Wednesday, October 7, 2020

वेदना मनाच्या



वेदना मनाच्या 


“ या आजोबांना फक्त चौकशी करायचीय “ क्लिनिकची वेळ संपत आलेली असताना रिसेप्शानिस्ट फोनवर म्हणाली. 

“ हो पाठव “ मी.

“ डॉक्टर तुमच्याकडे झोपेवर काही आहे का खात्रीशीर ? “ एक वृद्ध किडकिडीत गृहस्थ दारातूनच विचारते झाले.

“ कुणाला , तुम्हाला प्रॉब्लेम आहे का झोपेचा ? 

“ हो , खूपच जुना . “ ते दारातूनच बोलत होते .

“ तुम्ही आत या. बसा. आता सांगा नक्की काय प्रॉब्लेम आहे . वयानुसार झोप होतच असते कमी  .” मी 

“ नाही हो , माझा झोपेचा प्रॉब्लेम कोणताही डॉक्टर सोडवू शकलेला नाहीये. गोळी घेऊन पण टक्क रात्रभर जागाच असतो. तुमच्याकडे आहे का काही ठोस औषध ?

“ तुम्हाला काही ताण आहे का ? “मी 

“ ताण ? तो तर आयुष्याभाराचाच आहे. “

“ म्हणजे ?” मी चमकून विचारले.

“ तुम्हाला वेळ असेल तर बोलू का ? मोठी स्टोरी आहे. "

खरे तर क्लिनिकची वेळ संपली होती .पण आजोबांना मधेच अडवणे जीवावर आले .

“ हो आहे वेळ बोला ना “ मी.

“ माझा लहानपणी खूप छळ झाला हो ....“ चेहेर्यावरही वेदना होती हे सांगताना .

“ कोणी केला ? “ मी 

“ सावत्र आईने ... असे म्हणून त्यांनी त्यांच्या लहानपणी त्यांना आणि त्यांच्या लहान बहिणीला सावत्र आई हातावर चटके कसे देत होती .आणि किती छळ झाला  अशी खूप मोठी सावकाशपणे  आर्त  करूण कहाणी लहानपणीच्या आयुष्याची मांडली. हे सांगताना ते सगळा त्रास पुन्हा पुन्हा अनुभवत होते.त्यांच्या हातावरचे चटके माझ्यापर्यंत पोहोचत होते “.  काय सांगू तुम्हाला नंतर मी शिकलो घराबाहेर पडलो , नोकरीला लागलो. माझे लग्न झाले. मुले कमावताहेत , सगळे चांगले आहे , पण हे लहानपणीचे चटके काही मनातून जात नाहीत हो. मी बायकोला हे सगळं नेहमी सांगत असतो . या चटक्यांपायी मला बिलकुल झोप येत नाही..

“ वय काय हो तुमचे ?

  ७६ ...


   मी पार निशब्द .....


    लहानपणी ७/८ वर्षाचे असताना चटके मिळाले. त्या नंतर पुढची किमान ५० वर्षे या गृहस्थांनी  चांगली घालवली . आताही आयुष्यात काही प्रॉब्लेम नाहीये. एवढी चांगली घालवलेली  ५० वर्षे मनात न रेंगाळता ती वाईट ५/६ वर्षे मोठी ठरली.   दर वेळेला हि स्टोरी सांगताना त्या यातना ते  चटके तितक्याच तीव्रतेने भोगतही  असतील आणि मग या छळाची तीव्रता अनेक वर्षांमध्ये अनेक पटीने वाढली असणारे. 

    किती हे भयंकर......


      बर्याच जणांना आपल्या वाईट काळाची स्टोरी सांगायला आवडते. वाईट त्रासदायक दुःखी अनुभवातून सांगून मोकळं होणं वेगळं .काही जण ती स्टोरी त्रयस्थपणे सांगतात. हे सांगताना ते यातून बाहेर आलेले आहेत हे जाणवतं. तर काही जण ती स्टोरी सांगताना दर वेळेस त्या वेदना पुन्हा पुन्हा अनुभवतात. आणि या परत अनुभवण्याने मनासोबत हळू हळू शरीरावर परिणाम होत जातो. नि मग आपण त्याला PSYCHOSOMATIC  डिसऑर्डर असे नाव देतो. यामुळे  झोप न येणं , पचनाच्या पोटाच्या तक्रारी सतत जाणवणारी पाठदुखी, मानदुखी ,ईतकचं नाही तर ईतर अपथ्याची जोड याला मिळाली  तर  थायरॉईड, ऊच्चरक्तदाब ,डायबेटीस या आजारातही रुपांतर होऊ शकतं .  

       ते गृहस्थ गेल्यावर मी आपला माझ्या मनाचा धांडोळा घेतला . आपण नाही न कोणते दु:ख कुरवाळत ? दुःखाची स्टोरी सांगताना ते दु:ख पुन्हा अनुभवतोय का हेही आठवून पाहिले. 

      तुम्हीही घ्या  तुमच्या मनाचा आढावा.असे काही दु;ख , यातना  रेंगाळत असेल तर मनाच्या बंदिस्त कवाडातून त्याची सुटका करून टाका आणि मुक्त व्हा आनंदी व्हा ,निरोगी राहा .......


डॉ. आनंदी साठये

4 comments:

  1. खूप छान लिहिलं आहे..साधं आणि तरीही महत्वाचं

    ReplyDelete
  2. मना त्वाची रे पूर्वसंचित केलें,
    त्यासारखे भोगणे प्राप्त झाले.

    ReplyDelete

मध्यस्थ

 मध्यस्थ                    फक्त दूरदर्शन होतं त्या जमान्यात एक मध्यस्थ नावाची टेलीफिल्म पाहिली होती. राजन भिसे ,अरूण जोगळेकर आणि लालनसारंग ...