Saturday, February 6, 2021

दारू आणि थोडसं काही .......


 दारू आणि थोडसं काही......

काही निरीक्षणें.... .


     एक सुशिक्षित मध्यमवयीन जोडप आलं चेकींगला. मिस्टरांना डायबेटीस पण सध्या अनियंत्रित झालेला. सकाळी ऊठल्यावर खूप हात थरथरतात ,कसेतरी होते, खाल्ल्यावर थोडं बरं वाटतं ,अशी तक्रार सांगत होते ते . ही लक्षणे बरेचदा साखर कमी झाल्यावर सापडतात म्हणून आधीची फाईल चाळली. रीपोर्टमधे तर साखर प्रचंड वाढलेली. आताचीही साखर 400 च्या रेंजमधे. ते सकाळीच आले होते चेकींगला. आताही या मिस्टरांचे हात थरथरतच होते . मग अजून बरेच प्रश्न विचारून झाल्यावर सगळ्यात शेवटी विचारले अल्कोहोल घेता का ? हा प्रश्न विचारल्यावर मिस्टर म्हणाले " हो रोज घ्यावीच लागते आणि सकाळी पण नाही घेतली तर थरथर खूपच जास्त वाढते. पण  मला या डायबेटीसच्या गोळ्यांमुळे हा त्रास होतोय आणि साखर पण वाढतच चाललीय. सगळा त्रास डायबेटीसमुळेच होतोय. मी खूपदा गोळ्या घेतच नाही थरथर होते म्हणून.

       मिसेस हे सगळं शांतपणे ऐकत होत्या. मधे अजिबात बोलल्या नाहीत. 

      मी मनातल्या मनात कपाळावर जोरात हात मारून घेतला. ही धडधडीत अल्कोहोल विड्रावलची लक्षणे दिसत होती. त्यात जोडीला अनियंत्रित मधुमेह . मग मिसेसना स्पष्टपणे विचारले यांना दारूचा प्रॉब्लेम जास्त गंभीर आहे हे या आधी तुम्हाला कुणी सांगितलं नाही का ?  

   " हो . यांना रीहॕब सेंटरला अॕडमिट करायला सांगितलं होतं वर्षभरापूर्वीच. पण ते ऐकतच नाहीत . ते म्हणताहेत मला डायबेटीसमुळेच त्रास होतो. आम्ही खूप डॉक्टर हिंडलो या त्रासासाठी . " 

             दारूच्या डिनायल मोडचं हे  ऊदाहरण. अर्थात प्रत्येक मद्यपी हा अनेक वर्षे डिनायल मोडमधेच असतो. अगदी चिवटपणे .... 

            हा चिवटपणा त्याच्या सहवासाने त्याच्या घरच्यांमधे ऊतरतो आणि घरचे चिवटपणे आशा ठेवत राहातात की  हा माणूस आज सुधारेल ऊद्या सुधारेल .

    असाच  चिवट आशावाद मला एकदा पाहायला मिळाला.

     एके दिवशी माझ्या दुसर्या गावाला राहाणार्या मैत्रिणीच्या लांबच्या भावाची सुशिक्षित सुस्वरूप  बायको आणि बहीण अशा दोघी मला भेटायला आल्या . हा भाऊ  पस्तिशीचा ईथल्या मोठ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये एंड स्टेज अल्कोहोलीक लिवर डिसआॕर्डरने मृत्यूशी झुंजत 15 दिवसापासून ॲडमिट होता. यात खरे तर मला करण्यासारखं काय आहे  याचा काही अंदाज येईना. या स्टेजपर्यंत यायच्या आधी पण एकदोन वेळा हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन , दारू सोडण्याची शपथ , पुन्हा दारू असे खूप वेळा झालेले. समोर बसलेल्या या सुस्वरूप तरूणीने,   तीच्या दोन लहान मुलांनी आणि तीच्या सासूने काय काय सहन केले असेल याचा अंदाज येतच होता. फाईल बघून झाल्यावर मी प्रश्नार्थक नजरेने दोघींकडे पाहीले.

       तर गोष्ट अशी होती की आता हा बरा होणार की नाही याची डॉक्टरांनी खात्री दिली नव्हती. शिवाय या मोठ्या खाजगी हॉस्पिटलचा खर्चही सगळ्या नातेवाईकांनी मिळून ऊचलला होता. याला हलवून मुंबईला घेऊन जावं असा विचार होता . कदाचित ॲडव्हांस ट्रीटमेंट मिळेल नी बरा होईल . सरकारी हॉस्पिटलमध्ये खर्च पण कमी येईल. सेकंड ओपिनीयनसाठी माझ्या ओळखीचं कुणी आहे का हे विचारयला आलेल्या दोघी जणी.

