Friday, October 9, 2020

गती – शरीराची .. मनाची...

 गती – शरीराची .. मनाची...




                 एक 55/58 च्या आसपासचे गृहस्थ कंसल्टींगमधे आले. गोष्ट जुनी आहे, तेंव्हा रीसेप्शनिस्ट नव्हती. गर्दी पण नव्हती. डॉक्टर एकट्याच आहेत पाहून आत येऊन बसले. म्हाणाले , “खरं तर बायकोचे फक्त रिपोर्ट्स दाखवायला आलो होतो. पण गर्दी नाहीये तर तीला फोन करून बोलवलय. जवळच राहातो आम्ही. ती येईपर्यंत हे रिपोर्ट्स पाहा.” 

 मी रीपोर्ट चाळत विचारले "  त्रास काय होतोय ? " 

 " काही नाही दम लागतो. पण रीपोर्ट्स नॉर्मल आहेत." 

 पाहीलं तर खरच टू डी ईको ,स्ट्रेस टेस्ट ,एक्स रे ,ब्लड टेस्ट सगळं काही नॉर्मल होतं . 

             मी रीपोर्ट्स बारकाईने बघत असताना ते अस्वस्थ होऊन दाराकडे बघत असलेले मला जाणवत होते. काही वेळाने त्यांनी माझ्यासमोरच फोन लावला नी वैतागत पण हळू आवाजात विचारले "  अग पोचली कशी नाहीस अजून ? लवकर ये . 

           मी मग त्यांच्या बायकोची सर्व मेडीकल हीस्टरी घेतली. मग बोलायला काही ऊरले नाही. पुनः अस्वस्थ होत म्हणाले "  मी बाहेर ऊभा राहातो. ती आली की घेऊन येतो " 

"  हो चालेल " मला चालणारच होतं.

         पाचेक मिनीटांनी ते पुढे नी त्यांच्या मागे त्यांच्यापेक्षा किंचित स्थूल अशा बाई धापा टाकत आत आल्या. दोघेही बसले.

“ बोला. कधी पासून दम लागतोय. नी चालल्यावर लागतोय कि बसल्या बसल्या ? " 

        त्या  काही बोलायच्या आत ते गृहस्थ " अग बघ डॉक्टर पण म्हणाले रीपोर्ट नॉर्मल आहेत. पण डॉ तरी हीची तक्रार आहेच , सारखी दमते . ऊरक म्हणून तो नाही . आताही बघा किती वेळ लावला यायला. नी बघा किती दमलीय. “

       मी काहीच न बोलता फक्त त्यांच्या मिसेसकडे या अपेक्षेने पाहीले की तुमचं काय म्हणणं आहे ? 

        मग त्या म्हणाल्या , "  अहो डॉक्टर मला घाई झाली की दम लागतो. आता मला या दहा मिनटात तीन वेळा फोन केले यांनी . आता फोन आल्यावर साडी बदलणे , घराला कुलूप घालणे , चालत येणे याला काही वेळ लागतो की नाही ? पण यांना ते पटतच नाही. हल्लीच नाही तर नेहेमीचच आहे हे यांचं . तरुण वयात धावले यांच्या म्हणण्याप्रामाणे पण आता दम लागतो मला घाई केली की. माझी मी असले कि मला नाही लागत दम.

बाईंच्या  दम लागण्यामागचे कारण सापडले..

         आयुर्वेदात सांगितलेल्या तीन प्रकृती नुसार आपल्या प्रकृतीनुरूप शरीराची आणि मनाची एक गती बाय डिफॉल्ट आपल्याला मिळालेली असते  . म्हणजे वात आणि पित्तप्रकृतीची माणसे गतीमान असतात तर कफप्रकृतीची मंदगती असतात. याचा अर्थ काय तर बघा... बोलण्याची गती ,चालण्याची गती ,लिहीण्याची गती ,खाण्याची गती ...तुम्ही निरीक्षण कराल तर ती प्रत्येकाची अगदी एकाच कुटूंबातल्या प्रत्येकाचीही  गती वेगवेगळी असते. खालची वाक्ये बघा हं ....

