असें वागून चालणार नाही. जरा कदर कर मोठ्या माणसांची "

 "तिला सांग.....

"बाबांना सांग...

अशी वाक्याची सुरुवात झाली की लक्षात ठेवावे आपल्याला  आता मध्यस्थ भूमिका पार पाडावी लागणार आहे .

असो.....

            अगदी जवळच्या नात्याताला किंवा जवळच्या मैत्रीतला  मध्यस्थ प्रकार फारच धोकादायक. बहुतेक वेळेला दोन व्यक्ती एकमेकांशी मोकळेपणाने बोलू शकत नाही किंवा एकमेकांसमोर राग व्यक्त करू शकत नाही, समोरच्या व्यक्तीच्या रिअॅक्शन ची  भीती वाटत असते अशाच वेळेला कुणाला तरी मध्यस्थ घातलं जातं.

        मुले आणि वडील यांच्यामध्ये आईला मध्यस्थ होण्याची वेळ म्हणजे अगदी पूर्वम्पार चालत आलेली परंपराच म्हणाना. क्वचित प्रसंगी काही घरांमधून वडलांवरही ही वेळ येत असेल. येथे मध्यस्थ ही आई असल्यामुळे  ती बहुतेक वेळेला विवेकी मार्ग काढत असते. कारण दोन्ही पार्ट्या तिच्या प्रेमातल्या असतात.पण बरेचदा या कसरतीत तिला दोन्हीकडून वाईट पणा घ्यावा लागू शकतो. 

           सासू आणि सून यांच्यातला मध्यस्थ होण्याची नवऱ्यावर जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र तो नवरा बहुतेक वेळेला गरीब बिचारा असा असतो कारण मामला प्रेमाचाच असतो , पण  यातून विवेकाने ठामपणे मार्ग काढण्याची क्षमता फारच कमी पुरुषांमध्ये असते.( चू. भू. दे. घे.) ती क्षमता नसेल तर दुर्लक्ष करणे हा अगदी सुप्रसिद्ध खात्रीशीर उपाय वापरला जातो. 

बघा बरे....

 "माझा निरोप दिला का तिला / त्यांना?" (या वाक्याचा context  खुप तर्हेतर्हेचा असू शकतो )

 "हो दिला ना!  - खालच्या आवाजात मोघम (या वाक्याचा context  साऱ्या जगतात एकच असतो )

 "मग..(pause ).. ..  काय म्हणाली ती /त्या????

 "काही नाही..." - खालच्या आवाजात मोघम.  

 "असं कसं ????? काहीss च नाही म्हणाली / म्हणाल्या ?????"

 "नाही ग .. .. .. जाऊदे आता मला चहा देते का ? " ( विषय बदलण्याचे  कसब जितके दमदार तितका हा संवाद लवकर संपतो )

आता वरच्या संवादात कोण कोणास म्हणाले हे हुशार लोकं ओळखतीलच. विवेकपूर्ण शब्दयोजना करण्यासाठी मेंदूची एनर्जी खर्च करण्यापेक्षा हा उपाय खूपदा जालीम इलाजच ठरतो .

               दोन मैत्रिणी मधली मध्यस्थ मैत्रीण, दोन मित्रांमधील मध्यस्थ मित्र, हा बहुतेक त्यांना जोडणारा दुवा असतो किंवा त्यांचे प्रेम जुळवून देणारा असतो त्यांची भांडणं दूर करणारा असतो तो एक छान गोड प्रकार असतो.

              पूर्वी लग्न जुळवताना तर मध्यस्थ हा हमखास असायचा . अजूनही ठरवून होणाऱ्या  लग्नातही बरेचदा असतो. पूर्वी तर लग्न ठरवताना सगळी मदार या मध्यस्थावर असायची आणि  असंही घडायचे  की लग्न झाल्यावर उघडकीस यायचे , मध्यस्थ माणसाने काय काय बाता मारल्या ते.

             प्रेमातही बरेचदा मध्यस्थ असतोच. पण तो बिचारा बहुतेक वेळेला निरोप्या असतो किंवा दोन्हीकडची रडगाणी ऐकणारा मूक खांदा असतो.

            हा  मध्यस्थ असतो ना तोही एक व्यक्ती आहे ज्याला मन भावना आहे आवड निवड आहे हे आपण विसरतो.त्याच्या भावभावना त्याचा बघण्याचा दृष्टिकोन त्याची वाक्य फेकण्याची लकब या सर्वावर अवलंबून असतं की हे  गैरसमज दूर होणार आहेत का आणखी वाढणार आहेत. कारण या मध्यस्थ्यामुळे गैरसमज आणि दरी वाढल्याची भरपूरच उदाहरण आहेत.

        म्हणून माणसाने जे समोरासमोर बोलता येत नाहीये ना ते बोलूच नये. मध्यस्था करवी निरोप देण्यापेक्षा स्वतः तोंड देण्याचे धाडस तरी करावे किंवा शांत तरी , बसावे काय वाटतं तुम्हाला ??


आनंदी 

Saturday, March 2, 2024

ऍलिस इन वंडरलैंड


साधारण 3 रि किंवा चौथीत असतानाची ही गोष्ट आहे. म्हणजे फार तर वय 8-9 वर्षे.
मला एके दिवशी अचानक जे काही दिसतंय ते छोटं दिसायला लागलं. म्हणजे मी आमच्या घराच्या खोलीत बसले होते. तर कपाट असें एकदम लांबून पाहिल्यासारखे छोटे. आई समोर दिसली तर तीही छोटी. बरे छोटी म्हणजे मला तिच्याशी खाली वाकून बोलावे लागतंय अशी छोटी नाही तर ती खुप मागे गेल्यावर कशी दिसेल तशी. आणि ती बोलताना तिचा आवाजही लांबून येत असल्या सारखा येत होता. आता मी हे अगदी डिटेल सांगतीये पण त्यावेळेस माझा निष्कर्ष एवढाच होता की मला छोटं छोटं दिसतंय. मी डोळे चोळून पहिले पण ते छोटे दिसणारे काही गेले नाही. बहुतेक संध्याकाळ होती. मी आईला सांगून बघितलं की मला छोटे छोटे दिसतंय असें. माझी आई एकदम साधी माऊली. तिला या माझ्या या तक्रारीतून काहीही निष्कर्ष काढता आला नाही. ती म्हणाली उद्या डॉक्टर कडे जाऊ. मी सकाळी उठले तेंव्हा हे छोटे दिसणे गायब झालेले. पण परत दोन तीन दिवसांनी व्हायला लागले. मी फारच चीड चीड केली. माझा एकच धोशा मला आठवतोय. मला छोटं छोटं दिसतंय मला छोटं छोटं दिसतंय.
( या व्यतिरिक्त मला काहीही त्रास होतं नव्हता. ना ताप सर्दी खोकला ना डोकेदुखी. आणि हो माझी लहानपणीच्या घटनांची स्मरणशक्ती खूपच दांडगी आहे. खोटे वाटू शकते पण सगळ्यात लहानपणचे म्हणजे अगदी 2 वर्षांचे पण मला अगदी थोडे अंधुक आठवते. अर्थात या लहानपणच्या आठवणी मोठे होत असताना सतत बोलल्या गेल्या आठवल्या गेल्या की लक्षात राहतात )

