Sunday, October 9, 2022

समजूत




               परवा क्लिनिक मधे एक मध्यमवयीन नवरा बायको आणि त्यांचा तरूण मुलगा आलेला. आल्यावर ॲसिडीटीचा प्रचंड असणारा त्रास पाठ मान दुखी आणि सतत ढेकरा अशा तक्रारी बाईंनी सांगितल्या. म्हणजे या तीन शब्दात नाही तर काय काय कसं कसं झालं त्याची स्टोरी पण सांगितली .ॲसिडीटि खूपच जास्त होती. बदलून बदलून अनेक डॉक्टर फिरल्यावर आता ती कमी आहे. पण एका लक्षणाने त्यांचा वर्षभर पिच्छा पुरवला होता. ईतका की घरातही सगळे वैतागले. काय आजारे तेच कळेना. लक्षण काय तर सतत ढेकरा. 

कधी येतात ढेकरा तुम्हाला ? 

कधीही . बाई म्हणाल्या," हे पाहा माझ्या शरीरावर कुठेही दाबलं तरी ढेकरा येतात. हे पाहा " .असं म्हणून त्यांनी हात दाबला आणि मोठ्याने ढर्र अशी ढेकर दिली. असे या स्टोरीच्या दरम्यान किमान  10 वेळा मला वेगवेगळ्या ठिकाणी दाबून ढेकर काढून दाखवली. बरं प्रत्येक वेळा बघा बघा ना . हे बघा तुम्ही दाबून बघा. असे म्हणून मी काही ॲक्शन घ्यायच्या ऐवजी  स्वतः नव्या ठिकाणी दाबून ढेकर काढून दाखवत.  शेवटी मी दाब दिल्याशिवाय हा सिलसिला संपणार नाही हे लक्षात येऊन मी हातावर दाब देऊन पाहिला. तर तसाच मोठ्याने आवाज करत ढेकर.

          मग मी त्या बाईंना म्हटले. आता आपण एक प्रयोग करू. तुम्ही तोंड गच्च मिटा. आणि ठरवा मी ढेकर देणार नाही. आणि मग मी हातावर दाब दिला.  ढेकर आला नाही . मग आता बघा तुम्ही करून बघा . तोंड मिटा. त्यांनीही  करून पाहीले. वेगवेगळ्या भागावर दाब  देऊन ढेकरा येत नाहीयेत हे मी लक्षात आणून दिले .

        बाईंचा  मुलगा आणि नवरा आता  हसायला लागले.

       यात त्या बाईंनी कोणतीही नाटकं केलेली नव्हती. त्यांच्या नकळत असे लक्षण निर्माण झाले होते. पहिल्यांदा ॲसिडीटीसोबत  खूप ढेकरा येत होत्या , अंग दुखत होते . अंग दाबल्यावर ढेकरा एकदोन वेळा आल्या .त्याचा संबध नकळतपणे लावला गेला. दाबल्यावर ढेकर येतीय का हे बघायचा चाळाच लागला असणार .त्यातून मेंदूत दाब आणि ढेकरा  हे कनेक्शन पक्के बसले. 

        ते मी समजून सांगितल्यावर त्यांना पटलं . आणि हे लक्षण एकाच बैठकीत विना औषध 80% बरं झालं. 

         खूपदा आपणही वर्षानुवर्षे अशी वेडी कनेक्शन मेंदूत बाळगत जगत  असतो. जेवढी वर्षे बाळगतो तेवढी वर्षे ते कनेक्शन स्ट्रॉँग होत जाते. आणि ते काढून टाकणं अवघड होत जातं.ही वेडी कनेक्शन्स अतार्किक असतात, कार्यकारण भावविरहित असतात. बघा ....


           नीळा शर्ट मला लकी आहे. तो घातला कि माझा परीक्षेत पहिल्या पाचाच्या आत नंबर ठरलेलाच. 

           मी न मागच्या दाराने बाहेर पडले तर माझं काम होतं बरं का .

           हा माझा पिवळा टाय घातला की माझं प्रेझेंटेशन परफेक्ट होतं.

          बघा .तुमचं असं कोणतं कनेक्शन आहे ? 

          या जगात असंख्य घटना घडत असतात पण त्या अंकगणितासारख्या 2+2 बरोबर चार अशा सोप्या घडत नसतात , तर त्या भूमितीसारख्या गुंतागुंतीच्या अनेक मितीत घडणाऱ्या असतात. माझा परीक्षेतला नंबर हा मी केलेला अभ्यास , केलेल्या अभ्यासावरच पेपर निघणे , आणि ईतरांनी पण केलेला अभ्यास यावर अवलंबून आहे की ज्या गोष्टी पेपर देण्याच्या आधीच घडलेल्या आहेत. मग पेपरच्या वेळेस निळा शर्ट घातल्याने काय फरक पडणार आहे ? त्यामुळे फक्त थोडा अधिक तर कधीकधी फाजिल आत्मविश्वास येणारे.

       आपल्या आयुष्यातल्या चांगल्या किंवा वाईट घटना म्हणजे अनेक अगदी हजारो शक्यतांपैकी एक शक्यता असते असे मला नेहमी वाटते. त्या घटनेस मग कुठलातरी एकच घटक शर्ट ,टाय ,रंग ,अंगठी , किंवा एकच क्रिया कशी कारणीभूत असेल ? प्रेझेन्टेशन बनवायला माझा अनुभव , माझी तयारी , माझी हुशारी पणाला लावली म्हणून ते चांगले झाले पण यशाचा धनी मात्र पिवळा टाय ठरतो.

               काहीजणं ठामपणे दावा करतात हो मी असे अमुक केलेले म्हणूनच मला यश मिळाले. असा दावा करणार्या व्यक्तीचे तुम्ही निरीक्षण केले तर तुम्हाला असे जाणवेल कि ही व्यक्ती प्रचंड मेहनती आहे. हिच्या प्रयत्नांमुळे खरेतर तीला यश मिळालेले आहे. 

चला आजच्या मनो स्वास्थ्याच्या दिवशी आपापली  मेंदूतली अतार्किक  कनेक्शन्स तपासून पाहू......

जाता जाता.....

            मी शाळेत असताना माझ्या आजूबाजूला परीक्षा असली की पेपरला जाताना रोज एकच लकी ड्रेस घालणार्या बऱ्याच मुली होत्या . माझ्या दहावीच्या पेपरला मला पहिलाच पेपर अवघड गेला कारण माझ्या धांदरटपणामुळे एक प्रश्न सोडवायचाच राहून गेला होता . दुसर्या दिवशीच्या पेपरला जाताना ड्रेस घालताना हा ड्रेस आणि अवघड गेलेला पेपर असा  विचार मनात आला. हा ड्रेस बॕडलकी आहे की काय ? आणि मी मग मुद्दामच तोच ड्रेस परत घातला . का ? तर या ड्रेसवरचा बॕडलकचा डाग पुसला जावा म्हणून.आणि तो पेपर छान गेला...

पण त्यामुळे पुढच्या आयुष्यात अशी परावलंबी करणारी कनेक्शन्स कधी रेंगाळलीच नाहीत मनात.


आनंदी

No comments:

Post a Comment

मध्यस्थ

 मध्यस्थ                    फक्त दूरदर्शन होतं त्या जमान्यात एक मध्यस्थ नावाची टेलीफिल्म पाहिली होती. राजन भिसे ,अरूण जोगळेकर आणि लालनसारंग ...