Sunday, October 25, 2020

भावनिक कल्पकता

 

मुलगा डिझाईनची एंट्रन्स देऊन घरी आला. 

मी टिपीकल पालक प्रश्न विचारला " कशी गेली रे  परीक्षा ?"   

त्याने टिपीकल टीनेज पाल्य एकाक्षरी ऊत्तर दिले " हां........

मी त्याने अधिक शब्द तोंडातून काढावे म्हणून विचारले "तरी !  काय काय आलं होतं ?"  

थोडं वैतागत ऊत्तरला "अग तुला नाही समजणार . प्रश्न कॉँप्लिकेटेड असतात. " 

तरीही मी पालकांच्या ठिकाणी असलेल्या अंगभूत  चिवटपणे विचारलं " एखादा प्रश्न सांग तर. समजेल मला."  

आई ऐकतच नाही म्हटल्यावर न चिडता म्हणाला , "  अग एक कार्टूनचं चित्र होतं आणि ते चित्र पलीकडून बघीतलं तर कसं दिसेल ?  ते काढायचं होतं ."  

मी चकीतच झाले. किती कल्पना करायची होती. आता अशी कल्पना करायला spatial intelligence असायला हवा. काही जणांमधे तो नैसर्गिकच असतो पण तरी त्याला प्रॕक्टीस मार्गदर्शन असेल तर हा प्रश्न लवकर सोडवता येईल. मला तर मुलांनी काय काय चित्र काढली असतील असा विचार करूनच मजा वाटली. 

मग वाटलं आपल्या मनातल्या विचारांचं , भावनांचं , प्रतिक्रियांचं  पण असच आहे नाही का ? एखादा प्रसंग आहे त्यात मला पलीकडून बघण्याची क्षमता आहे का ?  म्हणजे मी आणि माझ्यासमोर जी व्यक्ती ऊभी आहे त्या व्यक्तीच्या नजरेतून होत असलेला संवाद समजून घेता येतोय का ?   म्हणजे बघा आपण टीनेज वयात काहीतरी बेफिकीर वागत असताना आईवडील जेंव्हा काळजी करतात तेंव्हा आपली चिडचिड होते किंवा हसू येतं . पण आई वडिलांना काय वाटतय ही भावना आपल्याला आईवडील झाल्यावर आणि आपली मुले टीनेज झाल्यावरच लक्षात येते. म्हणजे पलीकडे प्रत्यक्ष पोहोचल्यावरच कल्पना येते. पण अलीकडे असतानाच समजलं  तर ??? (त्या परीक्षेतल्या ऊत्तराप्रमाणे) हे ज्यांना जमतं  त्यांचं मुलांशी मित्रत्वाचे नाते तयार होते. ही पलीकडून पाहाण्याची भावनिक बुद्धी , स्थल , काल , प्रसंग , नाते अशा अनेक प्रतलांमधून आजमावी लागते. काही जणांमधे अशी निसर्गदत्त क्षमताच असते. अशा व्यक्तींना समाजात कुटूंबात तणावाच्या प्रसंगांमधे , वादविवादांमधे , तर कधी out of court settlement करण्यासाठी मध्यस्थ म्हणून नेहमीच बोलावले जाते. पण प्रयत्नाने ती क्षमता आपल्याला वाढवता येऊ शकते. परीक्षा द्यायचीय म्हटल्यावर मुलांना क्लास लाऊन रात्रंदिवस अभ्यास करायला लावतो , मग भावनिक सामाजिक कौटुंबिक आयुष्य जगायला पण अशी तयारी करायला काय हरकत आहे ?  असे झाले तर बरेचसे वादाचे प्रसंग आपण टाळू शकतो.  पेशंट्सना समजून घेणारा  डॉक्टर , स्टाफला समजून घेणारा एखादा आवडता  बॉस , एकत्र कुटूंबाला बांधून ठेवणारी एखादी आजी किंवा काकू , शाळेतल्या अ ते  फ तुकडीला आवडणारा शिक्षक , अशी भावनिक कल्पक लोकांची  ऊदाहरणे आजूबाजूला नजर टाका दिसतील. याला तुम्ही वळण म्हणा,  संस्कार म्हणा कल्पकता म्हणा , किंवा प्रशिक्षण म्हणा किंवा माईंड ट्रेनिंग म्हणा. गेल्या बारा वर्षांमधे जीवनशैलीच्या रोगाचेच रूग्ण पाहाताना लक्षात येतं की बरे होण्यात कौटुंबिक वातावरणाचा खूप मोठा हातभार असतो. ज्या कुटूंबात भावनिक कल्पक माणसे असताता तिथे रोग लवकर पळून जातो. जिथे कल्पकता कमी तिथे वाद जास्त तिथे हे आजार रेंगाळत राहातात. 

चला तर मग बघायला शिकू या  नात्याच्या प्रसंगाच्या नी काळाच्या  पलीकडून जग कसं दिसतय ते.

हो !  काळाच्या पलीकडून म्हणजे काळ लोटल्यानंतर आपल्या भावनांमधे मतांमधे विचारांमधे प्रचंड फरक पडत असतो त्याची कधीकधी जाणिवही नसते. नी जाणिव झाल्यावर आपला आपल्यालाच धक्का बसतो. याबद्दल मात्र पुन्हा कधीतरी.....


डॉ. आनंदी साठये

7 comments:

  1. बढीया......लिखते रहो.... उत्सुकतेने वाट पाहत असते...... वैशाली

    ReplyDelete
    Replies
    1. खुप सुंदर लिहीत आहात आनंदी मॅडम,सुनीता कर्वेनी दिली तुमची लिंक ,खूप छान

      Delete
  2. छान लेख आहे. सुनीता ने पाठवली होती लिंक.
    -मनोज पाटील

    ReplyDelete

मध्यस्थ

 मध्यस्थ                    फक्त दूरदर्शन होतं त्या जमान्यात एक मध्यस्थ नावाची टेलीफिल्म पाहिली होती. राजन भिसे ,अरूण जोगळेकर आणि लालनसारंग ...