Monday, June 19, 2023

ऑन ड्यूटी वाघासोबत सेल्फी


                    ईतक्यातच भारताबाहेर एका वाघाच्या राज्याला भेट द्यायचा योग आला. नाव Tiger Kingdom  असले तरी वाघाला गुलाम केलेल्या बुद्धीमान मानवाचेच राज्य होते बुवा ते. 

                    तर आपण कुत्री मांजरी पाळतो तसे ईथे वाघांना लहानपणापासून पाळले जाते असे ऐकले होते. पण गेल्यावर कळले अगदी तस्से नाही तर त्यापेक्षा जास्त पाळलय त्यांना. म्हणजे ट्रेनिंग दिलेले प्राणी ऊठ म्हणता ऊठतात,  बस म्हणता बसतात,  गोलातून ऊड्या मारतात , अगदी नाचता बिचतातही . पण ट्रेन्ड प्राणी रांगेत ऊभे राहून येणार्या माणसांना त्यांच्या पार्श्वभागी हात लाऊ देतील काय ? करून पाहा बरे !  शेजारच्या पाळलेल्या कुत्र्याच्या शेपटीला हात लाऊन पाहा.
. पण मग हीच तर खासीयत होती या टायगरच्या राज्यात. आम्हा पाचपाच जणांना आत सोडत होते. वाघांच्या पार्श्वाभागालाच फक्त हात लावायची ,  अगदी शेपटीही हातात घ्यायची मुभा होती. फक्त पार्श्वच भाग बरे का !  ( नाहीतर पाळलेलाच वाघ आहे म्हटल्यावर  ऊगा मुके घ्यायला जायचा तुम्ही !  म्हणून कुठे हात लावायचा याच्या स्पष्ट सूचना लिहिलेल्या होत्या.) 

                   आमच्या पाच जणांच्या ग्रूपच्या वाट्याला ज्या  दोन वाघांची ड्यूटी होती  ते फारच झोपाळलेले होते. आमच्या पैकी एखादी मागे फोटो काढायला गेल्यावर माशी हाकलायला असते तशा चपट्या काठीने तिथला कर्मचारी त्याला ऊठवत होता. मग वाघ पेंगूळलेले डोळे कसेबसे ऊघडत होता परत मिटत होता. ते पाहून आमच्या दोघी तिघींतली मातुल ममता जागी होत बोलली " नका ऊठवू हो त्याला झोपू द्या बरं  " पण तिथल्या कर्मचार्याने ते ऐकून न ऐकल्यासारखे केले. 

                   मग सगळ्यांच्या सेल्फी झाल्यावर तो कर्मचारी दुसर्या वाघासोबत फोटो काढा म्हणाला. मी  एकातच भरून पावले होते खरे तर  .दुसर्या वाघाच्या पाठीमागे ड्युटीवर नसलेल्या वाघाचा एक पिंजरा होता. तो मस्त पाय वर करून लोळत होता. त्याला बघण्यात मी दंग झालेले होते . तर मला हाका मारून ऑन ड्यूटी झोपाळलेल्या वाघाशेजारी व्यवस्थित ऊभे राहायची ऑर्डरच काढली त्या कर्मचार्यांनी.  

                 ज्याचे पैसे घेतले आहेत ती सेवा कस्टमरची ईच्छा असो नसो पूर्ण करूनच द्यायची ही कर्मचार्यांची सेवाभावी वृत्ती बघून भरूनच आले.

               चला दुसर्या वाघाचीही ड्यूटी त्याने झोपेतच पूर्ण केली. बर्याच जणांच्या वाट्याला जागा वाघ आलेला. ( नंतर फेसबुकवर पाहीले )जांभया वगैरे देत असलेला ,  आळोखे पिळोखे देत असणारा , ऊभा राहीलेला वगैरे.बहुतेक तो पूर्ण खडखडीत जागा होऊन 'मागे कोण आहे बरे ! ' असे त्याला कळायच्या आत त्याच्या जागी दुसरा झोपाळलेला आणून बसवत असतील. 

               पिल्लू वाघांच्या तिथे तर फोटो काढायला जास्त वाव होता. आता खरे तर पिल्लू असल्यापासूनच अशी सेल्फी ड्यूटी लागल्यामुळे मोठे होईस्तवर ही ड्यूटी अंगात मुरत असेल त्यांच्या . मग काही जणांना तोचतोचपणाचा कंटाळा येऊन ड्यूटी अवर्समधे झोपा काढत असतील. असे कंटाळलेले वाघ आमच्या वाट्याला आले असावेत . 

               खरच अशा शेळपाटलेल्या आपल्याकडे ढूंकूनही न बघणार्या या वाघासोबत फोटो काढून आपल्याला काय समाधान मिळत असेल ? आणि का मिळत असेल ?

               याचे ऊत्तर कदाचित आदीम भावनेत असावे. वाघ हा मानव गुहेत राहात होता तेंव्हापासूनचा आपला शत्रू. मग या बलदंड शत्रूची शिकार केली त्याला हरवले तर विजयाचा ऊन्माद असायचाच . आपले सैनिक लढून जिंकले की कसे आपल्याला आनंद होतो तसे या ट्रेनरने वाघाची पार शेळी बनवून आपल्यासमोर ठेवली नी तिच्यासमोर सेल्फी घेताना आपणच तीला शेळी केलीय ही भावना सुखावून जात असेल.   म्हणून का आनंद होत असेल ? 

असे ऊगाचच वाटून गेले.असो .

              ज्यात माझे काहीच कर्तृत्व नाही ते कशाला मिरवायचे या भावनेने खालच्या जबरदस्तीने घेतलेल्या सेल्फीतला सेल्फ क्रॉप करून ऊरलेला ऑन ड्युटी  वाघ पाहायचा असेल तर पाहावा.

             अरे हां ! जाता जाता ना , ऑफ ड्यूटी वाघासोबत जरा बोलत बसले निवांत. म्हटले  ' काय मजाए , भारी ठेप ठेवलीय तुमची . स्वच्छ पिंजरे . स्विमींग पूल . आयते शिकार न करता जेवण . नुस्तं  लोळायचे पैसे घेता बुवा. गरम झाले तर पाण्याचे फवारे  ! व्वा ! 

तर वाघ मिशा फिस्कारून म्हणाला , " ए बाई तू पाहा तुझं तुझं. हिम्मत असेल तर ऊघड पिंजरा . मग बघ पाठीला हात लावायला आलेले तुम्ही सर्व पाठीला पाय लाऊन पळाल  " 

( तो म्हणत होता ते खरे असूनही ) मी बढाईने ऊत्तरले  , "  तूचा बघ तुला ऊघडता येतोय का पिंजरा. आहे का तेवढं डोकं ! " 

हे म्हणताक्षणी वाघोबाने रागाने ऊडीच मारली नी ते पाहून मला पाठीला पाय लावायची वेळ आली.

ड्यूटीवर नसलेल्या वाघासोबत पंगा घेऊ नका.

खरं नाही वाटत ? मग  खालचे ऑफ ड्यूटी वाघाचे व्हीडीओ पाहा.

( या कथेत सेल्फी-श मानवासकट कोणत्याही प्राण्याचे मन दुखावण्याचा हेतू नाही. ) 


आनंदी




No comments:

Post a Comment

मध्यस्थ

 मध्यस्थ                    फक्त दूरदर्शन होतं त्या जमान्यात एक मध्यस्थ नावाची टेलीफिल्म पाहिली होती. राजन भिसे ,अरूण जोगळेकर आणि लालनसारंग ...