मांजराने आमच्या आयुष्यात प्रवेश केल्यानंतरचे पुराण सांगण्याआधी आमच्या कुटूंबातल्या प्राणीप्रेमाची पार्श्वभूमी सांगते. आमच्या कुटूंबातल्या सहापैकी पाच जणांना प्राणी आवडतात हां. एका सदस्याला प्राणी एकाच कारणांनी आवडत नाही ते म्हणजे स्वच्छता . म्हणजे जर एखादा कुत्रा रोज स्वच्छ अंघोळ करून केस न गाळता शी शू करायला आपापला बाहेर लांब जाऊन परत आल्यावर पाय धूऊन घरात न येता दारातच बसत असेल आणि आपल्या ओल्या तोंडाने कुणाला सारखा चाटत नसेल तर या या सदस्याला तो चालणारे.
आमच्या घरातले एक भूतपूर्व ज्येष्ठ सदस्य त्यांना सर्व प्राणी आवडत. पण कसे पाहा. आमच्या घरी बरीच वर्षे एक लॕब होता. तो मान खाली घालून फक्त त्यांचेच ऐकायचा ईतकी त्यांच्या बोलण्यात हुकूमत होती. प्राण्यांना कुरवाळणे जवळ घेणे ही त्यांच्या प्रेमाची पद्धत नव्हती तर त्याला वेळेवर फिरायला नेणे वेळेवर खायला घालणे आणि बांधून ठेवणे ही खास त्यांची पद्धत. या पद्धतीत मांजरं बसत नसल्याने मांजरापेक्षा कुत्रा आणि पिंजर्यातले पक्षी आवडीचे. या प्रेमाला "जी हूजूर "प्राणीप्रेम म्हणेन मी .
साधारण ही तटस्थता पण तात्विक प्राणीप्रेम असलेला आमचा सुपूत्र. याचे टोकाचे पण लॉजिकल प्राणीप्रेम कसे ? तर एकदा काही वर्षांपूर्वी पुण्यात आम्ही तिघे ( 10 आणि 14 वयाची मुले आणि अस्मादीक )रीक्षाने जात असताना एका चौकात डावीकडून एका घोड्यावरून एक मुलगा येत होता( लग्नाचा घोडा असावा ) पण त्या घोड्याला ब्रेक मारता न आल्याने तो रीक्षाला धडकला . रीक्षेवाल्याने खूप मोठा आवाज झाल्याने रीक्षा थांबवली. तर आमचा हा लॉजिकल प्राणीप्रेमी पटकन ऊतरून मागे पळत गेला नी पाच मिनीटाने परत आला. मी विचारले , " काय रे त्या मुलाला लागले का " ? . तर हा म्हणतो ," मी मुलाला बघायला गेलो नव्हतो घोड्याला काही झाले नाही ना ते बघायला गेलेलो. घोडा ऊठून ऊभा राहीला मग मी परत आलो " याला सगळेच प्राणी प्रेमाचे बर का ? अगदी सव्वा वर्षांचा असल्यापासूनच हे प्राणीप्रेम दिसू लागलेले. पावसाळ्यात अंगणात पैसेकीडे येतात खूप. त्यांना हात लावला की गोल होतात. ते हातात घेऊन हा मुलगा खेळत बसायचा. बेडूक ऊंदीर हातात पकडायला लहानपणापासून शिकला. आगदी समस्त जागाला किळस आणणारा पाल हा प्राणी घरात निघाला तर अजूनही हा मुलगा पालीला हातात धरून घराबाहेर नेऊन टाकतो. मारत नाही. याचे प्राणीप्रेम नैसर्गिक तटस्थ तर्कशुद्ध . एकदा त्याला विचारले तुझ्या जवळच्या व्यक्तीला वाघाने खाल्ले तर काय तुला राग नाही येणार का वाघाचा ? तर म्हणतो वाघाला काय कळतय ? तुम्ही त्याने खावे अशी कृतीच करू नका ना. लांबच राहा त्याच्यापासून . असा हा लॉजिकल प्राणीप्रेमी .
त्यानंतर आमची कन्या हिला खरी प्राणीप्रेमी म्हणायला हवी. हिचं प्रेम टोटली भावनिक. सारखं कुरवाळणं मिठ्या मारणं पाप्या घेणं आणि विरहाने अश्रू ढाळणं . पहिल्यांदा लॕबचे पिल्लू पाळायला म्हणून आणले आणि काही महिन्यांनी असे वाटले जरा अवघडच जातय कुत्रं वागवणं , म्हणून त्याला एका फार्म हाऊस वर दिले. कन्येला डायरेक्ट शाळेतून आल्यावरच कळाले. शाळेच्याच ड्रेसवर न खाता पिता रडत संतापत तशीच झोपली . तिकडे त्या पिल्लानेही काहीच खाल्ले नाही. शेवटी त्याला परत आणले. या प्राणीप्रेमापोटीच ती प्राण्यांची डॉक्टर झाली. आणि लॉकडाऊनच्या काळात हिनेच मांजरांना घरात आणून पुराणकथेची सुरूवात केली.
या मुलांचे बाबा , यांचं प्राणीप्रेम हे अनिश्चित स्वरूपाचे. मांजरं लबाड असतात मला आवडत नाहीत हे घोषवाक्य. कुत्रा आवडता नी साप या प्राण्याचे जबरदस्त आकर्षण. पण मांजर घरात आल्यावर न आवडणारा हा प्राणी यांच्याच मांडीवर बसू लागला नी मग बर्याच गमतीजमती घडू लागल्या.
अस्मादीकांचे प्राणीप्रेम हे प्राण्यांना स्वातंत्र्य द्या या टाईपचे. मला पिंजर्यातला प्राणी , पक्षी , सतत बांधलेला प्राणी पाहीला की खूपच वाईट वाटत राहाते. बाकी स्पर्शाला गिळगिळीत नसलेले सर्व प्राणी आवडतात. आपले बोलणे कुत्र्या मांजरांना समजते हे त्यांच्या सहवासात राहिल्यावर लक्षात आले.कुत्र्यांशी सगळेच बोलतात पण काय मांजराशी गप्पा मारणारी अस्मादिक अधूनमधून आमच्या घराला दिसू लागले.
भरीस भर म्हणजे आम्हाला प्राणीप्रेमी शेजार मिळाला . त्यातल्या दोन महिला सदस्य तर अतिकाळजीवाहू भावनिक प्राणीप्रेमी गटातल्या. तर वयस्क पुरूष सदस्य सतत खायला घालू प्राणीप्रेमी.
तर हे मार्जार पुराण घडले त्यातशेजारच्या तीनही सदस्यांचाही सहभाग होता.
आता ही होती कमी महत्वाच्या पात्रांची ओळख. पुराणकथेताले हिरो हिरोईन मात्र कथा ऊलगडेल तसतसे तुम्हाला कळतीलच ....
आनंदी