 हा काळ 78/79 चा तेंव्हा फॅमिली डॉक्टरच असायचे सगळ्या तक्रारी निवारण करायला. आमचे फॅमिली डॉक्टर तर खूपच अबोल होते गोड हसायचे आणि खूपच हळू बोलायचे. ते काय विचारायचे ते मला कधीही ऐकूच यायचे नाही.त्यांच्या कडे गेलो. त्यांनी छोटे दिसतंय म्हटल्यावर माझे डोळे चेक केले (हो पूर्वी फॅमिली डॉक्टरच हेही काम करायचे )काहीही झालेलं नाहीये असें जाहीर केलं. आम्ही घरी आलो. झाले!आई म्हणाली, काही नाही होते तुला, सारखी अंधारात पुस्तकं वाचत बसतेस त्यामुळे होतय. 
आता पुन्हा तसें झाल्यावर तक्रार करायचा माझा मार्ग ख)खुंटला.नी त्यात मला दुसरा कसलाही त्रास होत नव्हता की दृश्य स्वरूपात दिसतही नव्हता.
(माझे बाबा बदली निमित्ताने दुसऱ्या गावीच राहायचे. नी वर्षातून दोन तीनदाच घरी यायचे. त्यामुळे त्यांच्यापर्यंत हे जाण्याचा प्रश्नच आला नाही.)

मग शेवटी माझा मीच मार्ग शोधून काढला. असें व्हायला लागले की मी बाहेर अंगणात जाऊन आकाशाकडे बघत बसत असें.तिथे छोटे मोठे असें काही होणार नाही हा माझा अंदाज खरा ठरला. खुप वेळ आकाशाकडे पाहून मग परत एखाद्या वस्तूकडे पाहायचे. नॉर्मल दिसत असेल तर छानच.खेळायला पळायचे.असें होतं राहिले अधून मधून छोटे छोटे दिसत राहिले.
 

असें साधारण नक्की आठवत नाही पण असें छोटे छोटे दिसणे आठवी नववी पर्यंत होत राहिले.नंतर कधीतरी ते बंद झाले. नक्की कधी ते फारसे नीट आठवत नाही.

पुढे 
मेडिकल ला गेल्यावर एक दोन वेळा पुस्तके शोधून पहिली काही सापडतंय का ते पाहायला (आमच्या वेळेस अर्थात पुस्तके हाच मार्ग होता शोधण्याचा )पण काहीच सापडले नाही. 
आपल्याला होत असलेली लक्षणें कुणा सरांना विचारणे म्हणजे स्वतःला वेडे ठरवणे आहे हे मात्र वैद्यकीय शिक्षण घेतल्यावर नक्की कळाले होते. एक दोन मैत्रिणींना सांगून पाहिलेले पण माझ्यासारखे कुणालाही होत नव्हते.

वय वाढेल तसें असें काही होत होते हे डोक्यातून बाहेर पडले . परत कधी तसें झालेही नाही. प्रश्न मिटला

अनेक वर्षांनतर मी 40 शी पार केल्यानंतरची गोष्ट. एकदा एका दुपारी tv वर डिस्कवरी चॅनेल वर एक कार्यक्रम लागला होता त्यात एकजण मला होत असलेली लक्षणे वर्णन करत होता. मी एकदम अलर्ट होत सगळा कार्यक्रम पहिला आणि युरेका युरेका... असें म्हणून चक्क नाचही केला.
माझ्या लक्षणांना नाव होते चक्क. आणि अशी अनेक जण या जगात आहेत. आणि शक्यतो हे लहान मुलांमध्येच सापडते. नी पुढे आपोआप बंद होते. त्या कार्यक्रमात सांगितलेले खुप महत्वाचे वाक्य असें होते की हा कोणताही मानसिक आजार नाही कारण हे भास असले तरी हे भास होताहेत याची या मुलांना पूर्ण कल्पना असते. आपल्याला जे दिसतंय ते प्रत्यक्ष खरे तसें नाहीये. आपल्याला तात्पुरते वेगळे दिसतेय. 
Distorted images. मग अजून बरेच ज्ञान असें मिळाले की जसे छोटे दिसते तसें काही जणांना मोठे दिसते. काही जणांना हळू हळू चाललंय आजूबाजूचे असेही वाटते. असें त्यात बरेच प्रकार असतात.ज्यांना उत्सुकता आहे त्यांनी सगळ्यात शेवटी दिलेली वैद्यकीय माहिती वाचावी. पण या सिंड्रॉम बद्दल तशी एक वाक्यता नाहीये. त्याला काही ठोस ट्रीटमेंट नाही (मुळात ट्रीटमेंट ची गरजही नाही निदान माझ्या उदाहरणावरून तरी दिसतंय हे ) 

या सर्व लक्षणांचे नाव काय? तर ' ऍलिस इन वंडरलँड सिंड्रोम'  असें नाव का?  ज्यांनी alice in wonderland  ही लहान मुलांची कथा वाचली असेल किंवा सिनेमा पहिला असेल तर  त्यांना हे नक्की कळेल.
याचे कारण काही वेळेस ताप इन्फेकशन किंवा मायग्रेन हेही  नमूद केले आहे.
काहीही कारण नसणारे पण बरेच आहेत.