" माझा नवरा फार चेंगट आहे तासभर जेवत बसतो. मागचं आवरायला किती ताटकळायला लागतं " 

“आमच्या नव्या सूनबाई , ऊरकच नाही कामाचा !  चहा करायलाच ईतका वेळ लावते की कसा माझ्या मुलाला वेळेत डबा मिळणारे कोण जाणे ? " 

असे असंख्य प्रसंग नी त्या व्यक्तीसाठी लावलेली असंख्य लेबले – चेंगट , हळूबाई , मंद ,किंवा झपाटा ,वात ,सुपरफास्ट  अशी आपल्याला आठवतील. 

             पण गती ही बाय बर्थ मिळणारं हार्डवेअर आहे हे लक्षात ठेवले पाहिजे . तुम्ही कितीही बदलायचा प्रयत्न केला,  टोमणे मारले तरी अहं.... ऊलट काम बिघडण्याचीच शक्यता जास्त .आपल्या घरातील किंवा आपल्या आॉफीसमधील लोकांची स्वभावत: कामाची गती समजून घेतली तर काम सोपं होईल आणि कामाचं वातावरण पण खेळीमेळीचं राहील.

           दुसरं असं की कधी कधी आपणच आपली गती समजून घेत नाही आणि अवास्तव अपेक्षा ठेवतो. बाहेरून कोणीच कामाचा दबाव टाकत नाही पण तो आपला आपणच घेतलेला असतो  . विशेषतः चाळीशी पन्नाशीनंतर हे जाणवतं. ठराविक वेळेत ठराविक पद्धतीने कामे झालीच पाहीजेत अशा स्वभावाच्या माणसांना वय वाढल्यानंतर शरीराची गती वयोमानानुसार थोडी  कमी झालीय , (आणि त्या गतीला शरीर साथ द्यायला   कोणताही नियमित व्यायामही केलेला नसतो ) याचा स्वीकार  नसेल तर मन पूर्वी प्रमाणेच पटापट कामाचा धडाका ऊरकायला बघतं नी शरीर मात्र साथ देत नाही मग अस्वास्थ्य येत.“पूर्वीप्रमाणे उरकत नाही आता ....अशी भावना अस्वस्थता आणते. कधी कधी निराशा आणते असा अनुभव आहे. अशा वेळेस थोडं थांबावं .... मनात आणि शरीरात डोकवावं . शरीरात आजार नाही ना खात्री झाल्यावर मनाची गती थोडी निवांत करावी. शारीरिक व्यायाम करावा. रोजची कामे टार्गेटेड न करता आनंद घेत गाणी ऐकत करावी. शरीर आणि मनाची कामे करताना शर्यत न लावता एकमेकांना समजून घेत कामे करावीत. 

         शेवट ठरलेला आहे आपल्याला फक्त प्रवास करायचाय पण तो आनंदाने  खिडकीतल्या दृष्यांची   प्रत्येक थांब्याचीही मजा घेत नवनवीन सहप्रवाशांशी गप्पा मारत करायचाय . आज मानसिक स्वास्थ्य दिना निमित्त सर्वांना आयुष्याचा हा प्रवास आनंददायी व्हावा यासाठी शुभेच्छा.......

डॉ. आनंदी साठये

2 comments:

  1. छान! मोजक्या शब्दात घरघरकी कहानी सांगितली आहे आपण.
    पुरूषांना कामावर रोजच धावपळ अंगी बाणुन घ्यावी लागते.
    घरी कामावरचे नियम लादणं म्हणजे स्वतःची आणि घराची शांती गमावणं!!!

    ReplyDelete

मध्यस्थ

 मध्यस्थ                    फक्त दूरदर्शन होतं त्या जमान्यात एक मध्यस्थ नावाची टेलीफिल्म पाहिली होती. राजन भिसे ,अरूण जोगळेकर आणि लालनसारंग ...