Sunday, November 1, 2020

जाणिवपूर्वक स्वीकार

 

जाणिवपूर्वक स्वीकार

    माझी एक मैत्रीण माझ्यापेक्षा वयाने बरीच लहान . तीला मी गेली दहा वर्ष खूप जवळून ओळखते . तीची माझी मैत्री झाली तेंव्हा तीच्या लग्नाला दोनेक वर्षे झाली असतील नी एक मुलगीही झालेली होती. हीचे लग्न ठरवून एकाच जातीत दोघांच्या पसंतीने  आनंदाने झालेले. एकच जात पोटजात चालीरीती असल्या तरी प्रत्येक घराची वेगळी जीवनशैली असते. ती नेमकी हीच्या बाबतीत सासर माहेरची एकदम विरुद्ध. माहेरी माणसांचा गोतावळा, आला गेला सतत पै पाहूणा,  खाणे पिणे, गप्पा ,मजा मस्ती ,सण वार ,फोन वरून पण अघळ पघळ बोलणे असं आनंदी पण आरोग्याच्या दृष्टीने थोंडं मसालेदार वातावरण.

    तर सासरी राबता थोडा कमी चौकोनी आपल्याच चौकटीत राहाणारं कुटूंब . लवकर ऊठून लवकर झोपणे.  ठराविक जीवनक्रम जेवणाचीही चौकट ठरलेली. चौकटीबाहेर अबरचबर खाण्याचं वेड नाही की अघळपघळ गप्पा नाही . स्वयंपाकाची पद्धतही थोडी वेगळी कमी तेलाची साधी . तीच्या बोलण्यात नेहेमी ‘आमच्याकडे’ नी ‘यांच्याकडे’ असे शब्द यायचे. ‘आमच्याकडे’ म्हणजे माहेरी नी ‘यांच्याकडे’ म्हणजे सासरी. म्हणजे तीने अजून सासर आमचे असा स्वीकार केलेला नव्हता मनातून. तशी ती आनंदातच होती. पण प्रत्येकच संसारी बाईला आपला संसार आहे मनोहर तरी गमते ऊदास असाच वाटतो तसा तीलाही वाटत होता. पण हे मनोहारीपण शब्दातून काही व्यक्त व्हायचे नाही. एकाच गावात सासर माहेर असून माहेरी सारखे जायची परवानगी पण नव्हती. त्यामुळे माहेरचं अप्रूप होतचं. हळूहळू वर्षे ऊलटली .नी हीच्या सांगण्यातली बोलण्यातली भाषा बदलायला लागली. माहेरी खूप दिवस राहायची वेळ आली तर कुरकुर करायला लागली. नी सासरकडचे नकळतपणे ‘आमचे’ झाले. माहेरी राहीलं की रूटीन बिघडून जातं, सारखे दिवसभर खातच असतात मग वजन वाढते. जागरणं झालं की डोकं दुखतं असं काही बाही सांगू लागली . स्वताच्या घरी म्हणजे सासरी गेल्यावर हुश्श वाटायला लागलं.

   आमच्या डोळ्यादेखत पण अतिशय सावकाश हा बदल घडला .नी हा आपोआप घडत गेला. प्रत्येक लग्न झालेल्या स्त्री बाबत घडतच असतो. पण हा जीवनशैली बदलातला स्वीकार जर जाणिवपूर्वक केला असता तर ‘यांच्याकडे’ पासून ‘आमच्याकडे’ हा बदल लवकर घडला असता. नी संसार लवकर मनोहारी झाला असता.

     हृदयरोग, बीपी, डायबेटीस ,स्थौल्य या रोगांचा घरात शिरकाव झाल्यावर असच काहीसं घडतं . कुटुंबात एकच व्यक्ती या रोगाने पिडीत असेल तर सगळ्या घराची जीवनशैली बदलणं ईतरांना अन्यायकारक वाटतं. यांना पथ्य आहे आम्ही का आमचं मन मारायचं असा काही वेळेस निरोगी सदस्यांचा प्रश्न असतो.  जिथे या पथ्याचा मनापासून स्विकार असतो तिथे रोग कायमचा आटोक्यात येतो. जिथे मला परत कधी खायला मिळेल या ईराद्याने पथ्य ही तात्पुरती केलेली  ॲडजस्टमेंट असते तीथे परत परत आजार डोके वर काढू शकतो. बरेच जणं या प्रकारचा जीवनशैलीचा आजार झाल्यावर केवळ घरच्यांच्या आग्रहापायी पथ्य पाळतात. तर काही जणं असेही ऊद्गार काढतात “ आधी ऐपत नव्हती सगळी वर्षे काटकसर करण्यात गेली आता आरामाचे खायचे दिवस आले तर हे पथ्यपाणी मागे लागलं.” हे वाक्य तर सगळ्यात जास्त रोगाच्या विरोधात काम करतं. मुळात चांगलं चुंगलं खाणं म्हणजे फक्त तळलेल गोड खाणच नी म्हातारपणी आरामात आयुष्य घालवणं म्हणजे व्यायाम न करणं ऊशीरा ऊठणं असा पक्का समज मनात असतो त्यामुळे हे वाक्य येतं. ऊलट त्या वाक्याचं रुपांतर “ ईतकी वर्षे संसार संभाळण्यासाठी नुसती दगदग धावपळीत गेली स्वताच्या प्रकृतीकडे लक्ष द्यायला वेळच नाही मिळाला आता पैसे नी वेळ हातात आल्यावर सगळं लक्ष प्रकृती नीट करण्यात आणि छंदात घालवणार.” असे केले तर जास्त छान नाही का ?

कोणतीही चांगली सवय लावण्यासाठीची पहीली पायरी म्हणजे माझी आधीची सवय आरोग्यदायी नाहीये हे मान्य करणं आणि मला ती बदलायचीय त्यासाठी मला नावडत्या गोष्टी खायला , करायला लागल्या तरी चालेल हे स्वताशी स्वीकारले तरच बदलाला सुरूवात होते. तुम्हाला बाहेरची व्यक्ती बदलूच शकत नाहीत तुम्हीच फक्त स्वताला बदलू शकता.

त्यामुळे मनापासून स्वीकार हा आनंदाचा राजमार्ग आहे.

       जाता जाता एक पुलंचं वाक्य आठवलं , वैताग घालवायचे माझे एक तंत्र आहे . शेजारचा रेडियो ठणाणा करत असला न की ती गाणी माझ्यासाठीच लावली आहेत , असे म्हणून मी ऐकतो . मग आपोआप राग कमी होतो.

                   डॉ. आनंदी साठये.  


 


 

No comments:

Post a Comment

मध्यस्थ

 मध्यस्थ                    फक्त दूरदर्शन होतं त्या जमान्यात एक मध्यस्थ नावाची टेलीफिल्म पाहिली होती. राजन भिसे ,अरूण जोगळेकर आणि लालनसारंग ...