डिस्कव्हरी वरचा कार्यक्रम ऐकून अत्यंत excite होत माझ्या  मुलाला आणि मुलीला (वय 14 आणि 18 ) हे सर्व सविस्तर सांगितले तर 14 वर्षांचा माझा मुलगा म्हणाला त्यात काय मलाही होतं असें. मी म्हटले अरे!  मग तू कधीच बोलला नाहीस ते. तर तो म्हणाला की मला सगळे मोठे दिसते मी लहान लहान होतो. नी मला वाटले सगळ्यांनाच असें होते म्हणून काही बोललो नाही.

धन्य... काय बोलणार...

नंतर नेटचा वापर वाढल्यावर यू ट्यूब ला हा सिड्रॉम सर्चला टाकल्यावर 4/5 व्हिडीओ सापडले ते तुम्हीही पाहू शकता. त्या सर्व व्हिडीओ मधले खालचे कमेंट मी वाचले, " अरेच्या मलाही व्हायचे....वगैरे. त्यात एकही हरीचा लाल मला भारतीय सापडला नाही. अर्थात मी झाडून सर्व व्हिडीओ नाही पहिले.
पण आपल्यासारखे कुणी आहे का???म्हणून केवळ हा ब्लॉग प्रपंच.
मी आणि माझ्या मुलाव्यतिरिक्त असा लक्षणसमुच्चय असलेली कुणीही ओळखीची व्यक्ती मला सापडली नाही.खरे सांगायचे तर सापडायला मी शोधू तरी कशी? अशी लक्षणे कुणास सांगायला गेल्यावर आपल्याकडे काय वेडी बाई आहे अशा नजरेने पाहायची शक्यताच जास्त.
( नाही म्हणायला एका सिनियर सायकीयाट्रीस्ट मॅडम ची थोडी ओळख झाल्यावर घाबरतच त्यांना या ऍलिस इन वंडर लँड या नावासकट विचारले तर त्यांनी मेडिकल भाषेत मला थोडक्यात वेड्यातच काढले. असें सायकोलॉजी मधे काही नाही. ड्रग्स घेतल्यावर आणि सिझोफ्रेनिया मधे असें भास होतात अशी टिप्पणीही त्यांनी केली. (की जर मला माहित होते ) मग मात्र मी नाद सोडला.)

आता पन्नाशी ओलांडल्यावर वाटतंय जाऊ दे काय वेड्यात काढायचे ते काढू दे. अशी लक्षणें लहानपणी कुणाला दिसत होती काय त्यांनी या ब्लॉग ला कमेंट. करावा.
( या अनुभवावर विनोद(सभ्य )वगैरे करायचा असेल तरी वेलकम. )

आनंदी 

याची वैद्यकीय माहिती कॉपी पेस्ट करत आहे.

Abstract
Background: The Alice in Wonderland syndrome (AIWS) was conceptualised in 1955 as a group of distortions of visual perception, the body schema and the experience of time. Although 60 years have passed since then, very little is known yet about the syndrome. This is surprising since the AIWS has important diagnostic and therapeutic implications.

Aim: To provide an overview of the literature on the AIWS.

Method: For this review, a literature search was carried out in PubMed and the historical literature.

Results: The search yielded 70 papers with a total of 169 case descriptions. As these papers indicate, the AIWS has many causes, the main ones being neurological, infectious and substance-related; sometimes the causes are psychiatric. Among adults and elderly patients the disorders described are mainly neurological; among young people encephalitis is fairly common. Treatment needs to be directed at the (assumed) underlying condition, although in almost half of the cases the patient's main requirement is reassurance rather than treatment. Prevalence rates are unknown, but studies in the general population indicate that the symptoms of the AIWS occur more frequently than previously assumed.

Conclusion: Clinical suspicion of an AIWS warrants careful auxiliary investigations and - whenever necessary - treatment. The AIWS should not be confused with schizophrenia spectrum disorders and other perceptual disorders, and it deserves to be included in the research agenda of international classifications such as the DSM and ICD.

PubMed Disclaimer


वेदना असलेल्या नसलेल्या

स्ट्रेस टेस्ट करायला एक मध्यमवयीन पेशंट त्याच्या बायकोसोबत आला होता . स्ट्रेस टेस्ट करताना छातीवर एक उजव्या बाजूला तर 5 डाव्याबाजूला असें लीड चिकटवले जातात. या पेशंटने छातीच्या उजव्या बाजूला काळ्या पेनाने एक उभा लंबगोल आखलेला होता.
"काय झालंय तिथे", - मी
"ते छातीत सारखं दुखतं, मी स्ट्रेस टेस्ट दर 6 महिन्यांनी करतो. मला माहिते इथे लीड लावतात. मग धक्का नको लागायला म्हणून आधीच आखून ठेवलंय", पेशंट.

"इतकं दुखत का? केंव्हापासून?" मी 
"माझी प्लास्टि झालीय ना 2017 ला " पेशंट 

"मग ?"मी 
"मग ती उजव्या बाजूच्या रक्त
वाहिनीत स्टेन्ट बसवलाय ना. म्हणून बरोबर तिथेच दुखतय " इति पेशंट 

"पण प्लास्टि इथून नाही करत दुखायला " मी 
"हो हातातूनच केली. पण इथल्या रक्त वाहिनीत केली ना. तिथेच दुखतय" पेशंट

"दाबल्यावर दुखतं का की असच दुखतं?" मी 
 "दाबल्यावर पण नी तसही सारखं दुखतंच राहत" पेशंट 

"प्लास्टि करायच्या आधी नक्की नव्हतं दुखत?"
"नाही ना. अहो मी फाईल नाही आणली आज तुम्हाला चित्र दाखवतो अँजिओग्राफिचे. उजव्या बाजूच्या रक्तवाहिनीत स्प्रिंग टाकलीय तिथेच बरोब्बर दुखतंय " पेशंट 

मग मी त्यांची स्ट्रेस टेस्ट तयारी होत असताना एकीकडे त्यांना प्लास्टिचा आणि त्या दुखण्याचा कसा संबंध नाही हे समजावून सांगितले

त्या दोघांनाही हे ऐकून खूपच आश्चर्य वाटले. मग मी त्यांनी गोल काढला होता तिथे आजूबाजूला दाब देऊन विचारले दुखतंय काय? तर थांबून विचार करून उत्तर आले, नाही दुखते.

मी विचारले, "तुमच्या हार्ट च्या डॉक्टरना कधी विचारलं नाही का?"तर म्हणाले नाही हो. मला वाटले प्लास्टि केली की सगळ्यांनाच दुखत असेल.

