अनपेक्षित ..........
बर्याच वर्षांपूर्वीची गोष्ट . खाली क्लिनिक , वर घर ,पुढे अंगण नी वाहता रस्ता . वर घर बांधताना ओळखीच्या मित्र ईलेक्ट्रीशीयनने जुनं- नवं वायरींग ,ईन्व्हर्टरचे पॉईंट वगैरे असा बराच स्मार्ट गोंधळ घातलेला त्यामुळे कधी निम्मेच लाईट बंद पडायचे तर कधी सगळे. नी मुळात MSEB कडून लाईट नाहीत की घरात प्रॉब्लेम आलाय त्यामुळे लाईट नाहीत हे कळायचे नाही पटकन..
त्या दिवशी असेच लाईट गेले . ...लाईट जाण्याची सवय असल्याने नी ऊजेड असल्याने पेशंट पाहाणे चालूच होते. 7 ला क्लिनिक बंद करायची नी अंधाराची एकच वेळ. रस्त्यावरचे लाईट तर लागले ....म्हणजे ?अरे देवा ! ...घरातच गडबड आहे. पळतपळत वर गेले. सासू, सासरे , मुलगा नी कन्यारत्न चौघे अंधारातच बसले होते. मी बटणं ऊगाच चालू बंद करून पाहीली.
" खाली तुम्ही क्लिनिक मधे काहीतरी करता नी लाईट जातात.आपला नेहेमीचा ईलेक्ट्रीशियन गावाला गेलाय .आता शोध तूच दुसरा ईलेक्ट्रीशीयन .नाहीतर काढा रात्र अंधारात नी ऊकाड्यात....." हे कोण बोललं असेल सांगायची गरज नाही. नी मला ऊकाड्यापेक्षा कसलं टेंशन आलं हेही सांगायला नको..
पटापट दोनचार फोनाफोनी केल्यावर एक पत्ता समजला . लगेच गाडीवरून गेले तर तिथे एकजण शटर डाऊन करत होता. त्यामुळे अंधारच होता जरा. हाच आपला तारणहर्ता (ईलेक्ट्रीशीयन )खात्री झाल्यावर जरा गयावया केली अर्जंट येण्यासाठी. दया येऊन तो म्हणाला तुम्ही व्हा पुढे मी आलोच.
आनंदात घरी आले तर अंगणात रस्त्यावरच्या अंधूक प्रकाशात झोपाळ्यावर सासरे नी मुलगा आणि वरच्या खिडकीतून सासूबाई नी कन्या असे माझी (म्हणजे ईलेक्ट्रीशीयनची )अधीरतेने वाट पाहात होते. त्यांच्या प्रश्नार्थक चेहेर्यांना येतोय तो असे सांगून दिलासा दिला. नी खरोखरीच तो आलाच गाडीवरुन .....लगेच व्हरांड्यातली सगळी स्मार्ट वायरींग दाखवायला मी व सासरे नी अंतर ठेऊन मागे मुलगाही आला. सगळं बॕटरीच्या प्रकाशात. मनात म्हटले याचा चेहेराही धड पाहीला नाहीये सकाळी भेटला तर ओळखूही शकणार नाही.
"मॕडम ईथे खूप गोंधळ आहे वायरींगचा पण बहुतेक या ईन्हर्टरचा फ्यूज गेलाय .मी सोबत आणला नाहीये मी घेऊन येतो लगेच .
मी काय होच म्हटले . तो वेगाने दारातून बाहेर पडला .मी व सासरे पाच मिनीटे आपल्याला फार काही करता न येणार्या विषयावर वायफळ चर्चा करत करत बाहेर आलो. सगळीकडे लांबूनच लुडबुडणारं निरीक्षण करत मुलगा गेटजवळ रस्त्याकडे पाहात ऊभा होता . म्हणून मीही पाहीले ...... .तो काय हा बाहेर पडून अजून गाडीला सारख्या कीकच मारत होता.बापरे याची गाडी स्टार्ट होत नाही की काय ? आता कधी फ्यूज बसवणार नी अजून स्वैपाक बाकी .........वगैरे कामांची यादी बायकी पद्धतीने माझ्या डोळ्यासमोर नाचायला लागली नी मी घाईघाईने गेटजवळ जात खाली मान घालून रस्त्यावरच्या अंधूक प्रकाशात किक मारणार्या त्याला म्हटले.....
"काहो माझी गाडी घेऊन जाता का ?"
हे म्हटल्याक्षणी काही क्षण फ्रीझ झाले नी एकाच वेळेस तीन घटना भर्रकन घडल्या.
पहीली म्हणजे किक मारण्यात मग्न असलेल्या चेहेर्याने एकदम दचकून वर पाहीले आणि त्या अंधूक प्रकाशातही भिती स्पष्ट दिसेल एवढा भयंकर चेहेरा करून चेहर्याचा मालक खूप घाईने गाडी हाताने ढकलत पुढे गेला.
माझा दहा वर्ष वयाचा मुलगा जो गेटपाशी एका पायावर ऊभा होता तो अचानक मागे पळाला
नी मागच्या वरच्या खिडकीतून दोघींचा मिळून ठो ठो असा मोठ्याने हसणाच्या आवाज आला.
या एकाच वेळी झालेल्या तीन हालचालींमुळे मला अशी जाणिव झाली की किक मारणारा हा ईलेक्ट्रीशीयन नसून कुणि अनामिक प्रवासी गाडी बंद पडल्याने त्रस्त होऊन किक मारत होता. अनोळखी बाईने अचानक गाडी आॕफर केल्याने त्याला आनंदाऐवजी भितीच वाटली आणि प्रतिक्षिप्त क्रीया पलायनाची घडली.
काय घडलय याची जाणिव होऊन कन्येच्या हास्यात माझेही हास्य मिसळले.
माझ्या मुलाने लांब पळाल्याचे स्पष्टीकरण असे दिले की त्याला माझ्या या प्रश्नाची ईतकी लाज वाटली की प्रश्नकर्ती बाई नी माझा काही संबध नाही हे स्पष्ट करायला तो पळाला.
या सगळ्या गोंधळात एकच व्यक्ती स्थितप्रज्ञ होती ती म्हणजे सासरे.काय झालय हे लक्षात आल्यावर हात्तिच्या एवढं म्हणून शांतपणे झोपाळ्यावर ईलेक्ट्रीशीयनची वाट पाहात बसले.........
...............@आनंदी

No comments:
Post a Comment