मध्यस्थ
फक्त दूरदर्शन होतं त्या जमान्यात एक मध्यस्थ नावाची टेलीफिल्म पाहिली होती. राजन भिसे ,अरूण जोगळेकर आणि लालनसारंग . कलाकारही लक्षात आहेत. पूर्ण कथा आठवत नाही पण तरूण मुलगा आणि विक्षिप्त वडील यांच्या मधे आईची होणारी कुचंबणा दाखवलेली हे आठवतय . अशी नाईलाजाने मध्यस्थ होणारी आई अनेक वर्षे लक्षात राहीली नी पुढे आई म्हणून मध्यस्थ व्हावं लागल्यावर वारंवार या फिल्मची आठवण येत असे.पण मला स्वतःला मध्यस्थ व्हायला बिलकुल आवडत नाही.
" त्याला सांग असें वागून चालणार नाही. जरा कदर कर मोठ्या माणसांची "
"तिला सांग.....
"बाबांना सांग...
अशी वाक्याची सुरुवात झाली की लक्षात ठेवावे आपल्याला आता मध्यस्थ भूमिका पार पाडावी लागणार आहे .
असो.....
अगदी जवळच्या नात्याताला किंवा जवळच्या मैत्रीतला मध्यस्थ प्रकार फारच धोकादायक. बहुतेक वेळेला दोन व्यक्ती एकमेकांशी मोकळेपणाने बोलू शकत नाही किंवा एकमेकांसमोर राग व्यक्त करू शकत नाही, समोरच्या व्यक्तीच्या रिअॅक्शन ची भीती वाटत असते अशाच वेळेला कुणाला तरी मध्यस्थ घातलं जातं.
मुले आणि वडील यांच्यामध्ये आईला मध्यस्थ होण्याची वेळ म्हणजे अगदी पूर्वम्पार चालत आलेली परंपराच म्हणाना. क्वचित प्रसंगी काही घरांमधून वडलांवरही ही वेळ येत असेल. येथे मध्यस्थ ही आई असल्यामुळे ती बहुतेक वेळेला विवेकी मार्ग काढत असते. कारण दोन्ही पार्ट्या तिच्या प्रेमातल्या असतात.पण बरेचदा या कसरतीत तिला दोन्हीकडून वाईट पणा घ्यावा लागू शकतो.
सासू आणि सून यांच्यातला मध्यस्थ होण्याची नवऱ्यावर जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र तो नवरा बहुतेक वेळेला गरीब बिचारा असा असतो कारण मामला प्रेमाचाच असतो , पण यातून विवेकाने ठामपणे मार्ग काढण्याची क्षमता फारच कमी पुरुषांमध्ये असते.( चू. भू. दे. घे.) ती क्षमता नसेल तर दुर्लक्ष करणे हा अगदी सुप्रसिद्ध खात्रीशीर उपाय वापरला जातो.
बघा बरे....
"माझा निरोप दिला का तिला / त्यांना?" (या वाक्याचा context खुप तर्हेतर्हेचा असू शकतो )
"हो दिला ना! - खालच्या आवाजात मोघम (या वाक्याचा context साऱ्या जगतात एकच असतो )
"मग..(pause ).. .. काय म्हणाली ती /त्या????
"काही नाही..." - खालच्या आवाजात मोघम.
"असं कसं ????? काहीss च नाही म्हणाली / म्हणाल्या ?????"
"नाही ग .. .. .. जाऊदे आता मला चहा देते का ? " ( विषय बदलण्याचे कसब जितके दमदार तितका हा संवाद लवकर संपतो )
आता वरच्या संवादात कोण कोणास म्हणाले हे हुशार लोकं ओळखतीलच. विवेकपूर्ण शब्दयोजना करण्यासाठी मेंदूची एनर्जी खर्च करण्यापेक्षा हा उपाय खूपदा जालीम इलाजच ठरतो .
दोन मैत्रिणी मधली मध्यस्थ मैत्रीण, दोन मित्रांमधील मध्यस्थ मित्र, हा बहुतेक त्यांना जोडणारा दुवा असतो किंवा त्यांचे प्रेम जुळवून देणारा असतो त्यांची भांडणं दूर करणारा असतो तो एक छान गोड प्रकार असतो.
पूर्वी लग्न जुळवताना तर मध्यस्थ हा हमखास असायचा . अजूनही ठरवून होणाऱ्या लग्नातही बरेचदा असतो. पूर्वी तर लग्न ठरवताना सगळी मदार या मध्यस्थावर असायची आणि असंही घडायचे की लग्न झाल्यावर उघडकीस यायचे , मध्यस्थ माणसाने काय काय बाता मारल्या ते.
प्रेमातही बरेचदा मध्यस्थ असतोच. पण तो बिचारा बहुतेक वेळेला निरोप्या असतो किंवा दोन्हीकडची रडगाणी ऐकणारा मूक खांदा असतो.
हा मध्यस्थ असतो ना तोही एक व्यक्ती आहे ज्याला मन भावना आहे आवड निवड आहे हे आपण विसरतो.त्याच्या भावभावना त्याचा बघण्याचा दृष्टिकोन त्याची वाक्य फेकण्याची लकब या सर्वावर अवलंबून असतं की हे गैरसमज दूर होणार आहेत का आणखी वाढणार आहेत. कारण या मध्यस्थ्यामुळे गैरसमज आणि दरी वाढल्याची भरपूरच उदाहरण आहेत.
म्हणून माणसाने जे समोरासमोर बोलता येत नाहीये ना ते बोलूच नये. मध्यस्था करवी निरोप देण्यापेक्षा स्वतः तोंड देण्याचे धाडस तरी करावे किंवा शांत तरी , बसावे काय वाटतं तुम्हाला ??
आनंदी