मग स्ट्रेस टेस्ट केली. पूर्ण चालले. हे गृहस्थ रोज 5 की मी रोज चालतात तेंव्हा छाती दुखते का? तर नाही. 

मग परत एकदा हृदयाचे दुखणे नक्की कसे असते, प्लास्टि करतात म्हणजे काय नीट समजावून सांगितले. आत्ता दुखतय त्याचा 6 वर्षांपूर्वी झालेल्या अँजिओप्लास्टिशी तसा काहीही संबंध नाही हे त्यांना समजलंय हे चेहऱ्यावर दिसत होतं. त्या बाईंना तर मोठ्याने हसूच आलं.

मी विचारलं काय झालं? तर म्हणाल्या म्हणजे इतकी वर्ष यांचं छातीतलं दुखणं फक्त मानसिकच होतं की काय?...

एक आठवड्याने ते फॉलो अप ला आले नी म्हणाले तुम्ही सांगितल्यापासून माझे दुखणे 80 % कमी झालंय.

वेदना शारीरिक की मानसिक असा प्रश्न पडेल ना हे वाचून?

पण वेदनेचा /दुखण्याचा /आजाराचा आणि मनाचा खरोखरीच खुप जवळचा संबंध आहे. अज्ञान, भीती आणि गैरसमज यामुळे अनेकदा अनेकांना अनेक लक्षणे दिसत असतात किंबहुना ती लक्षणे ते जवळ बाळगून असतात असें म्हणायला हरकत नाही.

वरच्या उदाहरणात फक्त योग्य ते ज्ञान दिल्याने 80%फरक विना औषधे पडला.आणि म्हणूनच रोगी ज्ञापक( रोगाबद्दलची माहिती )असणे रोग बरा करण्याच्या दृष्टीने खुप महत्वाचे आहे असें आयुर्वेदनेच सांगून ठेवलंय.

हल्ली कोणताही त्रास नसताना तपासण्या करण्याचे प्रमाण वाढले आहे.ही तशी चांगली गोष्ट आहे. पण या प्रकरणात रुग्ण angiography पर्यंत गेला आणि त्याला ब्लॉकजेस सापडले की तो रिपोर्ट पाहून मग नंतर छातीत दुखल्यासारखे व्हायला लागते अशी बरीच उदाहरणे अनुभवास येतात. 

वेदना दुःख हे काही कोणत्या उपकारणाने मोजता येत नाही. त्याचे मोजमाप प्रत्येकाच्या मनात असते. वेदनेचे मोजमाप करायला 1 ते 10 आकडे ठेवून तुमची वेदना किती तीव्र आहे हे विचारले जाते. किंवा दुःखी चेहऱ्याच्या वाढत्या तीव्रतेच्या ईमोजी ठेवून त्या पाहून आपली वेदना कोणती हे सांगायला लावले जाते. पण याचा अर्थ काय? आजाराची अवस्था माझी आणि तुमची ही सारखी असली तरी वेदना मला ती 4  तीव्रतेची वाटतीय तर तुम्हाला 6 तीव्रतेची वाटतीय. म्हणजे ती पूर्णपणे मनावर अवलंबून आहे.
ज्या गोष्टी पूर्णपणे मनावर अवलंबून असतात त्याची तीव्रता आपणच ठरवून कमी करू शकतो किंवा पूर्ण घालवू पण शकतो.

आजार कोणताही असू दे वेदना या मनावर कशा अवलंबून आहेत हे ज्ञान त्याची तीव्रता कमी करायला नक्की उपयोगी पडते. थोड्या सरावाची गरज असते.
रेकी / प्रार्थना कशी काम करत असणार? तर ती तुमच्या मनावर, सहनशक्तीवर वर काम करते. मनाची ताकद वाढली की वेदनांक कमी होतो. मात्र प्रत्येकाच्या मनाची ताकद वाढवायला घालावी लागणारी फुंकर वेगवेगळी असू शकते. 
रोग नसताना वेदना होतात जाणवतात आणि योग्य त्या ज्ञानाने त्या नाहीश्या होत असतील तर आजार असताना असलेल्या वेदना पण योग्य त्या ज्ञानाने नाहीशा होऊ शकतात.
प्रयोग करून पहा.स्वतःवर, इतरांवर. ज्ञान योग्य ते आणि तेवढेच घ्या किंवा द्या. गरज नसताना असलेली वैद्यकीय माहिती चिंतातूर जंतूमध्ये आजार नसताना लक्षणें निर्माण करू शकतो 
( जाता जाता धोक्याचा इशारा - वेदना घालवण्यासाठी हा ज्ञान पाजळायचा प्रयोग अचानक तीव्र पणे उद्भवलेल्या वेदनेवर acute pain करू नये नाहीतर वेदनेने तळमळणारा मनुष्य हाती लागेल ते ततुम्हाला फेकून मारण्याचीच शक्यता )

डॉ. आनंदी 

Friday, March 1, 2024

वेदना असलेल्या नसलेल्या


स्ट्रेस टेस्ट करायला एक मध्यमवयीन पेशंट आला. स्ट्रेस टेस्ट करताना छातीवर एक उजव्या बाजूला तर 5 डाव्याबाजूला असें लीड चिकटवले जातात. या पेशंटने छातीच्या उजव्या बाजूला काळ्या पेनाने एक उभा लंबगोल आखलेला होता. ते पाहून मी विचारले 
"काय झालंय तिथे", - मी
"ते छातीत सारखं दुखतं, मी स्ट्रेस टेस्ट दर 6 महिन्यांनी करतो. मला माहिते इथे लीड लावतात. मग धक्का नको लागायला म्हणून आधीच आखून ठेवलंय", पेशंट 
"इतकं दुखत का? केंव्हापासून?" मी 

"माझी प्लास्टि झालीय ना 2017 ला " पेशंट 

"मग ?"

"मग ती उजव्या बाजूच्या रक्त
वाहिनीत स्टेन्ट बसवलाय ना. म्हणून बरोबर तिथेच दुखतय " इति पेशंट 

"पण प्लास्टि इथून नाही करत तिथे दुखायला " मी 

"हो हातातूनच केली. पण इथल्या उजव्या बाजूच्या रक्त वाहिनीत केली ना. तिथेच दुखतय" पेशंट

"दाबल्यावर दुखतं का की असच दुखतं?" मी 
 "दाबल्यावर पण नी तसही सारखं दुखतंच राहत" पेशंट 

"प्लास्टि करायच्या आधी नक्की नव्हतं दुखत?"

