Sunday, November 8, 2020

हुशारी

 

हुशारी

    माझी अजून एक माझ्यापेक्षा लहान मैत्रीण.तीचा एक छोटा अनुभव खूप काही सांगतो. ही मैत्रीण शालेय जीवनापासूनच हुशारच.पुढे पदवी, सुवर्ण पदक अशी सगळीच शैक्षणिक कारकीर्द सामान्यपणे आपण ज्याला हुशार म्हणतो त्याच गटातली. तसाच तीचा नवराही.कॉलेजमध्ये एकमेकांच्या प्रेमात पडले.शिक्षण पूर्ण झाल्यावर (आंतरजातीय)लग्न केले.लग्नानंतरही करीयरसाठी वर्षभर दोघे वेगवेगळ्या गावी राहीले. वर्षानंतर राजाराणीचा एकत्र संसार सुरू झाला.स्वतंत्र विचारसरणीच्या हुशार व्यक्ती एकत्र राहील्यानंतर बारीकसारीक वाद, कुरबुरी होतातच तशा ईथेही सुरू झाल्या. मैत्रीणीची आई आठवड्यातून दोनदा तरी मैत्रिणीला फोन करत असे . (आंतरजातीय विवाह असल्याने आईला काळजी वाटत असणार )

    तर बोलताना साहजिक या कुरबुरी " हा असेच वागतो!हा असेच म्हणाला " अशा स्वरूपात आईपर्यंत जायला लागल्या. त्यावर मग तू असे कर- तू असे सांग वगैरे सल्लेही आईकडून यायला लागले. पुढे पुढे झालं असं की काही वाद झाल्यावर आणि त्या संबंधी आईला सांगितल्यानंतर पुढे दोनएक दिवसात या नवरा बायकोंमधला वाद मिटून जात असे, नी पान पलटले जात असे. पण आईच्या डोक्यात मागचे वादाचे पानच चालू असायचे.मग आई फोनवर बोलताना जावयाच्या त्या वागण्याचा संदर्भ देऊन बोलत असे. दोन तीन वेळा असे झाल्यावर माझ्या मैत्रीणिला जाणिव झाली की हे काहीतरी चुकतय. आमच्या दोघातले वाद चहाच्या पेल्यापुरतेच होताहेत. पण आईच्या डोक्यात मात्र ते आठवडाभर रेंगाळतात. आणि आईने परत तेच विचारले की मलाही ऊगाचच तो वाद आठवत राहातोय. आईच्या मनात जावयाबद्दल अढी राहातीय हे मैत्रिणीच्या लक्षात आले तसे तीने ठामपणे ठरवले यापुढे आईला या बारीक कुरबुरी सांगायच्या नाहीत. चांगलं घडलेलच सांगायचं. " हे ठरवल्यापासून वाद कमी होत गेले नि जावयाबद्दलचे आईच्या मनातले प्रेमही तसेच राहिले.

        हे ऐकून मला तीच्या या भावनिक हुशारीचे जामच कौतुक वाटलं. ती फक्त मार्क मिळवण्यातच हुशार नव्हती तर भावनांचे नियोजनही तीने हुशारीने केले.

       हुशारी, बघा ना हुशारी कशाकशाची असते.वरचे उदाहरण भावनिक हुशारी म्हणता येईल.पण आपण  मात्र साचेबद्ध पद्धतीने भरपूर मार्क मिळवणारा तो हुशार असे शैक्षणिक वयात लावलेले लेबल पुढे आयुष्यभर वागवत राहतो. गणित सोडवणारा हुशार की हुशारीने गणिते सोडवणाऱ्या माणसाला कामाला ठेवून व्यवसाय करणारा हुशार ? संशोधन करणारा हुशार कि संशोधनाचा उपयोग सामान्य माणसापर्यंत पोहोचवणारा हुशार ? 

      संस्कृतमध्ये एक श्लोक आहे ...त्याचा शेवटचा भाग असा आहे कि योजकस्तत्र दुर्लभः ,म्हणजे  गुणवान हुशार माणसांच्या  हुशारीचा समाजाला उपयोग करून घेणारा योजक असतो तो दुर्लभ आहे . हा योजक मनुष्य तुमच्या मार्कांच्या परीक्षेत अव्वल असेलच असे मात्र नाही. बघा प्रत्येकाच्या वर्गात  अशा काही व्यक्ती असतातच,ज्या जेमतेम काठावर पास झालेल्या असतात नि पुढे आपल्याला यशस्वी व्यावसायिक वा राजकारणी किंवा कंपनी मालक वा उद्योजक,संचालक,संस्थांचे अध्यक्ष ,प्रसिद्ध समाजसेवक वगैरे कोणत्याही स्वरुपात आपल्या समोर अचानक येतात. त्या अशा एकदम यशस्वी व्यक्ती म्हणून पुढे येतात तेंव्हा तुम्ही चकित होता का ? अरे हा किंवा ही तर धड पासही होत नव्हती आणि पहा किती पुढे गेली / गेला ? तुम्ही चकित झालात याचा अर्थ तुम्ही पण पारंपारिक मार्कांच्या हुशारीवरच विश्वास ठेवणारे आहात असा होतो. प्रत्येक जण हा कशात न कशात हुशार असतोच. फक्त या हुशारीची जाणीव त्या व्यक्तीला स्वताला व्हायला लागते किंवा दुसर्या कोणीतरी करून द्यायला लागते इतकेच. 

    या सगळ्यात भावनिक हुशारी म्हणजे भावनांचे नियोजन करणारी हुशारी आपल्या शारीरिक,मानसिक,कौटुंबिक आणि सामाजिक आरोग्यासाठी गरजेची आहे, हो न ?

 

डॉ. आनंदी साठये

5 comments:

मध्यस्थ

 मध्यस्थ                    फक्त दूरदर्शन होतं त्या जमान्यात एक मध्यस्थ नावाची टेलीफिल्म पाहिली होती. राजन भिसे ,अरूण जोगळेकर आणि लालनसारंग ...