        या अवस्थेत पण हा बरा होईल आणि झालाच बरा तर तो परत दारू पिणार नाही याबद्दल  किती टोकाची चिवट आशा होती ही...


       मद्य -कधीतरी घेणारा....पासून ते रोज घेणारा तो मद्यपी आणि घेतल्याशाशिवाय ऊभच राहू न शकणारा तो मदात्यय म्हणजे सामान्य भाषेतला दारूडा या हळूहळू वाढत जाणार्या पायर्या प्रत्येक मद्य पिणार्याच्या आयुष्यात येतीलच असे काही सांगता येत नाही .पण येणारच नाहीत असेही सांगता येत नाही.


       वर्षानुवर्षे पिणारा हळूहळू व्यसनी होते हे सगळ्यात आधी बहुतेक वेळा त्याच्या बायकोच्या लक्षात येते. पण गंमत म्हणजे पिणार्या बैठकीतल्या मित्रांच्या मात्र लक्षात येत नाही. कारण नियमित पिणार्याच्या शब्दकोषात व्यसन हा शब्दच नसतो. सगळे डिनायल मोडमधे शेवटपर्यंत टिकून राहातात चिवटपणे . आपल्यातलाच एकजण  पिता पिता आपली लेव्हल सोडून  लेव्लह वर गेला हे कसे पटावे  बरे ? ? 

कधीतरी पिऊन ऊलट्या होतात. एखाद्या पार्टीत ऊचलून घरी पोचवावे लागते. कधी वादावादी होतात. तरी कधी पिता पिता बसल्याबसल्याच झोप लागते ब्लॕकाऊट...

सगळं मुंगीच्या पावलाने घडते ...

हळूच कधीतरी बायको म्हणते कमी करा आता थोडी ..सोसत नाहीये अलीकडे ...

' 'अरे बायकांचा काय दारूला विरोधच असतो त्यात काय नवीन ,  तू गपकन पिऊ नकोस थोडी थोडी घे मित्र सल्ला देतात.' किंवा असही म्हाटलं जातं ," बायकांना काय कळतं दारूतल ? त्यांना सगळेच पिणारे दारूडे वाटतात. " 

      थोडीशीच घेतलेली असताना बायकोचा फोन आल्यावर हॕलो म्हटल्यावरच बायको म्हणते कुठे बसलायत ?  बस करा नी या घरी...

     " च्यामारी ही का बरे  ओळखते लगेच ?आता जातच नाही लवकर घरी......."

           अशा गमतीजमती होत काहींची वाट मद्यपीसुधार केंद्रापर्यंत जाते , काही थांबतात,  काही घसरतात , काही धडपडतात तर काही रूतत जातात बरबाद होतात.....

मयखाना म्हणजे सुखदुःखाचे प्यालेच ना..

    मद्य ते मद्यपी अशा वाटचालीत बरेचदा दारू वाढत जाते तशी घरातल्या लोकांमधे याला येन केन प्रकारे दारू सोडायलाच लावायची अशी धुंदी चढत जाते.  त्यातून घराचे रणांगण होते. या रणांगणात कोsहम् ? हा प्रश्न जेंव्हा मद्यपीला पडून त्याला स्वताःलाच यातून आता बाहेर पडावे असा साक्षात्कार होतो तेंव्हाच आणि तेंव्हाच सुधारणेला सुरूवात होते.

            खरं तर अल्कोहोलीझम हे टोकाचं ऊदाहरण आहे . कोणत्याही जीवनशैलीच्या आजारात मला बरे व्हायचे आहे हे स्वताः पेशंट मनावर घेतो आणि मनापासून औषधे व्यायाम पथ्यपाणी संभाळतो  तेंव्हाच सुधारणेला सुरूवात होते हेच खरे..........


डॉ.आनंदी 

No comments:

Post a Comment

मध्यस्थ

 मध्यस्थ                    फक्त दूरदर्शन होतं त्या जमान्यात एक मध्यस्थ नावाची टेलीफिल्म पाहिली होती. राजन भिसे ,अरूण जोगळेकर आणि लालनसारंग ...