"नाही ना. अहो मी फाईल नाही आणली आज तुम्हाला चित्र दाखवतो उजव्या बाजूला स्प्रिंग टाकलाय तिथेच बरोब्बर दुखतंय " पेशंट 

मग मी त्यांची स्ट्रेस टेस्ट तयारी होत असताना एकीकडे त्यांना प्लास्टिचा आणि त्या दुखण्याचा कसा संबंध नाही हे समजावून सांगितले. 

त्या दोघांना ही खूपच आश्चर्य वाटले. मग मी त्यांनी गोल काढला होता तिथे आजूबाजूला दाब देऊन विचारले दुखतंय काय? तर थांबून विचार करून उत्तर आले, नाही दुखते.

मी विचारले, "तुमच्या हार्ट च्या डॉक्टरना कधी विचारलं नाही का?"तर म्हणाले नाही. आम्हाला वाटले प्लास्टि केली की सगळ्यांनाच दुखत असेल.

मग स्ट्रेस टेस्ट केली. पूर्ण चालले. हे गृहस्थ रोज 5 की मी रोज चालतात आणि तेंव्हा छाती दुखते का तर नाही. 

मग परत एकदा हृदयाचे दुखणे नक्की कसे असते, प्लास्टि करतात म्हणजे काय नीट समजावून सांगितले
हे त्यांना समजलंय हे चेहऱ्यावर दिसत होतं. त्या बाईंना तर मोठ्याने हसूच आलं.

मी विचारलं काय झालं?
तर म्हणाल्या म्हणजे इतकी वर्ष यांचं छातीतलं दुखणं फक्त मानसिकच होतं की काय?

एक आठवड्याने ते फॉलो अप ला आले नी म्हणाले तुम्ही सांगितल्यापासून माझे दुखणे 80 % कमी झालंय.

वेदना शारीरिक की मानसिक असा प्रश्न पडेल ना हे वाचून?

पण वेदनेचा /दुखण्याचा /आजाराचा आणि मनाचा खरोखरीच खुप जवळचा संबंध आहे. अज्ञान, भीती आणि गैरसमज यामुळे अनेकदा अनेकांना अनेक लक्षणे दिसत असतात किंबहुना ती लक्षणे ते जवळ बाळगून असतात असें म्हणायला हरकत नाही.

वरच्या उदाहरणात फक्त योग्य ते ज्ञान दिल्याने 80%फरक विना औषधे पडला.आणि म्हणूनच रोगी ज्ञापक( रोगाबद्दलची माहिती )असणे रोग बरा करण्याच्या दृष्टीने खुप महत्वाचे आहे असें आयुर्वेदनेच सांगून ठेवलंय.

हल्ली कोणताही त्रास नसताना तपासण्या करण्याचे प्रमाण वाढले आहे.ही तशी चांगली गोष्ट आहे. पण या प्रकरणात रुग्ण angiography पर्यंत गेला आणि त्याला ब्लॉकजेस सापडले की तो रिपोर्ट पाहून मग नंतर छातीत दुखल्यासारखे व्हायला लागते अशी बरीच उदाहरणे अनुभवास येतात

वेदना दुःख हे काही कोणत्या उपकारणाने मोजता येत नाही. त्याचे मोजमाप प्रत्येकाच्या मनात असते. वेदनेचे मोजमाप करायला 1 ते 10 आकडे ठेवून तुमची वेदना किती तीव्र आहे हे विचारले जाते. किंवा दुःखी चेहऱ्याच्या स्मायली ठेवून त्या पाहून आपली वेदना कोणती हे सांगायला लावले जाते. पण याचा अर्थ काय? आजाराची अवस्था माझी आणि तुमची ही सारखी असली तरी वेदना मला ती 4  तीव्रतेची वाटतीय तर तुम्हाला 6 तीव्रतेची वाटतीय. म्हणजे ती पूर्णपणे मनावर अवलंबून आहे.
ज्या गोष्टी पूर्णपणे मनावर अवलंबून असतात त्याची तीव्रता आपणच ठरवून कमी करू शकतो किंवा पूर्ण घालवू पण शकतो.
कोणतेही जुने दुखणे रात्री जास्त का वाटते दिवसा कामाच्या नादात कमी का वाटते. ते याच कारणाने.
आजार कोणताही असू दे वेदना या मनावर कशा अवलंबून आहेत हे ज्ञान त्याची तीव्रता कमी करायला नक्की उपयोगी पडते. थोड्या सरावाची गरज असते
( हे मी जुनाट क्रॉनिक दुखण्याबाबत बोलतीये. तीव्र अचानक अक्युट अशा वेदनेबाबत नाही. नाहीतर अक्युट आजारामुळे वेदनेने तळमळणाऱ्या माणसाला तुम्ही ज्ञानामृत पाजायला जाल तर तो मनुष्य तुम्हाला हातात येईल ते फेकून मागण्याची शक्यता जास्त. तिथे आधी औषध उपचार मग ज्ञान )

आनंदी 

Saturday, July 15, 2023

मार्जारपुराण - भाग 1


पुराणातील प्राणीप्रेमी पात्रांची ओळख




 

                     मांजराने आमच्या आयुष्यात प्रवेश केल्यानंतरचे पुराण सांगण्याआधी आमच्या कुटूंबातल्या प्राणीप्रेमाची पार्श्वभूमी सांगते. आमच्या कुटूंबातल्या सहापैकी पाच जणांना प्राणी आवडतात हां. एका सदस्याला प्राणी एकाच कारणांनी आवडत नाही ते म्हणजे स्वच्छता . म्हणजे जर एखादा कुत्रा रोज स्वच्छ अंघोळ करून केस न गाळता शी शू करायला आपापला बाहेर लांब जाऊन परत आल्यावर पाय धूऊन घरात न येता दारातच बसत  असेल आणि आपल्या ओल्या तोंडाने कुणाला सारखा चाटत नसेल तर या या सदस्याला तो चालणारे. 

