स्ट्रेस टेस्ट करायला एक मध्यमवयीन पेशंट आला. स्ट्रेस टेस्ट करताना छातीवर एक उजव्या बाजूला तर 5 डाव्याबाजूला असें लीड चिकटवले जातात. या पेशंटने छातीच्या उजव्या बाजूला काळ्या पेनाने एक उभा लंबगोल आखलेला होता. ते पाहून मी विचारले
"काय झालंय तिथे", - मी
"ते छातीत सारखं दुखतं, मी स्ट्रेस टेस्ट दर 6 महिन्यांनी करतो. मला माहिते इथे लीड लावतात. मग धक्का नको लागायला म्हणून आधीच आखून ठेवलंय", पेशंट
"इतकं दुखत का? केंव्हापासून?" मी
"माझी प्लास्टि झालीय ना 2017 ला " पेशंट
"मग ?"
"मग ती उजव्या बाजूच्या रक्त
वाहिनीत स्टेन्ट बसवलाय ना. म्हणून बरोबर तिथेच दुखतय " इति पेशंट
"पण प्लास्टि इथून नाही करत तिथे दुखायला " मी
"हो हातातूनच केली. पण इथल्या उजव्या बाजूच्या रक्त वाहिनीत केली ना. तिथेच दुखतय" पेशंट
"दाबल्यावर दुखतं का की असच दुखतं?" मी
"दाबल्यावर पण नी तसही सारखं दुखतंच राहत" पेशंट
"प्लास्टि करायच्या आधी नक्की नव्हतं दुखत?"
"नाही ना. अहो मी फाईल नाही आणली आज तुम्हाला चित्र दाखवतो उजव्या बाजूला स्प्रिंग टाकलाय तिथेच बरोब्बर दुखतंय " पेशंट
मग मी त्यांची स्ट्रेस टेस्ट तयारी होत असताना एकीकडे त्यांना प्लास्टिचा आणि त्या दुखण्याचा कसा संबंध नाही हे समजावून सांगितले.
त्या दोघांना ही खूपच आश्चर्य वाटले. मग मी त्यांनी गोल काढला होता तिथे आजूबाजूला दाब देऊन विचारले दुखतंय काय? तर थांबून विचार करून उत्तर आले, नाही दुखते.
मी विचारले, "तुमच्या हार्ट च्या डॉक्टरना कधी विचारलं नाही का?"तर म्हणाले नाही. आम्हाला वाटले प्लास्टि केली की सगळ्यांनाच दुखत असेल.
मग स्ट्रेस टेस्ट केली. पूर्ण चालले. हे गृहस्थ रोज 5 की मी रोज चालतात आणि तेंव्हा छाती दुखते का तर नाही.
मग परत एकदा हृदयाचे दुखणे नक्की कसे असते, प्लास्टि करतात म्हणजे काय नीट समजावून सांगितले
हे त्यांना समजलंय हे चेहऱ्यावर दिसत होतं. त्या बाईंना तर मोठ्याने हसूच आलं.
मी विचारलं काय झालं?
तर म्हणाल्या म्हणजे इतकी वर्ष यांचं छातीतलं दुखणं फक्त मानसिकच होतं की काय?
एक आठवड्याने ते फॉलो अप ला आले नी म्हणाले तुम्ही सांगितल्यापासून माझे दुखणे 80 % कमी झालंय.
वेदना शारीरिक की मानसिक असा प्रश्न पडेल ना हे वाचून?
पण वेदनेचा /दुखण्याचा /आजाराचा आणि मनाचा खरोखरीच खुप जवळचा संबंध आहे. अज्ञान, भीती आणि गैरसमज यामुळे अनेकदा अनेकांना अनेक लक्षणे दिसत असतात किंबहुना ती लक्षणे ते जवळ बाळगून असतात असें म्हणायला हरकत नाही.
वरच्या उदाहरणात फक्त योग्य ते ज्ञान दिल्याने 80%फरक विना औषधे पडला.आणि म्हणूनच रोगी ज्ञापक( रोगाबद्दलची माहिती )असणे रोग बरा करण्याच्या दृष्टीने खुप महत्वाचे आहे असें आयुर्वेदनेच सांगून ठेवलंय.
हल्ली कोणताही त्रास नसताना तपासण्या करण्याचे प्रमाण वाढले आहे.ही तशी चांगली गोष्ट आहे. पण या प्रकरणात रुग्ण angiography पर्यंत गेला आणि त्याला ब्लॉकजेस सापडले की तो रिपोर्ट पाहून मग नंतर छातीत दुखल्यासारखे व्हायला लागते अशी बरीच उदाहरणे अनुभवास येतात
वेदना दुःख हे काही कोणत्या उपकारणाने मोजता येत नाही. त्याचे मोजमाप प्रत्येकाच्या मनात असते. वेदनेचे मोजमाप करायला 1 ते 10 आकडे ठेवून तुमची वेदना किती तीव्र आहे हे विचारले जाते. किंवा दुःखी चेहऱ्याच्या स्मायली ठेवून त्या पाहून आपली वेदना कोणती हे सांगायला लावले जाते. पण याचा अर्थ काय? आजाराची अवस्था माझी आणि तुमची ही सारखी असली तरी वेदना मला ती 4 तीव्रतेची वाटतीय तर तुम्हाला 6 तीव्रतेची वाटतीय. म्हणजे ती पूर्णपणे मनावर अवलंबून आहे.
ज्या गोष्टी पूर्णपणे मनावर अवलंबून असतात त्याची तीव्रता आपणच ठरवून कमी करू शकतो किंवा पूर्ण घालवू पण शकतो.
कोणतेही जुने दुखणे रात्री जास्त का वाटते दिवसा कामाच्या नादात कमी का वाटते. ते याच कारणाने.
आजार कोणताही असू दे वेदना या मनावर कशा अवलंबून आहेत हे ज्ञान त्याची तीव्रता कमी करायला नक्की उपयोगी पडते. थोड्या सरावाची गरज असते
( हे मी जुनाट क्रॉनिक दुखण्याबाबत बोलतीये. तीव्र अचानक अक्युट अशा वेदनेबाबत नाही. नाहीतर अक्युट आजारामुळे वेदनेने तळमळणाऱ्या माणसाला तुम्ही ज्ञानामृत पाजायला जाल तर तो मनुष्य तुम्हाला हातात येईल ते फेकून मागण्याची शक्यता जास्त. तिथे आधी औषध उपचार मग ज्ञान )
आनंदी
No comments:
Post a Comment