स्ट्रेस टेस्ट करायला एक मध्यमवयीन पेशंट त्याच्या बायकोसोबत आला होता . स्ट्रेस टेस्ट करताना छातीवर एक उजव्या बाजूला तर 5 डाव्याबाजूला असें लीड चिकटवले जातात. या पेशंटने छातीच्या उजव्या बाजूला काळ्या पेनाने एक उभा लंबगोल आखलेला होता.
"काय झालंय तिथे", - मी
"ते छातीत सारखं दुखतं, मी स्ट्रेस टेस्ट दर 6 महिन्यांनी करतो. मला माहिते इथे लीड लावतात. मग धक्का नको लागायला म्हणून आधीच आखून ठेवलंय", पेशंट.
"इतकं दुखत का? केंव्हापासून?" मी
"माझी प्लास्टि झालीय ना 2017 ला " पेशंट
"मग ?"मी
"मग ती उजव्या बाजूच्या रक्त
वाहिनीत स्टेन्ट बसवलाय ना. म्हणून बरोबर तिथेच दुखतय " इति पेशंट
"पण प्लास्टि इथून नाही करत दुखायला " मी
"हो हातातूनच केली. पण इथल्या रक्त वाहिनीत केली ना. तिथेच दुखतय" पेशंट
"दाबल्यावर दुखतं का की असच दुखतं?" मी
"दाबल्यावर पण नी तसही सारखं दुखतंच राहत" पेशंट
"प्लास्टि करायच्या आधी नक्की नव्हतं दुखत?"
"नाही ना. अहो मी फाईल नाही आणली आज तुम्हाला चित्र दाखवतो अँजिओग्राफिचे. उजव्या बाजूच्या रक्तवाहिनीत स्प्रिंग टाकलीय तिथेच बरोब्बर दुखतंय " पेशंट
मग मी त्यांची स्ट्रेस टेस्ट तयारी होत असताना एकीकडे त्यांना प्लास्टिचा आणि त्या दुखण्याचा कसा संबंध नाही हे समजावून सांगितले
त्या दोघांनाही हे ऐकून खूपच आश्चर्य वाटले. मग मी त्यांनी गोल काढला होता तिथे आजूबाजूला दाब देऊन विचारले दुखतंय काय? तर थांबून विचार करून उत्तर आले, नाही दुखते.
मी विचारले, "तुमच्या हार्ट च्या डॉक्टरना कधी विचारलं नाही का?"तर म्हणाले नाही हो. मला वाटले प्लास्टि केली की सगळ्यांनाच दुखत असेल.
मग स्ट्रेस टेस्ट केली. पूर्ण चालले. हे गृहस्थ रोज 5 की मी रोज चालतात तेंव्हा छाती दुखते का? तर नाही.
मग परत एकदा हृदयाचे दुखणे नक्की कसे असते, प्लास्टि करतात म्हणजे काय नीट समजावून सांगितले. आत्ता दुखतय त्याचा 6 वर्षांपूर्वी झालेल्या अँजिओप्लास्टिशी तसा काहीही संबंध नाही हे त्यांना समजलंय हे चेहऱ्यावर दिसत होतं. त्या बाईंना तर मोठ्याने हसूच आलं.
मी विचारलं काय झालं? तर म्हणाल्या म्हणजे इतकी वर्ष यांचं छातीतलं दुखणं फक्त मानसिकच होतं की काय?...
एक आठवड्याने ते फॉलो अप ला आले नी म्हणाले तुम्ही सांगितल्यापासून माझे दुखणे 80 % कमी झालंय.
वेदना शारीरिक की मानसिक असा प्रश्न पडेल ना हे वाचून?
पण वेदनेचा /दुखण्याचा /आजाराचा आणि मनाचा खरोखरीच खुप जवळचा संबंध आहे. अज्ञान, भीती आणि गैरसमज यामुळे अनेकदा अनेकांना अनेक लक्षणे दिसत असतात किंबहुना ती लक्षणे ते जवळ बाळगून असतात असें म्हणायला हरकत नाही.
वरच्या उदाहरणात फक्त योग्य ते ज्ञान दिल्याने 80%फरक विना औषधे पडला.आणि म्हणूनच रोगी ज्ञापक( रोगाबद्दलची माहिती )असणे रोग बरा करण्याच्या दृष्टीने खुप महत्वाचे आहे असें आयुर्वेदनेच सांगून ठेवलंय.
हल्ली कोणताही त्रास नसताना तपासण्या करण्याचे प्रमाण वाढले आहे.ही तशी चांगली गोष्ट आहे. पण या प्रकरणात रुग्ण angiography पर्यंत गेला आणि त्याला ब्लॉकजेस सापडले की तो रिपोर्ट पाहून मग नंतर छातीत दुखल्यासारखे व्हायला लागते अशी बरीच उदाहरणे अनुभवास येतात.
वेदना दुःख हे काही कोणत्या उपकारणाने मोजता येत नाही. त्याचे मोजमाप प्रत्येकाच्या मनात असते. वेदनेचे मोजमाप करायला 1 ते 10 आकडे ठेवून तुमची वेदना किती तीव्र आहे हे विचारले जाते. किंवा दुःखी चेहऱ्याच्या वाढत्या तीव्रतेच्या ईमोजी ठेवून त्या पाहून आपली वेदना कोणती हे सांगायला लावले जाते. पण याचा अर्थ काय? आजाराची अवस्था माझी आणि तुमची ही सारखी असली तरी वेदना मला ती 4 तीव्रतेची वाटतीय तर तुम्हाला 6 तीव्रतेची वाटतीय. म्हणजे ती पूर्णपणे मनावर अवलंबून आहे.
ज्या गोष्टी पूर्णपणे मनावर अवलंबून असतात त्याची तीव्रता आपणच ठरवून कमी करू शकतो किंवा पूर्ण घालवू पण शकतो.
आजार कोणताही असू दे वेदना या मनावर कशा अवलंबून आहेत हे ज्ञान त्याची तीव्रता कमी करायला नक्की उपयोगी पडते. थोड्या सरावाची गरज असते.
रेकी / प्रार्थना कशी काम करत असणार? तर ती तुमच्या मनावर, सहनशक्तीवर वर काम करते. मनाची ताकद वाढली की वेदनांक कमी होतो. मात्र प्रत्येकाच्या मनाची ताकद वाढवायला घालावी लागणारी फुंकर वेगवेगळी असू शकते.
रोग नसताना वेदना होतात जाणवतात आणि योग्य त्या ज्ञानाने त्या नाहीश्या होत असतील तर आजार असताना असलेल्या वेदना पण योग्य त्या ज्ञानाने नाहीशा होऊ शकतात.
प्रयोग करून पहा.स्वतःवर, इतरांवर. ज्ञान योग्य ते आणि तेवढेच घ्या किंवा द्या. गरज नसताना असलेली वैद्यकीय माहिती चिंतातूर जंतूमध्ये आजार नसताना लक्षणें निर्माण करू शकतो
( जाता जाता धोक्याचा इशारा - वेदना घालवण्यासाठी हा ज्ञान पाजळायचा प्रयोग अचानक तीव्र पणे उद्भवलेल्या वेदनेवर acute pain करू नये नाहीतर वेदनेने तळमळणारा मनुष्य हाती लागेल ते ततुम्हाला फेकून मारण्याचीच शक्यता )
डॉ. आनंदी
No comments:
Post a Comment