                 आमच्या घरातले एक भूतपूर्व ज्येष्ठ सदस्य  त्यांना सर्व प्राणी आवडत.  पण कसे पाहा. आमच्या घरी बरीच वर्षे एक लॕब होता. तो मान खाली घालून फक्त त्यांचेच  ऐकायचा ईतकी त्यांच्या बोलण्यात हुकूमत होती. प्राण्यांना कुरवाळणे जवळ घेणे ही त्यांच्या प्रेमाची पद्धत नव्हती तर त्याला वेळेवर फिरायला नेणे वेळेवर खायला घालणे आणि बांधून ठेवणे ही खास त्यांची पद्धत. या पद्धतीत मांजरं बसत नसल्याने मांजरापेक्षा कुत्रा आणि पिंजर्यातले पक्षी आवडीचे. या प्रेमाला "जी हूजूर "प्राणीप्रेम म्हणेन मी .

                          साधारण ही तटस्थता पण तात्विक  प्राणीप्रेम असलेला आमचा सुपूत्र. याचे टोकाचे पण लॉजिकल प्राणीप्रेम कसे  ?  तर एकदा काही वर्षांपूर्वी पुण्यात आम्ही तिघे ( 10 आणि 14 वयाची मुले आणि अस्मादीक  )रीक्षाने जात असताना एका चौकात डावीकडून एका घोड्यावरून एक मुलगा येत होता( लग्नाचा घोडा असावा ) पण त्या घोड्याला  ब्रेक मारता न आल्याने तो रीक्षाला धडकला . रीक्षेवाल्याने खूप मोठा आवाज झाल्याने रीक्षा थांबवली. तर आमचा हा लॉजिकल प्राणीप्रेमी पटकन ऊतरून मागे पळत गेला नी पाच मिनीटाने परत आला. मी विचारले , " काय रे त्या मुलाला लागले का " ? . तर हा म्हणतो ," मी मुलाला बघायला गेलो नव्हतो घोड्याला काही झाले नाही ना ते बघायला गेलेलो. घोडा ऊठून ऊभा राहीला मग मी परत आलो "  याला सगळेच प्राणी प्रेमाचे बर का ? अगदी सव्वा वर्षांचा असल्यापासूनच हे प्राणीप्रेम दिसू लागलेले. पावसाळ्यात अंगणात पैसेकीडे येतात खूप. त्यांना हात लावला की गोल होतात. ते हातात घेऊन हा मुलगा खेळत बसायचा. बेडूक ऊंदीर हातात पकडायला लहानपणापासून शिकला. आगदी समस्त जागाला किळस आणणारा पाल हा प्राणी घरात निघाला तर अजूनही हा मुलगा पालीला हातात धरून घराबाहेर नेऊन टाकतो. मारत नाही. याचे प्राणीप्रेम नैसर्गिक तटस्थ तर्कशुद्ध . एकदा त्याला विचारले तुझ्या जवळच्या व्यक्तीला वाघाने खाल्ले तर काय तुला राग नाही येणार का वाघाचा  ? तर म्हणतो वाघाला काय कळतय  ?  तुम्ही त्याने खावे अशी कृतीच करू नका ना. लांबच राहा त्याच्यापासून . असा हा लॉजिकल प्राणीप्रेमी .

                        त्यानंतर आमची कन्या हिला खरी प्राणीप्रेमी म्हणायला हवी. हिचं प्रेम टोटली भावनिक. सारखं कुरवाळणं मिठ्या मारणं पाप्या घेणं आणि विरहाने अश्रू ढाळणं . पहिल्यांदा लॕबचे पिल्लू पाळायला म्हणून आणले आणि काही महिन्यांनी असे वाटले जरा अवघडच जातय कुत्रं वागवणं , म्हणून त्याला एका फार्म हाऊस वर दिले. कन्येला डायरेक्ट शाळेतून आल्यावरच कळाले. शाळेच्याच ड्रेसवर न खाता पिता रडत संतापत तशीच झोपली . तिकडे त्या पिल्लानेही काहीच खाल्ले नाही. शेवटी त्याला परत आणले. या प्राणीप्रेमापोटीच ती प्राण्यांची डॉक्टर झाली. आणि लॉकडाऊनच्या काळात हिनेच मांजरांना घरात आणून पुराणकथेची सुरूवात केली. 

                          या मुलांचे बाबा , यांचं प्राणीप्रेम हे अनिश्चित स्वरूपाचे. मांजरं लबाड असतात मला आवडत नाहीत हे घोषवाक्य. कुत्रा आवडता नी साप या प्राण्याचे जबरदस्त आकर्षण. पण मांजर घरात आल्यावर न आवडणारा हा  प्राणी यांच्याच मांडीवर बसू लागला नी मग बर्याच गमतीजमती घडू लागल्या. 

                    अस्मादीकांचे प्राणीप्रेम हे  प्राण्यांना स्वातंत्र्य द्या या टाईपचे. मला पिंजर्यातला प्राणी , पक्षी , सतत बांधलेला प्राणी पाहीला की खूपच वाईट वाटत राहाते. बाकी स्पर्शाला गिळगिळीत नसलेले सर्व प्राणी आवडतात. आपले बोलणे कुत्र्या मांजरांना समजते हे त्यांच्या सहवासात राहिल्यावर लक्षात आले.कुत्र्यांशी सगळेच बोलतात पण काय मांजराशी गप्पा मारणारी अस्मादिक अधूनमधून आमच्या घराला दिसू लागले.

                    भरीस भर म्हणजे आम्हाला प्राणीप्रेमी शेजार मिळाला . त्यातल्या दोन महिला सदस्य तर  अतिकाळजीवाहू भावनिक प्राणीप्रेमी गटातल्या.  तर वयस्क पुरूष सदस्य सतत खायला घालू प्राणीप्रेमी.

                 तर हे मार्जार पुराण घडले त्यातशेजारच्या तीनही सदस्यांचाही सहभाग होता.

                आता ही होती कमी महत्वाच्या पात्रांची ओळख. पुराणकथेताले हिरो हिरोईन मात्र कथा ऊलगडेल तसतसे तुम्हाला कळतीलच ....





आनंदी

Monday, June 19, 2023

ऑन ड्यूटी वाघासोबत सेल्फी


                    ईतक्यातच भारताबाहेर एका वाघाच्या राज्याला भेट द्यायचा योग आला. नाव Tiger Kingdom  असले तरी वाघाला गुलाम केलेल्या बुद्धीमान मानवाचेच राज्य होते बुवा ते. 

                    तर आपण कुत्री मांजरी पाळतो तसे ईथे वाघांना लहानपणापासून पाळले जाते असे ऐकले होते. पण गेल्यावर कळले अगदी तस्से नाही तर त्यापेक्षा जास्त पाळलय त्यांना. म्हणजे ट्रेनिंग दिलेले प्राणी ऊठ म्हणता ऊठतात,  बस म्हणता बसतात,  गोलातून ऊड्या मारतात , अगदी नाचता बिचतातही . पण ट्रेन्ड प्राणी रांगेत ऊभे राहून येणार्या माणसांना त्यांच्या पार्श्वभागी हात लाऊ देतील काय ? करून पाहा बरे !  शेजारच्या पाळलेल्या कुत्र्याच्या शेपटीला हात लाऊन पाहा.
. पण मग हीच तर खासीयत होती या टायगरच्या राज्यात. आम्हा पाचपाच जणांना आत सोडत होते. वाघांच्या पार्श्वाभागालाच फक्त हात लावायची ,  अगदी शेपटीही हातात घ्यायची मुभा होती. फक्त पार्श्वच भाग बरे का !  ( नाहीतर पाळलेलाच वाघ आहे म्हटल्यावर  ऊगा मुके घ्यायला जायचा तुम्ही !  म्हणून कुठे हात लावायचा याच्या स्पष्ट सूचना लिहिलेल्या होत्या.) 

                   आमच्या पाच जणांच्या ग्रूपच्या वाट्याला ज्या  दोन वाघांची ड्यूटी होती  ते फारच झोपाळलेले होते. आमच्या पैकी एखादी मागे फोटो काढायला गेल्यावर माशी हाकलायला असते तशा चपट्या काठीने तिथला कर्मचारी त्याला ऊठवत होता. मग वाघ पेंगूळलेले डोळे कसेबसे ऊघडत होता परत मिटत होता. ते पाहून आमच्या दोघी तिघींतली मातुल ममता जागी होत बोलली " नका ऊठवू हो त्याला झोपू द्या बरं  " पण तिथल्या कर्मचार्याने ते ऐकून न ऐकल्यासारखे केले. 

                   मग सगळ्यांच्या सेल्फी झाल्यावर तो कर्मचारी दुसर्या वाघासोबत फोटो काढा म्हणाला. मी  एकातच भरून पावले होते खरे तर  .दुसर्या वाघाच्या पाठीमागे ड्युटीवर नसलेल्या वाघाचा एक पिंजरा होता. तो मस्त पाय वर करून लोळत होता. त्याला बघण्यात मी दंग झालेले होते . तर मला हाका मारून ऑन ड्यूटी झोपाळलेल्या वाघाशेजारी व्यवस्थित ऊभे राहायची ऑर्डरच काढली त्या कर्मचार्यांनी.  

                 ज्याचे पैसे घेतले आहेत ती सेवा कस्टमरची ईच्छा असो नसो पूर्ण करूनच द्यायची ही कर्मचार्यांची सेवाभावी वृत्ती बघून भरूनच आले.

               चला दुसर्या वाघाचीही ड्यूटी त्याने झोपेतच पूर्ण केली. बर्याच जणांच्या वाट्याला जागा वाघ आलेला. ( नंतर फेसबुकवर पाहीले )जांभया वगैरे देत असलेला ,  आळोखे पिळोखे देत असणारा , ऊभा राहीलेला वगैरे.बहुतेक तो पूर्ण खडखडीत जागा होऊन 'मागे कोण आहे बरे ! ' असे त्याला कळायच्या आत त्याच्या जागी दुसरा झोपाळलेला आणून बसवत असतील. 

               पिल्लू वाघांच्या तिथे तर फोटो काढायला जास्त वाव होता. आता खरे तर पिल्लू असल्यापासूनच अशी सेल्फी ड्यूटी लागल्यामुळे मोठे होईस्तवर ही ड्यूटी अंगात मुरत असेल त्यांच्या . मग काही जणांना तोचतोचपणाचा कंटाळा येऊन ड्यूटी अवर्समधे झोपा काढत असतील. असे कंटाळलेले वाघ आमच्या वाट्याला आले असावेत . 

               खरच अशा शेळपाटलेल्या आपल्याकडे ढूंकूनही न बघणार्या या वाघासोबत फोटो काढून आपल्याला काय समाधान मिळत असेल ? आणि का मिळत असेल ?

               याचे ऊत्तर कदाचित आदीम भावनेत असावे. वाघ हा मानव गुहेत राहात होता तेंव्हापासूनचा आपला शत्रू. मग या बलदंड शत्रूची शिकार केली त्याला हरवले तर विजयाचा ऊन्माद असायचाच . आपले सैनिक लढून जिंकले की कसे आपल्याला आनंद होतो तसे या ट्रेनरने वाघाची पार शेळी बनवून आपल्यासमोर ठेवली नी तिच्यासमोर सेल्फी घेताना आपणच तीला शेळी केलीय ही भावना सुखावून जात असेल.   म्हणून का आनंद होत असेल ? 

असे ऊगाचच वाटून गेले.असो .

              ज्यात माझे काहीच कर्तृत्व नाही ते कशाला मिरवायचे या भावनेने खालच्या जबरदस्तीने घेतलेल्या सेल्फीतला सेल्फ क्रॉप करून ऊरलेला ऑन ड्युटी  वाघ पाहायचा असेल तर पाहावा.

             अरे हां ! जाता जाता ना , ऑफ ड्यूटी वाघासोबत जरा बोलत बसले निवांत. म्हटले  ' काय मजाए , भारी ठेप ठेवलीय तुमची . स्वच्छ पिंजरे . स्विमींग पूल . आयते शिकार न करता जेवण . नुस्तं  लोळायचे पैसे घेता बुवा. गरम झाले तर पाण्याचे फवारे  ! व्वा ! 

तर वाघ मिशा फिस्कारून म्हणाला , " ए बाई तू पाहा तुझं तुझं. हिम्मत असेल तर ऊघड पिंजरा . मग बघ पाठीला हात लावायला आलेले तुम्ही सर्व पाठीला पाय लाऊन पळाल  " 

( तो म्हणत होता ते खरे असूनही ) मी बढाईने ऊत्तरले  , "  तूचा बघ तुला ऊघडता येतोय का पिंजरा. आहे का तेवढं डोकं ! " 

हे म्हणताक्षणी वाघोबाने रागाने ऊडीच मारली नी ते पाहून मला पाठीला पाय लावायची वेळ आली.

ड्यूटीवर नसलेल्या वाघासोबत पंगा घेऊ नका.

खरं नाही वाटत ? मग  खालचे ऑफ ड्यूटी वाघाचे व्हीडीओ पाहा.

( या कथेत सेल्फी-श मानवासकट कोणत्याही प्राण्याचे मन दुखावण्याचा हेतू नाही. ) 


आनंदी




Sunday, April 16, 2023

भ्रमण मंडळ - सिंहगड सहलीच्या नोंदी








 भ्रमण मंडळ - गडावरच्या सहलीच्या नोंदी


कॕनडाहून मैत्रीण येणार होती पुण्यात. ग्रूपमधे लगेच प्लानिंग सुरू. होस्टेल वास्तव्याची पाच वर्षे 24 तास एकत्र घालवलेला ग्रूप . या मैत्रिणी ला भेटून 25+ वर्षांचा काळ लोटलेला. ठिकाण तारीख ठरवून गडावर रात्र काढायचे ठरले.

ईतके आधी ठरवूनही संसाराची गद्दे पंचविशी पार केलेल्या काही मैत्रिणींना अगदीच टिपीकल बायकी पारंपारिक अडचणींपासून सुटका नाही हे जाणवले. ( बहुतेक सगळ्या नोकरी करीयर करणाऱ्या  असूनही अडचणी मात्र सांसारीक होत्या )

पण तरीही या सांसारीक अडचणी नसलेल्या किंवा त्या अडचणींवर मात केलेल्या किंवा अडचणींकडे निर्धाराने डोळेझाक केलेल्या  अशा चारच जणी राहीलो. मग गडावर धमाल करण्यासाठी दुसऱ्या  शाळामैत्रीणींच्या ग्रूपमधे आवाहन केले तर चक्क तिघी ऐनवेळी तयार झाल्या .( त्या तिघींना खरोखर सलाम ). अशा सात जणींनी सिंहगडावर प्रस्थान केले. त्या सहलीच्या या नोंदी बरं का .....


 समाजमाध्यमांवर बायकोचे आणि बायकांचे विनोद फिरत असले तरी बायकांच्या ग्रूपमधे नवर्यावर सगळ्यात धमाल विनोद होत असतात. ( आणि ते विनोद बायका ऊगाच बोंबा मारत ईकडे तिकडे व्हायरल करत नाहीत. ) 


वयाची पंचविशी आणि संसाराची पंचविशी अशा दोन गद्धेपंचविशी पार केल्याने एकप्रकारचे निलाजरे विनोदी शहाणपण घेऊन गडभर फिरलो.( मोठमोठ्याने हास्यविनोद करत फिरणार्या सात बायका गडावर पाहिल्या असतील तर त्या आम्हीच )

 

जेवणाच्या चवीपेक्षा आयते गरम समोर वाढले जाण्याचे सुख स्त्रीजन्मास आल्याशिवाय कळणारच नाही.आणि मग चव आणि आयते गरम असे दोनही मिळणे म्हणजे स्वर्गसुखच नाही का ?आणि तेही कसे ?   किर्र रात्री दरीतून खाली हजारो चमचमाणारे दिवे पुण्याचे अस्तित्व दाखवत दूरवर ऊभे वर चांदण्यांचे आभाळ आणि दरीकाठी सहभोजन ...हाच तो स्वर्ग ( जाता जाता....बायकांच्या स्वर्गाच्या कल्पनेत रूंजी घालणार्या अप्सरा नसतात तर स्वच्छता आणि स्वैपाकाच्या कामांना पुरूष असतात. बाकी रिझवण्यासाठी त्या स्वयंभू असतात ).


गडावरच्या निर्जन बंगल्यावर काळजीवाहू अनिता आणि तीचे कुटूंब सदैव तत्पर होते. 

पैसे देऊन मागवलेले अन्न असले तरी ते टाकून वाया जाऊ नये याची सगळ्याच जणी काळजी घेत होत्या. आणि आमचे वाढून झाल्यावर अनिताचे जेवण तीला पडणारे काम या बद्दल सर्वच जणींना सहकंपा होती याचे आश्चर्य वाटले.पण त्यातही दृष्टीकोन होते. दुपारी जेऊन संध्याकाळची आॕर्डर देताना एकीला वाटले बापरे आपण त्यांना किती कामाला लावतोय

तर दुसरी अगं जेवढी जास्त आॕर्डर देऊ तेवढी त्यांची जास्त कमाई होईल...


गडावरचा सूर्योदय बघायला जायचय पण शरीराचा सूर्योदय चहाशिवाय कसा होणार ? 

अनिताला ईतक्या सकाळी ऊठवायला जीवावर येत होतं.अपराधीपणे तीला ऊठवून एक जण म्हणाली आम्ही आमचा चहा करून घेऊ का ? तुम्ही झोपा ...

अशी मागणी तीला क्वचितच अनुभवायला मिळाली असेल.


गडावरचा सूर्यास्त अनुभवून परत येताना काळभैरवाच्या देवळात गेलो. स्वच्छ दगडी देऊळ . आत छोटा गाभारा. कालभैरव आणि जोगेश्वरीच्या दगडी मूर्ती झेंडूच्या माळा ल्यालेल्या . मंद तेलाचा दिवा आणि गाभार्यात पिवळा बल्बचा प्रकाश. सगळ्या मांडी घालून खाली अगदी मूर्तीसमोर बसलो. शांतता अनुभवल्यावर देवांवरून ऊपनिषदांपर्यंत चर्चा गेली.  बाहेर दोन जणं देवाचे दर्शन घ्यायला आलेले लवकर कळलेच नाही. त्यांना पाहून घाईने ऊठू लागलो तर ते म्हणाले असू दे आम्ही तुमची छान चर्चा रंगलेली ऐकत होतो.....


जो सूर्य अस्ताचा पाहीला आणि ऊगवतीचा पण पाहीला.खरं तर अनुभवला. पण पहील्यांदाच अनुभवत असल्याचा नवथर ऊत्साह होता सगळ्यांमधे . त्या सूर्याला साक्षी ठेवून पुनःपुन्हा भेटण्याचे आणि नित्यनवीन जगण्याचे  ठरविले....


आनंदी

16/4/2023

मध्यस्थ

 मध्यस्थ                    फक्त दूरदर्शन होतं त्या जमान्यात एक मध्यस्थ नावाची टेलीफिल्म पाहिली होती. राजन भिसे ,अरूण जोगळेकर आणि लालनसारंग ...